Get it on Google Play
Download on the App Store

७ मिस टापटीप १-२

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा ) 

मी तसा अव्यवस्थित व गबाळा मनुष्य आहे.कपडे व घरातील इतर वस्तू व  सामान याकडे माझे लक्ष नसते असे सर्वांचे म्हणणे आहे.कपडे पुस्तके अंथरूण पांघरूण मोबाइल पेन इत्यादी वस्तू कशाही कुठेही अस्ताव्यस्त पडलेल्या असतात.माझी खोली आवरलेलीही मला आवडत नाही.वस्तू नीटनेटक्या ठेवलेल्या असतील तर मला माझी वस्तू चटकन सापडत नाही.कपडे पुस्तके पेन टॉर्च  पैशाचे पाकीट  अंथरुण पांघरुण मोबाईल इत्यादी वस्तुंचा जर  घोळ असेल तर दुसऱ्या एखाद्याला वस्तू सापडणार नाही परंतु मला ती नेमकी सापडते.

माझे अण्णा मी बाबाना अण्णा म्हणतो मला अव्यवस्थितपणावरून नेहमी रागावत असतात.मी वरवर हो म्हणतो परंतु मी सुधारणार नाही याची अण्णानाही कल्पना आहे.माझे सर्व शिक्षण होईपर्यंत मी माझ्या घरीच होतो.दुसरीकडे कुठे जाऊन शिक्षणासाठी राहण्याची वेळ माझ्यावर आली नाही.शिक्षण पुरे झाल्यावर मला एकदम नोकरी या शहरात मिळाली.येथे माझे कुणीही नातेवाईक नाहीत.मला पगार चांगला आहे.घरीही मला पैसे पाठवण्याची आवश्यकता नाही.मिळालेला सर्व पैसा मी येथे खर्च करू शकतो.बऱ्यापैकी हॉटेल पाहून तेथे मी (मंथली बेसिसवर)महिन्याच्या भाड्यावर  खोली घेतली.हॉटेलचे जेवण मला तितकेसे पसंत नसते.केव्हांतरी हॉटेलात जाऊन पदार्थ खाण्यात मजा येते परंतु रोज हॉटेलात जेवणे मला आवडत नाही.

कुठेतरी घरगुती जेवणाची सोय होत असेल तर मला सांगा  म्हणून मी माझ्या कांही सहकारी मित्रांजवळ बोलून ठेवले होते.माझ्या एका मित्राने मला एके ठिकाणी घरगुती जेवण मिळते असे सांगितले.तिथे मी चार सहा दिवस जेवल्यावर तिथेच कायमचे जेवायचे ठरविले.मी जिथे जेवायला जात होतो ते एक छोटेसे घर होते.कऱ्हाडे ब्राह्मणांनी चालविलेली ती खाणावळ होती.घराच्या अर्ध्या भागात दोन भाऊ व त्यांचे कुटुंबीय राहत असत.तर अर्ध्या भागात खानावळ होती.टेबल खुर्च्या इत्यादी सोयी नव्हत्या .लांबलचक हॉलमध्ये पाटावर बसून जेवावे लागे.जेवण अतिशय रुचकर होते.त्यामुळे संपन्न लोकही,  स्वतःची मोटार असलेले लोकही, पाटावर बसून  जेवायला येत असत.

जेवायची तर चांगली सोय झाली .राहण्याची सोय पहात होतो.पैशांचा प्रश्न नव्हता. हॉटेलातील गजबजलेले वातावरण मला आवडत नव्हते.एखाद्या शांत ठिकाणी शांत जागी रहावे असे मला मनापासून वाटत होते.एके दिवशी सहज फिरता फिरता मला एका मोठय़ा जुनाट वाड्यावर जागा भाड्याने देणे आहे अशी पाटी दिसली.जागा पाहण्यासाठी मी वाडय़ात प्रवेश केला.वाडा बाहेरून जुनाट दिसत असला तरी आत खोल्या आधुनिक होत्या.खोली व त्याला (अटॅच टॉयलेट्सह)संलग्न   स्वच्छतागृह (बाथरूम) होते.मला जागा पसंत पडल्यामुळे मी सहा महिन्यांचे भाडे डिपॉझिट  म्हणून  देऊन तेथे राहण्यासाठी आलो.

अशा प्रकारे नवीन शहरात नोकरीसाठी आल्यावर चार महिन्यांतच माझी उत्तम व्यवस्था लागली.सर्व काही व्यवस्थित चालले होते.पुढील दोन महिने काहीही न होता व्यवस्थित गेले.एक दिवस मी ऑफिसातून आल्यावर मला माझी खोली ओळखू येत नव्हती इतकी बदलली होती.माझ्या सर्व वस्तू कुणीतरी टापटिपीने व्यवस्थित लावून ठेवल्या होत्या.गादीवर   चादर व्यवस्थीत घातलेली होती.पायाशी पांघरूण घडी करून ठेवले होते.खोलीचा केर काढलेला होता.टेबलावरील वस्तू व्यवस्थित आवरून  ठेवल्या होत्या.कपडे कपाटात हँगरला लावले होते.इतर कपडे व्यवस्थित घडी करून कपाटात ठेवले होते.कुठेही अव्यवस्थितपणा नव्हता.खोली एखाद्या आरशासारखी स्वच्छ सुरेख दिसत होती.

