Get it on Google Play
Download on the App Store

०६ सविता १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

संध्याकाळचे सहा वाजले होते .सविता तिच्या स्कूटरवरून आली .स्टॅंडवर तिने आपली स्कूटर उभी केली.गेल्या चार दिवसांप्रमाणेच ती आपल्या ठरलेल्या जागी यंत्रवत निघाली. दीपस्तंभ समुद्रावर काही बाके सिमेंटमध्ये बसवली होती .त्याचप्रमाणे काही लाकडाचे बाकाचा आकार दिलेले ओंडके वाळूत टाकले  होते. 

ज्या ज्येष्ठ नागरिकांना वाळूमध्ये बसल्यावर उठता येत नाही .किंव्हा वृद्धत्वामुळे वाळूत बसताच येत नाही अश्या नागरिकांसाठी ती सोय केलेली होती .सविता तिच्या ठरलेल्या बाकावर जावून बसली. यावेळी गेले चार दिवस तरी तो बाक रिकामा असे.

गेल्या दहा वर्षात दीपस्तंभ हे समुद्रकिनाऱ्यावरचे रत्नागिरी जिल्ह्यातील गाव एकदम प्रसिद्धीस आले होते .येथे डोंगराचे दोन मोठे सुळके समुद्रात शिरले होते. या डोंगराच्या आसपास बरेच खडक होते .त्यामुळें लहान मोठ्या बोटी होडय़ा यांना धोका पोचत असे .खडकावर आपटून आतापर्यंत  कितीतरी होड्या  बुडाल्या होत्या.दोन डोंगरांमधील समुद्राचा भाग पूर्णपणे सुरक्षित होता . सरकारने हल्लीच या दोन्ही डोंगरांवर दीपस्तंभ उभे केले होते.तेव्हापासून या गावाचे मूळ नाव डोंगरगांव लोक विसरले होते .दीपस्तंभ या नावाने हे गाव ओळखले जाऊ लागले होते .समुद्र किनार्‍यावरील वाळूत सरकारने कितीतरी झाडे लावली होती.वाळूची धूप होऊ नये आणि किनारा सुरक्षित संरक्षित राहावा हा त्यामागे हेतू होता .

हे तसे चांगले सुरक्षित बंदर होते . शांत समुद्र किनारा खोल पाणी यामुळे येथे मोठ्या बोटीही सहज उभ्या राहू शकल्या असत्या .एका मोठय़ा धक्क्याची गरज होती .हा धक्का उभारला जाईल .येथपर्यंत चौपदरी रस्ता केला जाईल. येथून मालवाहतूक सुरू होईल .पॅसेंजर वाहतूकही सुरू होईल अशी वदंता होती .सर्व प्रकारच्या जलवाहतुकीला प्राधान्य द्यायचे असे सरकारी धोरण होते .येथे काही थ्री स्टार हॉटेल्स गरजे प्रमाणे सुरू झाली होती .समुद्रकिनारा सुरक्षित असल्यामुळे स्विमिंगचीही सोय केली होती .

समुद्र किनारा नेहमीप्रमाणे गजबजलेला होता .शून्यात नजर लावून सविता बाकावर बसली होती.येथून पूर्वेला पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या फणसगाव येथे ती रहात होती .गेले काही दिवस ती अस्वस्थ होती .नेहमीची तीच तीच माणसे व तोच तोच परिसर बघून त्याच त्याच विचारांनी डोक्यात थैमान घालू नये म्हणून रजा काढून ती येथे एकटीच आली होती .बस किंवा टॅक्सीने न येता ती तिच्या स्वतःच्या स्कूटरवरून आली होती .स्कूटरवरून पंचवीस किलोमीटर अंतर म्हणजे काहीच नव्हते .स्कूटर आणण्याचा हेतू आपल्याला मॉबिलिटी राहावी, कुठेही जाता यावे, हा होता.

ती म्हटले तर समुद्र किनारा पाहात होती .म्हटले तर सूर्यास्त पाहत होती .किंवा कुठेच पाहात नव्हती.एवढा गजबजलेला परिसर असूनही तिला काहीही ऐकू येत नव्हते.तिच्या मनात जो कल्लोळ उसळला होता त्याच्या आवाजापुढे तिला बाहेरचा आवाज एेकू येत नव्हता. भरतीची वेळ होती . नेहमीप्रमाणे एकाहून एक मोठ्या लाटा येऊन किनार्‍यावर आपटत होत्या .लोकांच्या कोलाहलापुढे समुद्राची गाज ऐकू येत नव्हती. सविताला कधी कधी  उठावे आणि समुद्रात सूर्याच्या दिशेने चालत जावे, जलसमाधी घ्यावी आणि डोक्यातील हा सर्व कल्लोळ संपवून टाकावा, असे वाटत असे.जो कल्लोळ शांत करण्यासाठी,विसरून जाण्यासाठी,ती येथे आली होती, तो कल्लोळ डोक्यात चालूच होता .

एक तरुण चालत चालत तिच्या जवळ आला .खास आवाजात विशिष्ट खूण करून , येणार का? म्हणून त्याने विचारले .आज चार दिवस तो तिला न्याहळीत होता.आज त्याने विशिष्ट स्वरात विशिष्ट खुणा करून  तिला विचारले होते.त्याचा अर्थ स्पष्ट होता .त्याला ती धंदेवाली वाटली होती .ते शब्द ऐकून तिच्या डोक्यात तिडीक उठली .येथे आल्यापासून अजून कुणी तिला असे विचारले नव्हते.तिने त्याच्याकडे धारदार तीक्ष्ण नजरेने पाहिले . शक्य असते तर त्या नजरेने तो तरुण जळून भस्म झाला असता .त्या नजरेत असे काही होते की तो तरुण लगेच सॉरी सॉरी  म्हणत चालू पडला.

