Get it on Google Play
Download on the App Store

१० मुका २-३

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

नवीनचंद्र व सौदामिनी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

शेवटी रागाच्या भरात कोपऱ्यात उभा केलेला सोटा हातात घेऊन नवीनचंद्रने सौदामिनीच्या डोक्यात मारला.

वर्मी मार लागल्यामुळे सौदामिनी तिथल्या तिथे रक्ताच्या थारोळ्यात आडवी झाली.बहुधा ती तिथल्या तिथे मृत झाली असावी.

कशी कोण जाणे डोके फुटलेली, रक्ताने लडबडलेली, सौदामिनी ताडदिशी उभी राहिली.

अकस्मात उभी राहिलेली सौदामिनी पाहून तो दचकला.नवीनचंद्र तिच्याकडे विस्फारित नजरेने पाहात होता.

डोके फुटलेल्या रक्तबंबाळ सौदामिनीने त्याच्या हातातील सोटा हिसकावून घेऊन  तो सारिकेच्या डोक्यावर मारला. सारिका तिथेच त्याच क्षणी ढेर झाली.

दुसऱ्याच क्षणी सौदामिनी सारिकेच्या शरीरात शिरली होती.सौदामिनीचे धड धाडदिशी खाली पडले.

सारिकेच्या शरीरात सौदामिनी शिरल्यावर ती ताडकन उभी राहिली.हे काय चालले आहे ते नवीनचंद्रच्या लक्षात येत नव्हते.  तिच्या शरीरात शिरलेल्या सौदामिनीने तोच सोटा नवीनचंद्रच्या डोक्यात सर्व बळ एकवटून मारला. दुसऱ्याच क्षणी डोक्याचे दोन तुकडे होऊन नवीनचंद्र जमिनीवर कोसळला होता.  

तीन प्रेते जमिनीवर पडली होती.अासमंत स्तब्ध होते. तिथे काय होत आहे, काय झाले, त्याची खबर कोणालाही नव्हती. 

रात्रभर दिवे तसेच भगभगत होते.वाडय़ामध्ये कुणीतरी आल्याशिवाय काय झाले ते बाह्य जगाला कळण्याचा संभव नव्हता.  कुणीतरी पोलिसांना कळवल्यावरच पोलिस येणार होते.

इनामदारी गेल्यावर उत्पन्नही गेले.खर्च कमी करावा लागला.कामही कमी झाले होते. जरी बहुतेक सर्व जणाना नोकरीवरून काढून टाकण्यात आले असले, वाडय़ाच्या मागील क्वार्टर्स रिकाम्या असल्या, तरी अजून एक जोडपे कामावर होते.वाड्याचा वापरात असलेला खालील भाग झाडणे, पुसणे,छोट्याशा शिल्लक राहिलेल्या बागेची देखभाल, स्वयंपाक पाणी इत्यादी कामे ते जोडपे करीत असे.रात्री ही घटना घडली तेव्हा रात्रीचा एक वाजला होता.त्यावेळी ते जोडपे गाढ झोपेत होते.वाडय़ातील प्रकाश,क्वार्टर्स पर्यंत अर्थातच पोहोचत असे.परंतु आवाज पोहोचत नसे.हल्ली वाड्यात नेहमीच नाच गाणी चाललेली असत त्यामुळे वाड्यात असलेल्या प्रकाशाकडे,क्वचित येणाऱ्या आवाजाकडे  कुणीही लक्ष देत नसे. 

