Get it on Google Play
Download on the App Store

०१ साथ साथ १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

स्वागत समारंभ संपला होता .रात्रीचे बारा वाजले होते .सर्वत्र शांतता पसरली होती . स्वागत समारंभाला येणाऱ्या  लोकांची गर्दी आता ओसरली होती. विस्तृत हिरवळीवर स्वागत समारंभ होता तरीही रात्री आठ ते अकरा एकच गर्दी  होती .साधना व आनंद यांच्या विवाहानिमित्त हा स्वागत समारंभ आयोजिला होता.

साधना एक प्रथितयश वकिलाची मुलगी होती.तर आनंद हा तशाच तोलामोलाच्या एका डॉक्टरचा मुलगा होता .साधना एका आयटी कंपनीत नोकरी करीत होती .तर आनंद एका ऑटोमोबाइल कंपनीत नोकरी करीत होता .साधना कॉम्प्युटर इंजिनिअर होती तर आनंद ऑटोमोबाइल इंजिनिअर होता .

वकील, डॉक्टर आणि इंजिनिअर लोकांची स्वागत समारंभासाठी गर्दी उसळली होती .साधनाचे वडील अण्णासाहेब,  आनंदचे वडील तात्यासाहेब ,साधना व आनंद आपआपल्या ओळखीच्या लोकांचे स्वागत करण्यात गढून गेले होते .

साधना व आनंद दोघेही नमस्कार करण्यात अाणि ज्येष्ठ मंडळींच्या पाया पडण्यात दमून गेले  होते.सकाळी वैदिक पद्धतीने विवाह सोहळा फक्त नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला होता.

अण्णासाहेब व तात्यासाहेब  हे दोघेही पुण्याचे रहिवासी होते.त्यांची वकिली व डॉक्टरी तेथेच चालली होती .

साधना व आनंद  दोघेही नाशिकला काम करीत होते. दोघांनाही विवाहानंतर नाशिकला स्वतंत्रपणे राहायचे होते . साधनावर सासुरवाडीला रहायचे म्हणून प्रेशर नव्हते.आनंदलाही आई वडील काही बोलतील म्हणतील असा संभव नव्हता .दोघेही मनमानेल तसे वागायला मोकळे होते .

दोघेही घरचे श्रीमंत व खानदानी असल्यामुळे पैशाला तोटा नव्हता .साधना व आनंद दोघेही चांगल्यापैकी मिळवत होते.

दोन दिवसांनी सत्यनारायण व कुलदैवत दर्शन झाल्यावर  दोघेही दार्जिलिंगला हनीमूनसाठी जाणार होते अण्णासाहेबांना आपली मुलगी व जावई स्वित्झर्लंडला जावेत असे वाटत होते .परिस्थितीमुळे आपण त्यावेळी  जे करू शकलो नाही ते आपल्या मुलीने करावे असे त्यांना स्वाभाविक वाटत होते.तात्यासाहेबांचेही मत त्याहून फारसे वेगळे नव्हते. आईवडिलांच्या पैशांवर स्वित्झर्लंडला  जायची कल्पना दोघांनाही पसंत नव्हती. 

त्यांनी एकमेकांच्या संमतीने दार्जिलिंगला जायचे निश्चित केले होते . त्याप्रमाणे त्यांनी विमान हॉटेल इत्यादी बुकिंग एका ट्रॅव्हल कंपनीमार्फत केले होते .

दोघांचाही प्रेमविवाह होता .एका शहरात असूनही शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली नव्हती .नाशिकला त्यांची सहज अपघाताने ओळख झाली होती .आनंदची कामाची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी पांच अशी होती .साधारण साडेपाच सहापर्यंत तो आपल्या फ्लॅटवर पोचत असे .एकटा राहात असूनही त्याने तीन बेडरूमचा फ्लॅट घेतला होता .पुढे मागे लग्न झाल्यावर आई वडील पाहुणे रावळे आल्यास कुणाचीही गैरसोय होऊ नये,अशा इच्छेने दूरदर्शी धोरणाने ,त्याने आर्थिक दृष्ट्या शक्य होते म्हणून फ्लॅट घेतला होता .

