Get it on Google Play
Download on the App Store

०६ मनाची शक्ती २-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. ) 

एके दिवशी तो ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याचे डोके खूप दुखत होते .स्नेहालाही हा ताप साधा वाटत नव्हता .

डॉक्टर परागचे स्नेही असल्यामुळे घरी तपासण्यासाठी आले.

हल्ली सहसा डॉक्टर घरी तपासण्यासाठी येत नाहीत .

काहीही कारण असो, फॅमिली डॉक्टर ही संस्थाच हल्ली दिसत नाही .

विशेषीकरणाने जरा जास्तच गंभीर स्वरूप घेतलेले आहे.

डॉक्टर परागचे स्नेही होते. काट्याचा नायटा करण्याचा त्याचा स्वभाव त्यांना माहिती होता .त्यांनी त्याला संपूर्ण धीर दिला .काळजी करण्याचे काहीही कारण नाही .तू चार दिवसांत ठणठणीत बरा होशील म्हणून सांगितले. याचे विचारचक्र चालूच होते .टायफाईड, नवज्वर, यापासून ते ब्लड कॅन्सर पर्यंत सर्व शंका त्याच्या मनात येत होत्या .परागला डॉक्टरांनी जरी कितीही धीर दिला असला तरी त्याना हा ताप  थोडा वेगळा वाटत होता .  त्यानी ताप चढू देऊ नका, काळजी घ्या,म्हणून स्नेहाला सांगितले .तीन साडेतीनपेक्षा ताप वाढता कामा नये .हा ताप अकस्मात वाढतो .जर ताप एकदा डोक्यात गेला तर डोक्यावर कायमचा परिणाम होऊ शकतो .रात्री गजर लावून मधून मधून उठून ताप पहा आणि  डोक्यावर कपाळावर बर्फ ठेवा .वेळ प्रसंगी गार पाण्याची आंघोळ घातली तरी चालेल .परंतु ताप चढू देऊ नका म्हणून त्यांनी स्ट्रीक्ट सूचना दिल्या होत्या .अंगाभोवती गार पाण्यात भिजवून टॉवेल गुंडाळण्यास सांगितले होते.

रात्री ताप विलक्षण चढला .अंगाभोवती ओला करुन टॉवेल गुंडाळावा लागला .ताप थोडा उतरला .तापाने धोक्याची मर्यादा ओलांडली नाही. परंतु खोकला झाला.न्युमोनियाची लक्षणे दिसू लागली.परागला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले .दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली .याचे काही खरे नाही असे डॉक्टरांना वाटू लागले .

त्याची प्रकृती जास्त  जास्त  बिघडण्यामागे तापाचा प्रकार व तीव्र उद्रेक हे जरी असले तरी परागचा विशिष्ट स्वभावही कारणीभूत होता .त्याच्या काळजीखोर स्वभावामुळे तो मनामध्ये कल्पनांचे जाळे विणत होता. त्यामुळे त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती.हे सर्व डॉक्टरांना दिसत होते. परंतू काय करावे ते त्यांना कळत नव्हते.शेवटी त्याची प्रकृती अश्या  एका स्थितीला आली की त्याने मनाची उभारी घेतल्याशिवाय तो जगणे अशक्य अशी स्थिती अाली.त्याला सायकॉलॉजिकल  ट्रीटमेंटची ,मानसिक उपचारांची, मानसिक धक्क्याची, गरज होती. 

डॉक्टर स्नेहाजवळ म्हणाले कि या बिकट परिस्थितीत दोन गोष्टी केल्या पाहिजेत.एक~ त्याच्या मनात जगण्याची तीव्र इच्छा निर्माण केली पाहिजे.दोन~ त्याचे मन त्याच्या आजारावरून, चिंतेतून दुसरीकडे वळविले पाहिजे. मी जगणारच, मला जगलेच पाहिजे, त्याशिवाय इलाज नाही .अशी इच्छाच त्याला या दुखण्यातून बरी करू शकेल .मनाची शक्ती फार मोठी असते .रोगी जेव्हा आजारी पडतो त्यावेळी औषध तर हवे असतेच परंतु डॉक्टरवरील व औषधांवरील नितांत विश्वास त्याला तारून नेतो .हा विश्वास,  मी या औषधाने बरा होणारच ही मनाची तीव्र भावना, पन्नास टक्के काम करते .काही नाही केले तरीही मनुष्य बरा होण्याची शक्यता पंचवीस टक्के असतेच .पंचवीस टक्के औषधाचा परिणाम असतो .

निरनिराळ्या रोग्यांमध्ये, निरनिराळय़ा रोगांच्या संदर्भात,निरनिराळया  काळात हे प्रमाण कमी जास्त होते .जगण्याची तीव्र इच्छा व्यक्तीला आजारातून तारून नेते.ही दुर्दम्य इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली पाहिजे .मी मरणारच या भावनेने त्याला ग्रासलेले आहे .तो निराश मन:स्थितीत आहे.त्यामध्ये बदल होणे, परिवर्तन होणे, आवश्यक आहे.  पुढील दोन तीन दिवस क्रिटीकल आहेत, काळजीचे आहेत  .यामधून पराग बाहेर आला म्हणजे त्याची प्रकृती झपाट्याने सुधारेल .