खोलीच्या दरवाजाला अंगचे  कुलूप होते. त्याची किल्ली वाडय़ाच्या मालकीण काकूंनी   दिली होती.त्याशिवाय बाहेरून कडी होती .त्याला मी स्वतःचे कुलूप लावले होते.त्याची किल्ली कुणाजवळही नव्हती.दरवाजा उघडून आत कुणीही येण्याची शक्यता नव्हती. तरीही कुणीतरी आत आले होते.आणि निगुतीने त्याने अथवा तिने सर्व खोली व्यवस्थित लावली होती.व्यवस्थीत लावलेली खोली पाहून माझा राग अनावर झाला.हा नसता उद्योग कुणी केला म्हणून मी चांगलाच रागावलो होतो.रागावून काही उपयोग  नव्हता. कुणावर रागावणार हाच प्रश्न होता.काकूंकडे जाऊन तक्रार करण्यात काहीच अर्थ नव्हता.त्यांनी माझे म्हणणे नीट ऐकून घेतले असते आणि कदाचित डुप्लिकेट किल्ली   मला देऊन टाकली असती.त्याना हा उद्योग करण्याची गरजही नव्हती.मी माझे स्वतंत्र कुलुप बाहेरून लावलेले असल्यामुळे कुणी आंत जाण्याचा प्रश्नही नव्हता.

त्याच रात्री मी माझ्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त विखरून टाकल्या.दुसर्‍या दिवशी  कुलूप लावून आॅफिसात निघून गेलो.ऑफिसात काम करताना मधून मधून सारखा  एकच विचार डोकावत होता .कुणीतरी माझ्या खोलीत शिरले आहे.माझी खोली व्यवस्थित लावीत आहे.संध्याकाळी मी जेऊन घरी गेल्यावर मला माझी खोली व्यवस्थित आवरलेली दिसेल. मी खोलीवर आलो तेव्हा प्रत्यक्षात खोली आवरलेली होती.

नंतर हा रोजचाच पायंडा झाला.मी खोली मुद्दाम अव्यवस्थित करून ऑफिसात निघून जात असे  आणि कुणीतरी  न चुकता न दमता माझी खोली व्यवस्थित लावून ठेवीत असे. खोली कोण व्यवस्थित लावतो याचा मी खूप विचार केला.अशी कुणीतरी व्यक्ती आहे की तिच्याजवळ किंवा त्याच्याजवळ खोलीत येण्याचा मार्ग उपलब्ध आहे  . खोलीत येण्यासाठी एखादा गुप्त मार्ग असावा .किंवा कोणत्याही कुलपाला लागेल अशी एखादी किल्ली किंवा किल्या असाव्यात .कदाचित ही भुताटकीही असू शकेल.खोली कोण व्यवस्थित लावतो त्याचा छडा लावण्याचे ठरविले.खोलीत लपून बसावे आपण बाहेर गेल्याचे नाटक करावे नंतर आपल्याला खोलीत कोण येतो ते  कळेल असा एक विचार मनात आला.

एक खर्चिक मार्ग माझ्या मनात आला.जर कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे  सीसीटीव्ही बसविला तर जो कुणी  किंवा जी कुणी  खोलीत येत असेल त्याच्या किंवा तिच्या हालचालींचे चेहऱ्याचे आपल्याला चलत् चित्र मिळेल आणि सर्व उलगडा होईल. मार्ग खर्चिक होता परंतु बेमालूमपणे मला त्या व्यक्तीच्या नकळत तिची माहिती मिळेल.शेवटी हाच उपाय करण्याचे ठरविले.एक सीसीटीव्ही कॅमेरा आणून अशा जागी बसविला की कॅमेरा बसविला आहे असे कोणाच्याही लक्षात येऊ नये.ऑफिसला जाताना कॅमेरा सुरू करून निघून गेलो.काम करताना  ते कोण आलं असेल का? का आज येणार नाही? असाच विचार मनात येत होता.

रात्री नेहमीप्रमाणे घरी आलो.खोली नेहमीप्रमाणे व्यवस्थित आवरलेली होती.  दरवाजा बंद केला.खोलीचे खिडक्यांवरील पडदे सरकवले.मी सीसीटीव्हीमधील मुद्रण बघण्यास सुरूवात केली.आमच्या मालकीणकाकूंची मुलगी खोली आवरत होती.काकूंकडे ज्यावेळी मी खोली  भाड्याने घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिने दरवाजा उघडला होता.मी तिच्याजवळ काही बोलणार एवढ्यात आतून काकू आल्या होत्या  .ती झपाट्याने आतल्या खोलीत निघून गेली होती.त्यानंतर काकूंकडे जाण्याची वेळ आली नव्हती.येता जातानाही ती मला केव्हा दिसली नव्हती.त्या दिवशी तिला पाहिले तेवढेच.तिची आकृती मनात ठसली होती.मध्यम उंची, गहू वर्ण, लांबसडक केस, गोल चेहरा, रुंद कपाळपट्टी, पाणीदार डोळे, किंचित अपरे नाक,पांढरी शुभ्र  दंत पंक्ती,डौलदार चाल डोळ्यात भरली होती.                                                           

मला आवडलेली मुलगी माझी खोली आवरत होती.दृश्य मुद्रणामध्ये ती खोलीत कुठून आली ते दिसत नव्हते.                                

