अंबेचा प्रतिशोध
अंबेनं नंतर परशुरामांकडे मदतीची याचना केली. तिच्या विनंतीस मान देऊन त्यांनी भीष्मांशी तुंबळ युद्ध केले. परशुराम जरी विष्णूचा अवतार आणि भीष्मांचे गुरु होते. पराशुरामांसमोर भीष्मही कमी नव्हते. त्यांची उपासना, आराधना आणि युद्ध कौशल्य हे थोर होते. भीष्मांचे ब्रह्मचर्य पालन आणि गंगेच्या आशीर्वादाने ते ही एक असामान्य योद्धा होते आणि त्यांना इच्छामरणाचा वर प्राप्त होता.
चोवीस दिवस चाललेल्या ह्या युद्धात कुणीच मागे हटेना तेंव्हा परशुरामांनीच जाहीर केले की, याचा निकाल लागणे शक्य नाही आणि अंबेने भीष्मांचे म्हणणे मान्य करावे. अंबेला ते पटले नाही.
तिने मग भगवान शंकराची आराधना सुरु केली. भोलेनाथांनी तिला वर दिला कि,
“तू जरूर भीष्माच्या मृत्यूस कारणीभूत ठरशील, पण पुढच्या जन्मात. या जन्मात नाही.”
हा वर प्राप्त होताच तिने पुढच्या जन्मास विलंब होऊ नये म्हणून अग्नीत प्रवेश करून जीव दिला.