त्या दिवशी महत्त्वाची मिटिंग असल्यामुळे, परदेशी पाहुणे आलेले असल्यामुळे, मिटिंग व जेवण असा बेत होता. जेवण वगेरे करून रात्री दहाच्या सुमारास आनंद घरी निघाला होता .घरी जाताना गंगापूर रोडवर एक मुलगी स्कूटर चालू करण्यासाठी धडपड करीत असलेली त्याला दिसली .रात्रीचे दहा वाजले असले तरी रस्ता वाहता होता . त्या मुलीला मदत करावी असे त्याला वाटले .केवळ मुलगी म्हणून नव्हे तर कोणाच्याही उपयोगी पडण्याचा त्याचा स्वभाव होता .

त्याने मी काही मदत करू का म्हणून विचारले .तिने प्रथम तीक्ष्ण नजरेने त्याच्याकडे पाहिले .मुलीला मदत करण्याच्या मिषाने पुढे येणारे तरुण तिने पाहिले होते .आनंदच्या नजरेत तिला मदत करण्याची  प्रामाणिक भावना दिसली.हा तरुण तिला जरा वेगळाच वाटला.तिने सस्मित होकारार्थी मान हलवली .सुदैवाने आनंदला दोष चटकन सापडला .नाहीतरी तो ऑटोमोबाइल क्षेत्रातीलच  होता.स्कूटर सुरू झाल्यावर तिने आभार मानले.आनंद व साधना आपापल्या दिशेने निघून गेले.

नियती दैव योगायोग भविष्य काहीही म्हणा परंतु त्यांची भेट पुन्हा होणार होती .

आनंदच्या सहकाऱ्याचे लग्न होते. विवाह समारंभाला आनंद आला होता.वधू आयटी क्षेत्रातील असल्यामुळे साधनाही तिथे आली होती .दोघांची तिथे पुन्हा भेट झाली .दोघांचीही आपली पुन्हा भेट व्हावी अशी अांतरिक इच्छा असावी.जन्मोजन्मीची आपली ओळख असावी अशा थाटात त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली .साधनाच्या मैत्रिणीने आनंदवरून तिला थोडे डिवचले सुद्धा.तिची मैत्रीण म्हणाली तू तर छुपा रूस्तुम निघालीस .दोघांचे मन मोकळे बोलणे ,डोळ्यात डोळे घालून हसणे, हे पाहून ती मैत्रिण साधना बाजूला भेटली तेव्हा तिला म्हणाली ,तुमच्या भेटीगाठी तू आमच्यापासून चांगल्याच लपवल्यास .तुमचे प्रकरण बरेच पुढे गेलेले दिसते .

त्यावर हसून साधना म्हणाली अग काहीतरीच काय आमची तर  कालच पहिल्यांदा भेट झाली.त्यावर तिची मैत्रीण संपूर्ण अविश्वास दाखवत म्हणाली  नक्कीच माझी खात्रीच पटली आहे.यावर आणखी काही बोलण्यासारखे उरले नव्हते.दिवस असेच चालले होते .साधना व आनंदच्या भेटी वारंवार होत होत्या.थोड्याच दिवसात दोघांनीही विवाह करण्याचे निश्चित केले . 

दोघांनाही शनिवार रविवार सुटी होती .दोघेही एकाच गाडीने पुण्याला गेले.त्यांनी आपआपापल्या आई वडिलांजवळ  अगोदरच सर्व हकीकत सांगितली होती. भेटण्याचा कार्यक्रम औपचारिक होता .कुणातही काहीही नाव ठेवण्यासारखे नव्हते .नाव कदाचीत कुणी ठेवले असते तरी ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कुणीही नव्हते.

अशा प्रकारे दोन्ही बाजूंच्या संमतीने विवाह संपन्न झाला होता . दोघेही मधुचंद्राला  जाऊन आले.दोघांचेही नेहमीचे रुटीन सुरू झाले .

