Get it on Google Play
Download on the App Store

८ मिस टापटीप २-२

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा ) 

दुसऱ्या दिवशी पूर्ण तयारीनिशी जिन्यातून रस्ता पुढे कुठे जातो ते पाहू असे ठरविले. टॉर्च,स्वसंरक्षणासाठी काठी, बरोबर घेऊन मी अंधाऱ्या जिन्यात प्रवेश केला.

अर्थात काल काढून ठेवलेली खुर्ची पुन्हा कळीच्या दरवाजामध्ये ठेवण्यास मी विसरलो नव्हतो.

मी अत्यंत काळजीपूर्वक जिना उतरत होतो. पायर्‍या डाव्या बाजूला काटकोनात वळून पुढे उतरत गेल्या होत्या.थोडय़ाच वेळात मी एका अरूंद बोळीमध्ये आहे असे मला आढळून आले.बोळ वापरात असल्यासारखी स्वच्छ होती. बोळीतून पुढे जाता जाता दोन फाटे फुटलेले आढळले.एक समोर जात होता तर दुसरा उजवीकडे वळला होता.कोणत्या बाजूला जावे असा मला विचार पडला. थोडा वेळ विचार करून मी समोरच्या रस्त्याने जायचे ठरविले.पुन्हा केव्हातरी उजव्या बाजूच्या रस्त्याने जाऊन संशोधन करता येईल असा विचार केला.थोड्याच वेळात मला एक जिना लागला. जिन्याने चढत गेल्यावर  जिथे पुढे रस्ता नाही(डेड एंड) अशा ठिकाणी मी आलो .निरीक्षण करता तो एक लाकडी दरवाजा आहे असे लक्षात आले.माझ्या कपाटातून जसा रस्ता होता तसाच हा रस्ता कपाटातून एखाद्या खोलीत जात असावा असे माझ्या लक्षात आले.मी कपाट उघडण्याची कळ शोधायचा प्रयत्न केला .थोड्याच वेळात मला कळ सापडली.कळ दाबल्यावर फळी बाजूला झाली.आता मी कपाटात होतो.थोड्याच वेळात मी बोळीतून एका खोलीत प्रवेश केला.ही  काकूंची खोली असावी असे माझ्या लक्षात आले. काकू त्यांच्या मुलीशी  शालिनीशी बोलत होत्या.त्या हाताच्या बोटांनी खुणानी बोलत होत्या व त्यांची मुलगी तसेच त्याना उत्तर देत होती.शालिनी बहिरी व मुकी आहे हे माझ्या लक्षात आले. ही गोष्ट लक्षात आल्यावर मला मोठा धक्का बसला.  तिचे खरे नाव मला माहीत नव्हते.मी तिच्या नम्र वर्तणुकीकडे पाहून  तिचे नाव शालिनी ठेवले होते.तिची व्यवस्थितपणा ची आवड पाहून  तिला मी मनातल्या मनात गंमतीने मिस "टापटीप"असेही संबोधत असे.  

मी पकडले जाण्याचा धोका होता.माझ्या खोलीत शालिनी   कशी येत होती त्याचा उलगडा झाला होता.शालिनी खोलीत येत असताना तिला  रंगेहात पकडावे असा माझा विचार होता. तिच्याशी मैत्री करावी.तिच्याशी गप्पा माराव्यात. जमल्यास ठरवून तिला शहरात  रेस्टॉरंट बाग थिएटर इत्यादी ठिकाणी कुठेतरी भेटावे.मैत्री पुढे न्यावी असा माझा विचार होता.ती बहिरी व मुकी आहे असे लक्षात आल्यावर माझ्या विचारांवर बादलीभर थंड पाणी पडले होते.