सतत चार दिवस मी  सीसीटीव्ही सुरू करून ऑफिसमध्ये जात होतो.रोज मुद्दाम खोली अव्यवस्थित करून जात होतो.अर्थात माझ्या स्वभावानुसार खोली थोडीबहुत अव्यवस्थित होतच असे .त्यामध्ये मी माझ्या कल्पकतेने आणखी भर घालीत होतो.रोज ती मुलगी कुठून तरी   खोलीत अवतीर्ण होत होती.खोली व्यवस्थित लावीत होती.नंतर निघून जात होती.जशी ती अकस्मात अवतीर्ण होत असे तशीच अकस्मात अदृश्य होत असे. जणूकाही तिच्याजवळ कोणतीतरी अदृश्य शक्ती होती तिचा वापर करून ती खोलीला कुलूप असले तरी खोलीत अवतीर्ण होऊ शकत असे. त्याचप्रमाणे अदृश्यही होऊ शकत असे .अर्थात ही गोष्ट माझ्या मनाला पटत नव्हती.दृश्य मुद्रणाच्या परीक्षणात मी कुठेतरी चूक करीत होतो.माझ्या निरीक्षणातून एखादी गोष्ट निसटत होती.

काळजीपूर्वक निरीक्षणांतून मला ती कशी अदृश्य होत होती किंवा कशी अवतीर्ण होत होती ते लक्षात आले. खोलीची रचना पुढीलप्रमाणे होती.खोलीला स्वच्छतागृहाकडे ( बाथरूममध्ये)  जातानाएक लहानशी बोळ (पॅसेज) होती.त्या बोळीच्या टोकाला स्वच्छतागृह  होते.ती मुलगी त्या बोळीतून खोलीत येत असे आणि पुन्हा बोळीत जात असे. याचाच अर्थ बोळीमध्ये किंवा स्वच्छतागृहात एखादा छुपा रस्ता असला पाहिजे की त्यामधून ती येवू व जाऊ शकत असे.तो छुपा रस्ता ती गुप्त वाट शोधण्याला मी सुरवात केली.अकस्मात दैवयोगाने मला तो रस्ता ती गुप्त वाट सापडली.

बोळीमध्ये एक कपाट होते.त्या कपाटात  सुटकेस कपडे बादली इ. ठेवण्यासाठी व्यवस्था होती.कां कोण जाणे परंतु त्या कपाटातला बाहेरून कडी खिटी कांहीही नव्हते. नुसत्या फळ्या ढकलून बंद कराव्या लागत असत.   कपाटात बऱ्यापैकी अंधार होता.मी बॅटरीचा प्रकाश पाडत  कपाटाचे संपूर्ण  व्यवस्थित निरीक्षण केले.मला गुप्त रस्ता सापडला नाही.बॅटरी बंद करून मी हाताने कपाट्याच्या चारही बाजू  चाचपडून पाहू लागलो .माझा हात चुकून कळीवर पडला.एक लहानसा कर्रर्र असा आवाज आला आणि कपाटाची एक फळी बाजूला झाली.  

पलीकडे एक जिना होता.बॅटरीचा प्रकाश पाडून पाहिले असता अंधारात पायर्‍या नाहीशा होत होत्या.पलीकडे खाली काय आहे ते दिसत नव्हते.मी पायर्‍या  उतरून रस्ता कुठे जातो ते पाहण्याचा निश्चय केला.माझ्या पाठीमागे कपाटाचा दरवाजा आपोआप बंद होण्याचा धोका होता  . तसे झाले असते आणि फळी उघडण्याची कळ मला सापडली नसती तर जिन्यातच अडकून पडलो असतो .तसे होऊ नये म्हणून मी खोलीत जाऊन खुर्ची मुद्दाम आणली आणि ती खुर्ची कपाटाच्या उघडणार्‍या फळीमध्ये ठेवली.आता आपोआप कपाटाची  फळी बंद झाली असती तरी खुर्चीमुळे फळी पूर्ण बंद झाली नसती आणि रस्ता मोकळा राहला असता.आज एवढे संशोधन पुरे असे मी ठरविले.

*दुसऱ्या दिवशी पूर्ण तयारीनिशी जिन्यातून रस्ता पुढे कुठे जातो ते पाहू असे ठरवले. टॉर्च,स्वसंरक्षणासाठी काठी, बरोबर घेऊन मी अंधाऱ्या जिन्यात प्रवेश केला.*

*अर्थात काल काढून ठेवलेली खुर्ची पुन्हा कळीच्या दरवाजामध्ये ठेवण्यास मी विसरलो नव्हतो.*

(क्रमशः)

२८/१/२०२१©प्रभाकर  पटवर्धन