साधना पुण्याला शिकत असताना तिला तिच्या आईने मुद्दाम स्वयंपाक शिकविला होता . मुली शिकत असताना स्वाभाविकच त्यांचे लक्ष शिक्षणाकडे असते .उरलेला वेळ मित्र मैत्रिणींबरोबर हास्यविनोदात जात असतो .स्वयंपाक कुणीच गंभीरपणे घेत नसते.हल्ली समानतेचे वारे आहेत .एखादा म्हणेल वारे जरा जास्तच जोरात वाहत आहे .पुरुषांना बायकांप्रमाणेच घरकामे आली पाहिजे यात कोणतीही शंका नाही.दोघेही नोकरी करीत असतात. दोघांनाही बर्‍याच  वेळा समसमान पगार मिळत असतो.कांही वेळा तर स्त्रीला पुरुषापेक्षा जास्त पगार मिळत असतो. स्त्री व पुरुष ही रथाची दोन चाके आहेत.इत्यादी सर्व गोष्टी तात्त्विक दृष्टया मान्य केल्या तरी व्यवहारात बऱ्याच वेळा त्याप्रमाणे होताना दिसत नाही .पुरुषांचे रथाचे चाक जरा मोठेच वाटते.त्यामुळे जास्त भार स्त्रियांवर पडतो . 

कामावरून आल्यावर पुरुष तंगड्या लांब करून आराम करताना दिसतो.तर बायका नसलेला पदर खोचून स्वयंपाक घरात काम करताना आढळतात .

तर साधनाला जुजबी स्वयंपाक येत होता .आनंदला चमचमीत खाण्याची सवय होती .एकटा असताना तो एका खानावळीत जात असे .त्या घरगुती खानावळीत काकू उत्कृष्ट स्वयंपाक करीत असत. रुचकर जेवणाची आनंदला सवय झाली होती.याशिवाय तो मधूनच निरनिराळ्या धाब्यावर हॉटेलमध्ये रुचीपालट म्हणून जेवत असे ते वेगळेच .

लग्नाच्या अगोदर व लग्न झाल्यावर काही काळ दोघेही पराचे पंख लावून अस्मानात विहरत असतात.त्या वेळी एकमेकांचे दोष लक्षात येत नाही .आणि ते स्वाभाविकही आहे .लग्नानंतर थोड्याच दिवसात त्यांचे पाय जमिनीवर येतात.संघर्ष केव्हा सुरू झाला ते दोघांनाही जरा उशिराच लक्षात येते .

प्रत्येकाच्या आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षेप्रमाणे दुसरा नाही असे पाहिल्यावर संघर्षाला कुरबुरीला सुरुवात होते.

आपल्याप्रमाणेच साधनाने लवकर निदान साडेसहा सात पर्यंत घरी यावे असे आनंदला वाटत असे.साधना आयटी क्षेत्रात असल्यामुळे आणि तिच्यावर ज्या जबाबदाऱ्या होत्या त्यामुळे तिला साहजिकच उशीर होत असे .आपण आल्यावर आपल्याला कुलूप उघडावे लागू नये. स्वतःच चहा करून घ्यावा लागू नये अशी आनंदची अपेक्षा असे.साधनाच्या उशिरा येण्यावरून रोज कुरबूर होत असे . 

साधनाने त्याला उशिरा येण्याची कारणे समजावून सांगितली.परंतु काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत आनंद नव्हता.शेवटी वैतागून साधनाने मी तुझ्यासाठी नोकरी सोडून देऊ का असे विचारले.त्याने नको म्हणून सांगितले.नोकरी सोडून दे म्हणून आनंदने सांगितले असते तरी ते साधनाने कितपत मान्य केले असते ते साधनालाच माहीत. तुझ्यासाठी मी नोकरी सोडून देऊ का? हे तिचे वाक्य केवळ आवेगाच्या भरात भांडणाच्या जोशात विचारलेले होते.

साधनाची अपेक्षा आपल्या जोडीदाराने आपल्याला समजून घ्यावे अशी स्वाभाविक होती . त्याने आपल्याला मदत करावी असे वाटणे स्वाभाविक होते .

*प्रणयाराधनाच्या काळात दोघेही फक्त सकारात्मक बाजू पाहात होते .नकारात्मक बाजू कुणाच्या लक्षात आली नव्हती.*

* हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच जाणार होता .*

* त्याची परिणती शेवटी काय होणार होती ते नियतीलाच माहीत*  

(क्रमशः)

१६/४/२०२०©प्रभाकर  पटवर्धन