०४ अमानवी १-२
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
नीलेशचे बाबा वआई दबक्या आवाजात एकमेकांशी बोलत होते.दोघेही काळजीत पडले होते.त्यांना नीलेशची काळजी वाटत होती.गेले जवळजवळ सहा महीने नीलेश बदललेला वाटत होता.पूर्वीचा नीलेश व हल्लींचा नीलेश यात जमीन अस्मानाचा फरक पडलेला वाटत होता.नीलेशचा चेहराही थोडा बदलला आहे असे वाटत होते.
केवळ त्याचे आई बाबा असे म्हणत होते असे नाही. त्याच्या शाळेतील शिक्षकांचेही तसेच मत होते.एक दिवस शाळेतून प्राचार्यांची चिठी त्याच्या बाबांना आली.सुरेशला (त्याच्या बाबांना) भेटून जा म्हणून सांगितले होते.बाबा प्राचार्याना भेटायला गेल्यावर त्यांनी नीलेशबद्दल काळजी व्यक्त केली होती.त्यांच्या बोलण्याचा आशय पुढीलप्रमाणे होता.
नीलेशचा अभ्यासू स्वभाव नाहीसा झाला होता.तो घरचा अभ्यास पूर्वी काटेकोरपणे रोजच्या रोज करीत असे.प्रत्येक शिक्षकाच्या प्रत्येक विषयाच्या गृहपाठाच्या वह्या व्यवस्थित भरलेल्या असत.हल्ली त्याचे गृहपाठाकडे दुर्लक्ष असे.गृहपाठ लिहिला तर लिहिला नाही तर नाही असे त्याचे काम लादावर्दीचे असे.
त्याचे हस्ताक्षर मोत्यासारखे होते.शिक्षक वर्गातील मुलांना नीलेशचे हस्ताक्षर मुद्दाम दाखवीत असत.काळजी घ्या.नीट लिहा तुमचे हस्ताक्षर पाहून प्रसन्न वाटले पाहिजे.तुम्ही लिहिलेल्या मजकुरातील आशय जसा महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे हस्ताक्षरही महत्त्वाचे आहे.असे आवर्जून सांगत असत.हस्ताक्षर कसे असावे याचा आदर्श नीलेश होता.हल्ली त्याचे हस्ताक्षर वेडेवाकडे बिघडलेले होते. हस्ताक्षर कसे असू नये त्याचा आदर्श आता नीलेश होता.
पूर्वी नीलेश विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लगेच बरोबर आणि व्यवस्थित देत असे.हल्ली त्याला विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर नीट देता येत नसे. त्याच्या चेहऱ्यावरून त्याला प्रश्नही कळलेला नसे हे सहज लक्षात येई. उत्तरही अर्थातच माहीत नसे. त्याचे वर्गात लक्षच नसे.
पूर्वीं नीलेश शिक्षकांचा आदर करीत असे त्यांना यथोचित मान देत असे. शिक्षक वर्गात आल्यावर उठून उभे राहणे,वाटेत कुठे भेटले तर त्याना नमस्कार करणे,सर्व शिष्टाचार (एटीकेटस्) तो व्यवस्थित पाळीत असे. हल्ली त्याची वर्तणूक उध्दट उर्मट अनादरयुक्त अशी होती.
पूर्वी नीलेश नेहमी हजर राहत असे.तो क्वचित कधीतरी गैरहजर असे.हल्ली त्याचे गैरहजेरीचे प्रमाण जवळजवळ पन्नास टक्के झाले होते.शाळेत आला तरी कित्येकदा तासाना तो दांड्या मारत असे.
पूर्वी तो पहिल्या दोन रांगांमध्ये बसत असे.हल्ली तो शेवटच्या रांगांमध्ये असे.
शिकविण्याकडे पूर्वी त्याचे पूर्ण लक्ष असे. हल्ली शिक्षक काय शिकवतात तिकडे त्याचे लक्ष क्वचितच असे.
हल्ली शिक्षकांची चेष्टा मस्करी करण्यात, त्यांना त्रास देण्यात, त्याचा पुढाकार असे.
पूर्वी मुलींशी त्याचे वर्तन योग्य जसे अपेक्षित आहे तसे असे.हल्ली मुलींकडून त्याच्याबद्दल तक्रारी येऊ लागल्या होत्या.एकदा तर एका मुलीने रागावून त्याच्या कानफटात मारली होती.त्यावेळी रागात त्याने तिचा हात एवढा पिरगाळला होता की ती किंचाळत सुटली होती.त्यावेळी इतर विद्यार्थी त्यांच्या अंगावर धावून गेले होते.त्याचा क्रूर चेहरा बघून त्याला हात लावायला कुणीही धजले नाही.शाळेची व मुलीची बदनामी नको म्हणून आम्ही ते प्रकरण तिथल्या तिथे मिटविले.त्यावेळी तुम्हाला बोलवून मी त्याबद्दल तुमच्याशी बोललो आहेच.तुम्ही त्यावेळी त्याला झालेला अपघात आणि त्यामुळे त्याच्यात झालेला बदल सांगितला होता.अपघातामुळे डोक्यावर झालेला परिणाम म्हणून आम्ही त्यावेळी त्याला शाळेतून हाकलून (रस्टिकेट)दिला नाही.
थोडक्यात पूर्वीं विद्यार्थी कसा असावा याचा आदर्श नीलेश होता तर आता विद्यार्थी कसा नसावा याचा आदर्श नीलेश आहे.
तुम्ही त्याच्या अपघाताबद्दल पूर्वी बोलला आहात.म्हणूनच आम्ही या वेळी तिकडे दुर्लक्ष करीत आहोत.त्याचे शालेय वर्तन यापुढे गैर असल्यास आम्हाला कडक धोरण स्वीकारावे लागेल.
प्राचार्यानी त्याच्या बाबांना नीलेशला डॉक्टरांकडे घेऊन जा म्हणून सल्ला दिला होता.त्याला वाईट संगत लागली आहे का ते तपासा असेही सांगितले होते.त्याच्याशी प्रेमाने बोलून त्याला पूर्वपदावर आणावा असे सुचविले होते.जर त्याचे वर्तन सुधारले नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशी चेतावणी दिली होती.
त्याच्या बाबांना जे बरेच दिवस जाणवत होते त्याचाच उच्चार प्राचार्यानी केला होता.
पूर्वी नीलेश "लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे" या वचनाप्रमाणे रोज लवकर दहा वाजण्याच्या आंत झोपत असे.सकाळी पाचला उठून अभ्यासला बसत असे.हल्ली त्याचे रात्री जागण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते.एका झोपेचे जागे होऊन पाहावे तर रात्री दोन वाजता सुद्धा तो जागा असे. त्याच्याजवळ मोबाईल नव्हता.त्याच्या खोलीत टीव्ही नव्हता.तो अभ्यासाचे किंवा अन्य पुस्तकही वाचत नसे.गादीवर आडवा होउन,डोळे सताड उघडे ठेवून,एकटक छताकडे पहात पडलेला असे. त्याच्या खोलीत गेले तरी त्याला त्याची दाद नसे.कित्येक वेळा हा डोळे उघडे ठेवून झोपी गेला आहे की मेला आहे अशी शंका येई.अक्षरश: त्याची कांहीही हालचाल दिसत नसे.त्याच्याकडे पाहताना निरनिराळे विचार मनात येऊन धडकी भरत असे.सकाळी नऊ वाजले तरी तो उठत नसे.पूर्वी त्याच्या जीवनात शिस्त होती.जेवण झोप अभ्यास खेळ प्रत्येक गोष्ट वेळच्यावेळी तो करीत असे.हल्ली त्याचा कशाचाच ताळमेळ राहिला नव्हता.
पूर्वी त्याची शेजाऱ्यांशी वर्तणूक आदराची प्रेमाची असे.कोणीही सांगितलेले काम तो तत्परतेने करीत असे.हल्ली काम टाळण्याची त्याची प्रवृत्ती होती. एवढेच नव्हे तर शेजाऱ्यांशी तो उर्मटपणे वागत असे.
मुलींकडे बायकांकडे विचित्र नजरेने तो बघत असे.त्याबद्दल त्यांच्याकडे तक्रारीही आल्या होत्या.पूर्वीचा नीलेश आणि त्याला झालेला अपघात लक्षात घेऊन शेजारी त्याला माफ करीत असत.परंतु हे फार दिवस चालणे शक्य नव्हते.शेवटी एक दिवस त्याची तक्रार पोलिसांत केली असती .
शेजार्यांचे काय घरचे कामही तो व्यवस्थित करीत नसे .टाळाटाळ करण्याची उडवाउडवी करण्याची त्याची प्रवृत्ती वाढली होती.जर त्याच्या मनाविरुद्ध झाले की तो इतक्या रागाने बघत असे किं त्याच्या आईला कांही बोलण्याचे सुचत नसे .तिला धडकी भरत असे.
त्याच्यासोबत घरात एकटे राहण्याला त्याची आई घाबरू लागली होती.तिची भीती,तिची काळजी, तिची व्यथा,तिने बाबांजवळ अनेकदा बोलून दाखवली होती. बाबांनासुद्धा त्याची अनेकदा भीती वाटत असे.
पूर्वी तो तसा नाजूक होता.ताकदीची कामे त्याला विशेष जमत नसत.हल्ली कॉट सरकवणे, लोखंडी कपाट सरकवणे,ही कामे तो लीलया करीत असे.एकदा बाजारातून गव्हाची दोन पोती बेगमीची म्हणून आणली होती.ती त्यांनी लीलया उचलून घरात आणली.त्याची ती विलक्षण ताकद बघून अचंबित व्हायला झाले होते.
हल्ली त्याची भाषाही बदलली होती.गळा दाबीन,डोके फोडीन, तंगड्या तोडीन,जीव घेईन,रक्त पिईन ,नरडीचा घोट घेईन,अशी त्याची भाषा हिंस्र झाली होती.
पूर्वी त्याला मांसाहार विशेष आवडत नसे.हल्ली मोठय़ा चवीने तो मांसाहार करू लागला होता.चिकन, मटणासाठी,तो आरडाओरडा करीत असे.
*त्याच्या दिसण्यातही फरक पडला होता. *
*त्याचे डोळे बटबटीत, खोबणीतून बाहेर आलेले, डोळ्याभोवती काळी वर्तुळे व सुजलेले दिसत असत.*
*गालाची हाडे वर आल्यासारखी वाटत.तो थोडा खप्पड झाल्यासारखा वाटत होता.*
*त्याचे दातही थोडे विचित्र वाटू लागले होते.सुळे जास्त मोठे व धारदार वाटत होते.*
*त्यामुळे तोंडाचा आकार बदललेला वाटत होता.*
(क्रमशः)
२२/११/२०२०©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com