सकाळी ते जोडपे कामावर आले तेव्हां वाड्याचे दरवाजे सताड उघडे होते.त्याचेही त्यांना इतके आश्चर्य वाटले नाही.परंतु सर्वत्र दिवे प्रकाशत होते त्याचे त्यांना आश्चर्य वाटले.दिवे बंद न करता ही मंडळी अजून डाराडूर झोपलेली कशी असा विचार त्यांच्या मनात आला. फिरता फिरता  दिवाणखान्यात त्यांना तिघांचीही प्रेते पडलेली दिसली.तिघांचीही डोकी कमी जास्त प्रमाणात फुटली होती.तिघांचेही रक्त एकत्र होऊन एकच मोठे थारोळे झाले होते.तेही सुकत आले होते.दिवाणखान्यातील एकूणच दृश्य भयाण होते.एखादा तर ते सर्व बघितल्यावर  झीट येऊन  आडवा झाला असता.गावात पोलीस चौकी होती.त्यांना कळविण्यात आले.पोलीस फौजफाटा हजर झाला. दरोडा पडला त्या झटापटीत  तिघांना मारण्यात आले.असा पोलिसांचा प्रथम समज झाला.सर्व किमती चीज वस्तू जशाच्या तशा होत्या.सौदामिनी व सारिका यांच्या अंगावरील दागदागिने तसेच होते.तिजोरी बंद अवस्थेत होती. खुनाचे हत्यार तिथेच पडले होते.हे सर्व पाहिल्यावर दरोड्याचा अंदाज चुकला होता हे पोलिसांच्या लक्षात आले.कुणी कुणाला मारले कळत नव्हते.तिघेही मेले कसे याचा उलगडा होत नव्हता.मारामारी झाल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते.खुनी हत्यार  एकच दिसत होते.एकाच हत्याराने तिघांची डोकी कशी फुटली, आणि कोणी फोडली, ते कळत नव्हते.पंचनामा करण्यात आला.ठसे घेण्यात आले.सोट्यावर तिघांचेही ठसे होते.प्रेते जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आली.

बाहेरून कुणीही हल्ला केल्याचे चिन्ह दिसत नव्हते.तिघेही मेली कशी याचा उलगडा होत नव्हता.सौदामिनीच्या माहेरचे गाव कोसो दूर होते.त्यांना कळविण्यात आले.त्याचवेळी सौदामिनीचा भाऊ व वहिनी कुठेतरी पर्यटनाला गेली होती. पोस्टमॉर्टेमनंतर पोलिसांनी तिन्ही  प्रेताना भडाग्नी दिला.खुनाची केस सुटत नाही म्हणून फाईल बंद करण्यात आली.आठ दिवसांनी पर्यटनाहून परत आल्यावर सौदामिनीच्या भावाला झालेली घटना कळली.सर्व कांही संपले असल्यामुळे त्याने तो विषय मनातून काढून टाकला.वाड्याला कुलूप लावण्यात आले.कामावर असलेले जोडपे आपल्या घरी निघून गेले.

कुणीही वारसा हक्क सांगण्यासाठी आले नाही.एक दिवस चोरांनी कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला.एवढा मोठा वाडा त्यामध्ये किमती चीजवस्तू असणारच त्यावर डल्ला मारण्याच्या हेतूने चोरांची टोळी आली होती.आत गेल्यावर त्यांना आपण कुठे आहोत ते कळत नाहीसे झाले.ते वाड्यातल्या वाडय़ात भिरभिर फिरत राहिले.त्यांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने बेदम चोप दिला.त्यांना मार पडत होता परंतु मारणारी व्यक्ती दिसत नव्हती.शेवटी त्यांना कुणीतरी उचलून कुंपणाबाहेर फेकून दिले.