डॉक्टरांनी एक मानसशास्त्रीय प्रयोग करण्याचे ठरविले .ते म्हणाले या प्रयोगात थोडी रिस्क आहे .त्यासाठी मला तुमची परवानगी पाहिजे.  ती रिस्क आपण घेतली पाहिजे असे मला वाटते .अन्यथा मला हा बरा होईल असे वाटत नाही .हे ऐकून स्नेहा घळाघळा  रडू लागली.

डॉक्टरांनी पुढील प्रयोग सुचवला .स्नेहाने मन घट्ट करून दवाखान्याकडे चार दिवस फिरकायचे नाही .डॉक्टर स्नेहाला अपघात झाला आहे असे परागला सांगणार होते .त्या अपघातात तिचा मृत्यू झाला असेही सांगणार होते .

ज्योतीवर त्याच्या मुलीवर  परागचे विलक्षण प्रेम होते.स्नेहा तर गेलीच. जर मीही गेलो, तर ज्योती अनाथ होईल.तिच्या आयुष्याची दुर्दशा होईल .आजोळी किंवा माझ्या आई वडिलांकडे  जरी पालनपोषण झाले तरी ज्योतीला जे आयुष्य मिळायला पाहिजे ते  आई वडील नसल्यामुळे मिळणार नाही  . आता ते आयुष्य ज्योतीला देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे अशी भावना त्याच्या मनात निर्माण होईल .

डॉक्टर पुढे म्हणाले या धक्क्याने कदाचित त्याला हार्ट अटॅक येउन त्याचा मृत्यू होईल.हा धोका जरूर आहे .एवीतेवी या तापामध्ये,तापामुळे , मानसिकरित्या खचल्यामुळे , तापाच्या प्रकारामुळे, मला त्याचा मृत्यू अटळ दिसत आहे.केवळ मिरॅकल, जादूच, त्याला वाचवू शकेल.

जगण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली पाहिजे . ज्योतीला कुणाचाही आधार नाही. आपणच तिचे सर्वस्व आहोत. या कल्पनेने जर त्याचा ताबा घेतला तर आपण जगलेच पाहिजे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण होईल.निराशाजनक विचार दूर होतील. त्याठिकाणी ज्योती,तिचे संभाव्य अनाथपण, तिचे भविष्य, या गोष्टी जागा घेतील.

मनाची सकारात्मक उभारी आणि मन दुसऱ्या दिशेला वळविणे या दोन्ही गोष्टी साध्य होतील. 

तुझा मृत्यू शॉकट्रिटमेंटप्रमाणे काम करील .

माझी खात्री आहे की परागचे विचार या धक्क्यामुळे विरुद्ध दिशेने  वाहू लागतील.

आपण जगलेच पाहिजे ही तीव्र इच्छा त्याला जगवील. तो बरा होईल .

मी लहानपणापासून परागला ओळखतो .त्याला आम्ही लहानपणी व आताही चिंतातूर जंतू म्हणून चिडवत होतो.

त्याच्या या आजारपणातील वाईट स्थितीला रोगाइतकाच त्याचा स्वभाव कारणीभूत आहे.

हे धक्कातंत्र काम करील याची मला खात्री आहे.

अर्थात मी वर सांगितलेला धोका संभवतो परंतु तो धोका आपण स्वीकारला पाहिजे .

त्या दिवशी रात्री स्नेहा आली नाही.डॉक्टरनी स्नेहाचा  अपघाती मृत्यू  परागच्या कानावर घातला.ज्योतीच्या भविष्यासाठी त्याला बरे झालेच पाहिजे हे त्याच्या मनावर बिंबविले . 

परागने ज्योतीला पाहण्याची इच्छा प्रगट केली .ज्योतीला एका टेबलवर झोपवून परागला तिला दाखविण्यात आले.पराग आजारी म्हणून ज्योतीचे आई वडीलही पुण्याहून आले होते.या कटामध्ये त्यांनाही सामील करून घेण्यात आले.   

स्नेहाच्या मृत्यूचे अपार दुःख हृदयात साठवून ज्योतीच्या भविष्यासाठी आपण जगलेच पाहिजे ही तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. 

या तीव्र इच्छेचा, त्याच्या मनाने घेतलेल्या वेगळ्या वळणाचा, त्याच्या प्रकृतीवर सकारात्मक परिणाम झाला . पुढचे दोन तीन दिवस धोक्याचे म्हणून डॉक्टरनी सांगितले होते ते पार पडले.

पराग झपाट्याने  बरा होऊ लागला .औषधांचा तर परिणाम झालाच .औषधे त्याच्या मनाला वळण देवू शकत नव्हती. ते वळण या धक्कातंत्राने दिले.

ज्योतीच्या मृत्यूच्या बातमीनंतर चार दिवसांनी ज्योती त्याला दवाखान्यात भेटण्यासाठी आली .तोपर्यंत ती त्याला दुरून काचेच्या खिडकीतून पाहात होती .काळजावर दगड ठेवून, डॉक्टरांवर विश्वास ठेवून, ज्योतीने  त्यांनी सुचविलेले धक्का तंत्र अवलंबिण्यास परवानगी दिली होती.

*ज्योतीला बघून त्याला आणखी एक धक्का बसला .*

*हा धक्का आनंदाचा होता .*

*लवकरच पराग बरा होवून घरी आला.*

*हल्ली त्याचा काळजीखोर स्वभाव थोडा कमी झाला आहे.*  

(समाप्त)

३/३/२०२०©प्रभाकर  पटवर्धन