Get it on Google Play
Download on the App Store

०१ काळेशार पाणी १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )

मला अजूनही स्वप्ने पडतात .काळेभोर पाणी सर्वत्र पसरले आहे आणि त्यात मी बुडत आहे असे मला स्वप्न पडते .कधी कधी  काळ्या शार पाण्यात माझा भाऊ बुडत आहे असे मला स्वप्न पडते.दोन्ही वेळेला मी जिवाच्या आकांताने ओरडत असते.कधी, मला वाचवा, मला वाचवा, असा माझा ओरडा  असतो.तर कधी संवादला वाचवा, संवादला वाचवा, असा माझा ओरडा असतो.

कुठेही काळे भोर पाणी पाहिले की मी अस्वस्थ होते .

माझ्या मनातील अपराधी भावना केव्हा जाईल काही माहित नाही .माझ्यामुळे माझा धाकटा भाऊ मेला.त्याने अजून नीट जग पाहिले नव्हते अश्या  वयात तो गेला .असे त्याचे काय मरण्याचे वय होते. तो तर फक्त आठ वर्षांचा होता. मी त्याला वाचवू शकले असते, परंतु वाचवले नाही .उघड्या डोळ्यांनी तो पाण्यामध्ये बुडत असताना पाहात राहिले .मी पुढे जाऊन त्याला वाचवायला हवे होते .मीही पाण्यात बुडेन म्हणून मी पुढे गेले नाही .मी घाबरले .ही गोष्ट आयुष्यभर मला खात राहील. त्यावेळी जे घडले ते स्वाभाविक होते.मी दोषी नव्हते .परंतु मला हे कोण पटवून देणार ?मला हे कसे पटणार ?तुम्ही सर्व हकिगत ऐकल्यावर मी दोषी नाही हे तुमच्या लक्षात येईल .कदाचित तुम्हीही मला दोषी ठरवाल.

असे काही तरी न समजणारे, परंतु समजल्यासारखे वाटणारे, लिहित बसण्यापेक्षा मी तुम्हाला पहिल्या पासून  सर्व हकिगत सांगते.नंतर तुम्हीच निर्णय घ्या .

आमचे चौकोनी कुटुंब होते .आई बाबा मी (संजना )व माझा धाकटा भाऊ संवाद.मी व संवाद यांच्यामध्ये आठ वर्षांचे अंतर आहे .तो मला ताई म्हणत असे  व  माझ्यावर अवलंबूनही रहात असे.भावंडे आपापसात प्रेमही करतात आणि भांडतही असतात .आमच्यात पुष्कळ अंतर असल्यामुळे आम्ही भांडल्याचे क्वचितच आठवते .संवादला काही समस्या असली की तो सरळ माझ्याकडे येतो.आईकडे किंवा बाबांकडे जाण्यापेक्षा,त्याला माझ्याजवळ येणे, समस्या सांगणे, ती सोडवणे,जास्त सोपे वाटते. आमचे दोघांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम आहे .आहे म्हणण्यापेक्षा आता होते  असे म्हणूया कारण संवाद आता या जगात नाही .  सहा महिन्यांपूर्वीच तो आम्हाला सोडून गेला .

माझे आई व बाबा दोघेही नोकरी करतात.आई व बाबा दोघेही स्विमिंग चॅम्पियन्स होते . पोहण्याच्या तलावावर ,पाोहण्याच्या स्पर्धेमध्येच त्या दोघांची ओळख झाली .त्या ओळखीचे  प्रेमात रुपांतर झाले आणि नंतर त्यांनी लग्न केले .लग्नानंतर वर्षभरातच मी जन्माला आले .

आई व बाबा दोघेही तरणपटू व विजेते असल्यामुळे त्यांनाही आपली मुलगी तरणपटू व्हावी. स्विमिंग चॅम्पियन व्हावी. तिने लहान वयातच अनेक पदके जिंकावी असे स्वाभाविकपणे वाटत असे.लहान वयात मुलाला पाण्यात सोडले तर त्याची पाण्याची भीती जाते असे म्हणतात.दर्यावर्दी लोक, खारवी, दालदी, भंडारी, अश्या  कोकणातील कांही दर्यावर्दी  जाती,नदी किनारी सागर किनारी राहात असतात.मूल जन्मल्याबरोबर नाळ कापल्यावर  त्याला ते पाण्यामध्ये एक दोन डुबकी देऊन आणतात  असे ऐकिवात आहे.