गावातील काहीजणांनी उघड्या असलेल्या वाडय़ात शिरण्याचा प्रयत्न केला.जो आत शिरे त्याची अवस्था स्मृतिभ्रंश झालेल्या माणसासारखी होई.एकदा एकाने वाड्याच्या गच्चीवर जाऊन तिथून खाली उडी मारली.त्याच्या शरीराचे इतक्या उंचीवरून  फरशीवर आपटल्यामुळे तुकडे तुकडे झाले.दुसऱ्या एकाने विहिरीत उडी मारून जीव दिला.एकाला आंत शिरल्यावर कुणीतरी बुकलून बुकलून मारले.नंतर कुणाचीही आत शिरण्याचा हिम्मत होत नव्हती. झाडावरील आंबे चोरणे,फणस काढण्याचा प्रयत्न करणे, खाली पडलेली फांदी जळणासाठी तोडून नेणे,असे प्रयत्न करणाऱ्यांना कुणीतरी धरून मारीत असे.कोण मारीत असे ते कळत नसे. वाड्यासंबंधी अनेक अफवा पंचक्रोशीत पसरल्या.भूत आहे.भुते आहेत.बदमाशांची टोळी आत राहते.छुपा दारूचा अड्डा आहे.दहशतवादी राहतात.वाड्याला तळघर व तळघरातून बाहेर जायला चोरटी वाट आहे.अशा एक ना दोन  अनेक अफवा पसरल्या. 

वाड्या बाहेरून नवीन हमरस्ता बांधण्यात आला. हायवेवरून जाणाऱ्याला वाडय़ाची हकिगत कांहीच माहीत नसे.जो कुणी कांही कारणाने आत जाई त्याला विचित्र अनुभव येत.एखादी बाई कोणत्याही आधाराशिवाय उलटी टांगलेली दिसे.सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तिचे रूप भयानक असे.ती कधी स्पष्ट दिसे. कधी धूसर दिसे.ती आपली रूपे बदलत असे.  

जरी वयस्क अनुभवी लोकांनी वाड्याच्या हद्दीत जाऊ नको म्हणून सांगितले तरी तरुण मंडळी ऐकत नसत.जो कुणी   आंत जाण्याचा प्रयत्न करी त्याला विचित्र अनुभव येत.हळूहळू  वाड्याबद्दलच्या खर्‍या  खोट्या अनेक अफवा पंचक्रोशीत पसरल्या.तिथे हडळीचा मुक्काम आहे अशी सर्वांची खात्री होती.वारस नसल्यामुळे सर्व इस्टेट सरकारजमा झाली.सरकारतर्फे इस्टेटीचा कांही ना कांही वापर करण्याचा प्रयत्न झाला.त्या तथाकथित हडळीने  कुणालाही इस्टेटीचा वापर करू दिला नाही.इस्टेट तशीच पडीत राहिली.शेवटी कित्येक दशकांनी सुरूवातीलाच वर्णन केलेली अवस्था अस्तित्वात आली.

दशमाने नावाचे एक कलेक्टर बदलून आले होते.त्या वाडय़ासंबंधीची सर्व फाईल त्यांच्या पाहण्यात आली.त्यांनी आपल्याबरोबर लवाजमा घेऊन इस्टेटीला एकदा भेटही दिली.त्यांनी एका ज्योतिषाला या हडळीवर उपाय काय असे विचारले.त्याने एका नामांकित दशग्रंथी ब्राह्मणाकडे त्यांना पाठविले.त्यांचा या विषयांतील अभ्यास दांडगा होता.शास्त्रोक्त तर्कशुद्ध पध्दतीने विचार करून आणि त्याप्रमाणेच अंत:प्रेरणेने ते काय करावे ते सांगत असत.त्यांनी पुढील उपाय सुचविला.ते म्हणाले,

*एकूण तीन मृत्यू झाले.त्यांच्यावर विधिवत अग्निसंस्कार केले गेले नाहीत.*

*कारण त्यांचे कुणी नातेवाईक किंवा मित्र तिथे नव्हते.*

*मृत्यूनंतर पुढील गतीला जाणे बर्‍याच  जणांसाठी स्वाभाविक असते. धार्मिक कृत्यांसाठी मृत्यूनंतरच्या विधिवत संस्कारासाठी त्यांचा आत्मा थांबत नाही.तो त्याच्या गतीने पुढे जातो.*

*परंतु कांही जणांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी असते. या वाड्यातील तथाकथित हडळ या दुसऱ्या गटातील आहे.*  

* भडाग्नी देