कारकुनी सुटली
शेवटी मिलिट्री अकाउंटसमध्ये एक साहेब असा आला की त्याने कायद्दावर बोट टेवून वसंताची बदली नेफाच्या जंगलात केली. वसंताचा कलावंत म्हणून मोठेपणा जाणणारे त्याचे कारकुन मित्र त्याच्याऎवजी आम्ही जातो म्हणत होते. पण पिवळ्या कागदाचे कलेशी जमत नाही. (म्हणूनच रेडिओवरचा कारभार पंडुरोगी) लाखात एखाद्याला मिळावे असे संगीतातल्या तबियतीचे वरदान घेऊन आलेला वसंता त्या जंगलातल्या एक तंबूय पाऊस-पाणी, रोगराई, हिस्त्रं जीवजंतू यांच्या संगतीत राहून लोकांच्या पगाराची बिले खरडू लागला. तिथे त्याची प्रकृती ढासळली. पण अखंड साठ की सत्तर र्य्पये पेन्शन आणि त्या जंगलात जडलेली पोटाची व्यथा एवढे सरकारी सेवेबद्दल केलेले चिज घेऊन वसंतराव निवृत्त झाले. गृहस्थाश्रमाला जागून थोरलीचे योग्य वेळी लग्न केले होते. बापू बी. कॉम. ला नंदा वर्षभरात मॅट्रीक होइल. गृहस्थाश्रमाचे योग्य पालन ही आपल्यासाठी अपंपार झीज सोसलेल्या स्वत:च्या आईच्या ऋणाची फार मोठ्या कर्तव्यबुद्धीने केलेली फेड आहे.त्या नोकरी मागे दडलेले रहस्य ते! पुत्र, पती आणि पिता ही गृहस्थधर्माची तिन्ही कर्तव्ये पार पाडलेला वसंता मला म्हणाला, " भाई, आता तंबोरा आणि मी!" अनेक वर्षापूर्वी वसंताला त्या भर मैफलीत विचारलेल्या 'तुमचं घराणं कुठलं?' ह्या प्रश्नाच उत्तर तंबोरा आणि मी ह्यातच आहे. आचार्य अत्र्यांनी वसंताच गाणं ऎकुन म्हटलं 'हा स्वरभोगी गायक आहे. तंबोर्यांच्या चार तारांतच ज्याने चारी मुक्ती साधियेल्या! त्याला कोण अडवणार ? वसंताचे घराणे हे अस्सल स्वरभोगी घराणे आहे. म्हणून स्वरांच्या कणाकणाचा भोग घेणारा हाताचा सूर असो. एखाद्याभजनात जमलेल्या किर्तकराचा असो. लावणी गाणारणीचा असो की भीमसेन, कुमारगंधर्व मल्लिकार्जुन ह्यांच्यासारख्या अभिजात संगीत गायकांचाअसो. वसंता दाद देताना भान हरपून दाद देतो. उपरण्यात अहंकार आणि संगीतात प्रतिष्ठा अप्रतिष्ठा ह्यांचे पोथीनिष्ठ विचार मांडून मैफलीतल्या जागा अडवणार्यांना हे मानवत नाही. मग मन आनि देह सुदृढ मन घेऊन जगणार्या वसंताच्या सांगितीक जीवनातल्या वसंताही नाना तर्हेच्या स्वरबहाराने फुललेला आहे. तो तसाच फुललेला रहावा असे म्हणणार्यांनी संख्या रोज हजारोंनी वाढायला लागली आहे. हि उशिरा का होईना पण वसंताला मिळालेली जवान रसिकांची दाद आहे. वसंतालाच नव्हे तर तंबोरा आणि मी ह्या विचारांच्या स्वरभोगी सृष्टीतल्या लहानमोठ्या निर्मितीच्या निर्मळ मनाने आनंद घेणार्या सर्वांनाच मिळालेली ही दाद आहे. ही दाद आमच्या संगीताची जवानी टिकवणारी आहे. आज पन्नाशीतही वसंताची तडफ विशीतल्या जवानाचीच आहे. ती साठीत, सत्तरीत आणि शंभरीतही तशीत राहो. त्याच्या भवनातले गीत कधीही पुराणी न होवो. ते होणार नाही याची ग्वाही आज तीस वर्षाच्या आमच्या स्नेहाचा इतिहास मला देतो आहे! वसंताचा तंबोरा त्याच्या कानाशी अक्षय वाजत राहो!
- P L Deshpande