मला अगदी तसेच नाही परंतु सहा महिन्यांपासून पोहायला शिकविण्याचे दोघांनीही  ठरविले होते .परंतु कां कोण जाणे पाणी बघितले मग ते टबातील असेना का, मी किंचाळू लागे. रडायला सुरुवात करीत असे.मी कधीही टबमध्ये मला आंघोळ घालू दिली नाही असे आई बाबा म्हणतात . त्यानी मला तरणतलावात नेऊन पोहायला शिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.माझी पाण्याबद्दलची भीती गेली नाही .शेवटी त्यांनी मला पोहायला शिकविण्याचा नाद सोडून दिला .माझ्या रडण्यापुढे,पाण्याच्या भीतीपुढे, त्यांना हार मानावी लागली.

आता मी सोळा वर्षांची आहे. अजूनही मला पोहता येत नाही.

माझा धाकटा भाऊ संवाद याचे माझ्या बरोबर उलटे होते.आई बाबांनी त्याला लहानपणापासून पोहायला शिकवण्याचे ठरविले .त्याने स्वत:ला आपण आईबाबांचा मुलगा आहो हे सिद्ध केले.पाचव्या वर्षांपासून तो पोहोण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे .आता भाग घेत होता असे म्हणूया.वयाच्या आठ वर्षांपर्यंत त्याने पोहण्याच्या स्पर्धेमध्ये अनेक पदके जिंकली होती .पाण्यामध्ये मासळी ज्या चपळतेने विहार करते त्याच चपळतेने तो पाण्यामध्ये विहार करीत असे .

आई बाबांना कामातून सुट्टी मिळाली की कुठे तरी फिरायला जायला आवडत असते. लहानपणापासून त्यांच्याबरोबर मी अनेक ठिकाणी गेले आहे .गेल्या वर्षभरात आम्ही कुठे गेलो नव्हतो .आईला व बाबांना दोघांनाही सुट्टी आणि त्यातच  मला व संवादला शाळा नसणे या गोष्टी जमून येणे आवश्यक होते  .

गेल्या दिवाळीच्या सुट्टीत तसा योग जुळून आला .एक दोन आठवड्यांसाठी बाबानी एका विश्रांती स्थळावर(रिसॉर्ट ) जावून राहायचे ठरविले.फोंडाघाटच्या दाट अरण्यात एक मोठा तलाव आहे .तलावासभोवती पर्यटकांसाठी अनेक सुविधा आहेत.तलावाकाठी छोटे छोटे पाचपंचवीस बंगले पर्यटकांसाठी बांधलेले आहेत. खासगी पैशातून या तलावाचा विकास झाला आहे .पर्यटकांसाठी सर्व सोयी या खासगी संस्थेने केल्या आहेत.जेवण्या खाण्याची राहण्याची उत्कृष्ट सोय तिथे आहे .बंगल्याची प्रतिबिंबे तलावात पडतात .

दिवसाच्या कांही प्रहरी ते दृश्य फारच मनोरम दिसते. विश्रांतीस्थळ व तलाव यामध्ये भक्कम कुंपण आहे .कुंपणावर चढून पाण्यामध्ये सूर मारण्याला बंदी आहे.तिथे पोहता येत नाही .

तिथून सुमारे एक किलोमीटर अंतरावर बोटिंगची व्यवस्था आहे .वल्हवण्याच्या बोटी,पायडल मारण्याच्या बोटी, मोटारवर  चालणार्‍या  बोटी,सर्व प्रकारच्या बोटींची तिथे व्यवस्था आहे . बोटी भाडय़ाने घेऊन आपण नौकाविहाराचा आनंद घेऊ शकतो .

तिथून पुढे सुमारे एक किलोमीटर अंतरावर पोहण्याची व्यवस्था आहे.पोहण्याची सोय बघून आई बाबा व संवाद अतिशय आनंदित झाले होते.पोहणे हाच त्यांचा विश्रांतीचा व करमणुकीचा एक भाग होता  .

इथेच आमचा घात होणार आहे याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती .

(क्रमशः)