तो निघून गेल्यावर ती विचारात पडली .तिला त्याचे काही चूक आहे असे वाटले नाही .एकटी मुलगी चार दिवस समुद्र किनाऱ्यावर एकटी येऊन बसते.तिच्या बरोबर कुणी नाही. तिला कुणी भेटत  नाही. कुणी मित्र मैत्रिणी नाहीत .तेव्हा असा विचार त्यांच्या मनात आला तर त्याला दोष देता येत नव्हता.

ती दिसायला बरी, बरी काय चांगलीच सुंदर होती.सौंदर्याची मोजमापं लावली तर ती कदाचित चारचौघींसारखी ठरली असती .परंतु तिच्यात असे काही होते की ती आकर्षक दिसत असे .कुणाही पुरुषाची नजर ती सहज खेचून घेत असे. तिने एकदा आपली पर्स उघडून पाहिली .आत स्प्रे व पिस्तूल होते .कुणी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यास तिला तो स्प्रे वापरता येणार होता .शिवाय ती नेमबाजीत प्रवीण होती.नेमबाजीत तिने अनेक बक्षीसे पटकावली होती .हाताच्या मुठीत मावेल एवढे छोटे पिस्तुल तिच्याजवळ होते.त्याचा परवानाही तिच्याजवळ होता.ती सुरक्षित होती .तिच्या इच्छेशिवाय तिला हात लावण्याची कुणाचीही प्राज्ञा नव्हती. 

शूटिंग रेंजवर तिची त्याच्याशी ओळख झाली होती.कमलाकर उमदा तगडा देखणा पुरुष होता.शूटिंग इन्स्ट्रक्टर म्हणून तो काम करीत होता . सर्व प्रकारची हत्यारे चालविण्यात तो वाकबगार होता.रायफल बंदुकांपासून रिव्हाल्वर पिस्तूलपर्यंत कोणतेही हत्यार तो लीलया हाताळत असे.नेमबाजी शिकवता शिकवता शिकता शिकता दोघेही एकमेकांना आवडू लागली .दोघांची जवळीक वाढत गेली. मोटारसायकलवरून उगीचच शहरात चक्कर मारणे,मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी चक्कर मारणे,नाटक सिनेमाला जाणे ,हॉटेलिंग,अशी सर्वत्र ती दोघे एकत्र दिसू लागली होती .त्याच्या बरोबर मोटारसायकलवरून फिरताना ती त्याच्या खांद्यावर हात, तो तिचाच असल्यासारखा ठेवीत असे .त्याच्या बरोबर फिरताना ती एकूणच मालकी हक्क दाखवीत असे. आणि त्याची त्याला ना नसे.दोघेही अश्या प्रकारच्या नात्यावर सुखावत असत.

तो शूटिंग रेंजवर इन्स्ट्रक्टर म्हणून काम करीत तर होताच त्याशिवाय तो एका ऑफिसमध्ये वरिष्ठ पदावर नोकरीही करीत होता .सविताही दुसऱ्या एका ऑफिसमध्ये नोकरी करीत होती.कुणीही काहीही शिकलेला असला तरी हल्ली प्रत्येकाला संगणक हाताळता येणे,अत्यावश्यक असते. त्यामध्ये जेवढी प्रवीणता तेवढी प्रमोशनची शक्यता जास्त वाढते .कमलाकर संगणक तज्ञ होता .नर्तकीने पदन्यास करावा,उत्तम हार्मोनियम वादकाने आपली बोटे सहजरित्या हार्मोनियम वरून जलद फिरवावीत त्यातून एखाद्या गाण्याची मधुर सुरावट काढावी  ,तबला वादकाने आपली बोटे तबल्यावरून सहजगत्या फिरवत त्यातून नेमके बोल काढावेत,तितक्याच सहजतेने तो संगणकातून त्याला हवी असलेली माहिती गोळा करीत असे .संगणकावर त्याची लांबसडक बोटे चालताना सविता कमलाकरला न्यहाळीत असे .त्याच्या लांबसडक बोटांची हालचाल तिला मोहवीत असे .एकांतात असताना ती त्याचे हात आपल्या हातात घेऊन त्या बोटांवर आपले ओठ ठेवीत असे. 

दोघांची ओळख मैत्री स्नेह हळूहळू दाट होत होता .एकमेकांच्या घरीही ओळख झाली होती .कमलाकरच्या आईने सविताला सून म्हणून पसंत केले होते.तर सविताच्या आईला कमलाकर जावई म्हणून पसंत होता .लवकरच साखरपुडा, त्यानंतर  विवाह होणार असे सर्व गृहीत धरून चालले होते.

आणि तो काळा दिवस उजाडला .थंडीचे दिवस असूनही सकाळ पासून आकाशात अभ्रे जमा  झाली होती.थोड्याच वेळात पाऊस पडण्यास सुरुवात झाली .रिमझिम  पावसाने रस्ते निसरडे झाले होते.सविताला ऑफिसला जाण्यासाठी उशीर झाला होता .कमलाकर नेहमी तिला त्याच्या मोटारीतून तिच्या ऑफिससमोर सोडत असे व नंतर तो पुढे त्याच्या ऑफिसमध्ये जात असे.एवढ्यात कमलाकरचा खुणेचा हॉर्न वाजला .ती नेहमी प्रमाणे फ्रंट  सीटला कमलाकर शेजारी  येऊन बसली.

एका वळणावर चुकीच्या बाजूने ट्रक येत होता.त्याची कमलाकरच्या मोटारीशी टक्कर झाली.

(क्रमशः)

२५/४/२०२०©प्रभाकर  पटवर्धन