दोन चार दिवस मी कळत नकळत विचार करीत होतो.ती बहिरी व मुकी असली तरी तिच्याशी  मैत्री करावी. जमल्यास मैत्री पुढे न्यावी.ती मला आवडली होती.तिची संमती असेल, तिला मी आवडत असेन, जर तिच्या आईने संमती दिली तर तिच्याशी लग्न करावे असा एक विचार मनात येई.जरी माझ्या आई वडिलांना ती बहिरी व मुकी असल्यामुळे पसंत पडली नाही तरी त्याना समजावता येईल त्यांची संमती मिळू शकेल याची मला मनोमन खात्री होती. 

ती बहिरी व मुकी असल्यामुळे आई वडिलांना ती पसंत पडणार नाही.व्यवहारात वागताना आपल्यालाही असंख्य अडचणी येतील तेव्हा तिच्याशी मैत्रीचा विचार सोडून द्यावा असा दुसरा विचार होता.

मला मुले मुकी कां होतात ते आठवले.कर्णदोषामुळे त्यांना ऐकू येत नाही .त्याना भाषा ऐकून शिकता येत नाही.जर कर्णदोष दूर होऊ शकला तर ती बोलू लागेल असा विचार मनात आला.तिला डॉक्टरना दाखविल्याशिवाय तिचे ऑपरेशन होईल की नाही ते कळू शकणार नव्हते.ऑपरेशन झाले तरी ते यशस्वी होणे आवश्यक होते.भविष्यातील सर्वच गोष्टी अनिश्चित होत्या.    

शेवटी मी तिच्याशी मैत्री करण्याचा, तिला डॉक्टराना दाखवूत कर्णदोष दूर करण्याचा विचार पक्का केला.कर्णदोष दूर होईल किंवा होणार नाही,ती जशी आहे तसा तिचा स्वीकार करण्याचे मी शेवटी ठरविले. तिच्याशी मैत्री करण्यासाठी प्रथम तिची भाषा शिकणे आवश्यक होते .बहिऱ्यामुक्यांची भाषा जाणणार्‍याचा शोध घेतला.त्यांची शिकवणी लावली.दोन महिन्यांत मी ती भाषा बोलण्यास म्हणजेच  बोटांच्या योग्य हालचाली करण्यास,इतर सर्व खुणा करण्यास   शिकलो.

या सर्व काळात न थकता रोज माझी खोली ती आवरत होती.सुरुवातीला मी खोली मुद्दाम अव्यवस्थित करीत असे.आता मी मुद्दाम वस्तू अस्ताव्यस्त करण्याचे सोडून दिले होते .पूर्वी मी वस्तू कुठेही टाकीत असे.सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे एकदम गोंधळाचे वातावरण असे. हळूहळू नकळत मी   वस्तू काही प्रमाणात जागच्या जागी ठेवू लागलो होतो.शालिनीची भाषा शिकल्यानंतर ती खोलीत येत असताता मी तिला पकडण्याचे ठरविले.              

मी ऑफिसात खरेच गेलो असे वाटणे आवश्यक होते.जेव्हां जेव्हां माझ्या ऑफिसला सुटी असे, जेव्हां जेव्हां मी रजा टाकीत असे, तेव्हां तेव्हां शालिनी खोलीत येत नसे हे माझ्या लक्षात आले होते. तसेच ती फक्त दुपारीच माझ्या खोलीत येत असे हेही माझ्या लक्षात आले होते.दुपारी तिची आई झोपत असावी किंवा कुठेतरी बाहेर जात असावी आणि ती वेळ साधून ती माझ्या खोलीत येत असावी,हीही गोष्ट सीसीटीव्हीच्या मुद्रणाच्या निरीक्षणातून  माझ्या लक्षात आली होती.मी बाहेर गेलो आहे याची खात्री करूनच ती माझ्या खोलीत येत होती.माझी मोटार खाली पार्किंगमध्ये नाही म्हणजे मी घरात   नाही याची निश्चिती होती.  

ऑफीसला सुटी नव्हती.मी ऑफिसात रजा टाकली होती.तरीही ऑफिसच्या वेळेला मोटार घेऊन बाहेर पडलो.मोटार दूरवर जावून एका झाडाखाली उभी केली.खाण्यासाठी कांही पार्सल घेऊन  घरी परत आलो. शालिनी  येईल म्हणून बोळीत वाट पहात थांबलो.   

खोलीत थांबलो असतो तर तिने मला आल्याबरोबर पाहिले असते. मी तिला पकडण्याच्या अगोदर ती पळून जाण्याची शक्यता होती .तसे झाले असते तर ती पुन्हा कधीच खोलीत न येण्याची शक्यता होती .अशा परिस्थितीत तिची व माझी  भेट कधीच झाली नसती.बोळीत मला जवळजवळ एक तास वाट पाहावी लागली.दुपारचा एक वाजला होता.  कळ दाबून कपाटाचा दरवाजा सरकल्याचा आवाज आला .कपाटातून ती बोळीत आली.ती आल्या आल्या मी तिचा हात घट्ट पकडला.तिचा हात अकस्मात पकडला गेल्यामुळे ती दचकली व घाबरली.हात मी   पकडल्याचे तिच्या लक्षात आले. हे लक्षात आल्यावर तिचा चेहरा थोडा निवांत व समाधानी वाटला.हात सोडवून पळून जाण्याचा तिने लटका  प्रयत्न केला असेही मला वाटले.तिला तशीच धरुन खोलीत सोफ्यावर आणून बसविले.घाईघाईत खुणांच्या भाषेने घाबरू नकोस असे मी तिला सांगितले.खुणांची भाषा मी किती चांगल्या प्रकारे आत्मसात केली आहे याची आता परीक्षा होती.

हात पकडल्यामुळे प्रथम ती घाबरली होती.मला बघून तिला आश्चर्याचा धक्का बसला होता.तिला समजत असलेली भाषा मी बोलत असलेली पाहून तर तिला आणखीनच आश्चर्याचा धक्का बसला.थोडय़ाच वेळात ती सावरली.खुणांच्या द्वारे मी तिला तू घाबरू नकोस म्हणून आश्वस्त केले.आता आम्ही दोघेही एकमेकांशी सफाईने बोलत होतो.

मी तिला माझी खोली व्यवस्थित करण्याचे कारण विचारले.तिला अव्यवस्थितपणा आवडत नाही असे तिने सांगितले.माझ्या खोलीत आल्याशिवाय खोली अव्यवस्थित आहे हे तिच्या कसे लक्षात आले असे विचारता ती निरुत्तर झाली. माझी खोली जरी अव्यवस्थित  असली तरी ती  व्यवस्थित करण्याचे तुला कारण काय असेही तिला विचारले .माझ्या प्रश्नावर ती निरुत्तर झाली होती.मी तिला आवडतो म्हणूनच ती माझ्या खोलीत आली होती.रोज खोली व्यवस्थित लावून शालिनी माझ्या मनात भरावी,माझे तिच्याकडे लक्ष जावे अशी तिची इच्छा होती,ही गोष्ट माझ्या लक्षात आली.

माझ्या खोलीप्रमाणे स्वच्छतागृह असलेल्या आणखी सहा सात खोल्या होत्या.त्या सर्व भाड्याने दिलेल्या होत्या.गुप्त रस्ता त्या खोल्यांपर्यंत जात नाही हे मी अगोदरच पाहिले होते.उजवीकडे जाणारा रस्ता एका खोलीत जात होता. वाडय़ावर आक्रमण झाल्यास लपण्यासाठी त्या खोलीचा उपयोग करता येत होता.त्याचप्रमाणे काही गोष्टी लपवून ठेवण्यासाठीही ती खोली वापरता येत होती.जुन्या काळच्या त्या वाड्यातून पळण्यासाठी माझ्या खोलीत आलेल्या रस्त्याचा उपयोग होत होता.

तिच्या चेहऱ्यावर मी तिला आवडलो होतो हे स्पष्ट दिसत होते.माझा अव्यवस्थितपणा तिला आवडत नव्हता.रोज खोली व्यवस्थित लावल्यावर आज ना उद्या मी वस्तू जागच्या जागी ठेवू लागेन अशी तिची अपेक्षा होती.थोड्या वेळाने ती निघून गेली.दुपारी तिची आई झोपत असे.त्यावेळी ती माझ्या खोलीत येवून खोली व्यवस्थित करीत असे.

खोली व्यवस्थित लावण्याचा तिचा उपक्रम मी तिला पकडल्यानंतरही रोजच सुरू राहिला.तिला त्रास पडू नये म्हणून असो किंवा व्यवस्थीत लावलेली खोली आवडू लागल्यामुळे असो मी माझ्या वस्तू हळूहळू त्या त्या जागी ठेवू लागलो. माझ्या वडिलांनी लहानपणी सांगितलेले एक सूत्र मला आठवत होते.प्रत्येक वस्तूला विशिष्ट जागा पाहिजे.आणि त्या त्या जागेवरच ती वस्तू पाहिजे.अंधारातही एखादी वस्तू त्या जागी चटकन सापडली पाहिजे.तिचा हा व्यवस्थितपणा माझ्या वडिलांना खूप आवडेल असा विचार माझ्या मनात तरळून गेला.

सुटीच्या दिवशी व शनिवार रविवारी ती माझ्या खोलीत येऊन मला भेटू शकत होती.आम्ही भरपूर गप्पा मारीत होतो.मैत्रिणीकडे जाते असे सांगून ती संध्याकाळी   घराबाहेर पडत होती. ऑफिस सुटल्यावर आम्ही ठरवून निरनिराळय़ा जागी भेटत होतो.तिच्या संमतीने मी तिच्या आईला भेटण्याचे ठरविले.तिच्या आईला भेटून मी त्यांच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा त्याना सांगितली.तिच्या आईने स्पष्टपणे मला ती मुकी व बहिरी आहे हे  सांगितले.मला पूर्ण विचार करण्यास सांगितले.आठ दिवसांनी भेटून मी माझ्या निर्णयावर ठाम आहे असे त्याना सांगितले.आम्ही अगोदरच त्यांच्या संमतीशिवाय खोलीत व बाहेर भेटत होतो हे त्याना कळावे असे मला वाटत नव्हते. 

डॉक्टराना दाखवून   तिच्या कानाचे ऑपरेशन कदाचित शक्य होईल.तसे झाल्यास तिच्या कानात यंत्र बसविता येईल.तिला ऐकू येऊ लागल्यास ती बोलूही शकेल.असे मी तिच्या आईला सांगितले.मुंबईच्या ई एन टी   विशेषज्ञाची मी अगोदर पूर्वनियोजित भेट ठरविली.तिच्या आईला व तिला घेऊन मी मुंबईला गेलो.ऑपरेशन यशस्वी झाले.तिच्या कानात यंत्र बसविण्यात आले.ती थोडेबहुत का होईना परंतु बोलू लागली.

* वेळोवेळी मी माझ्या आई वडिलांना सर्व हकिगत फोनवर   सांगत होतो.*

*आई वडीलांशी माझे लहानपणापासूनच मित्रत्वाचे नाते आहे.*

* कांही दिवस आईवडील माझ्या येथे आले होते.शालिनीमध्ये बहिरी व मुकी हे व्यंग सोडले तर नाकारण्यासारखे कांहीच नव्हते.*

*त्यांनी प्रथम थोडा विरोध करून पाहिला परंतु मी माझ्या विचारांवर ठाम आहे असे लक्षात आल्यावर त्यांनी संमती दिली.*  

*आता आमचा विवाह झाला आहे.काही लहान मोठय़ा अडचणी सोडल्या तर आम्ही,"मिस टापटीप" व मी  आनंदी जीवन जगत आहोत.*

* खोली व्यवस्थित कोण लावतो याच्या संशोधनाचे हे असे फलित आहे.* 

*अव्यवस्थितपणाकडून टापटीपीकडे झालेल्या माझ्या प्रवासाची ही कथा.* 

(समाप्त) 

२९/१/२०२१©प्रभाकर  पटवर्धन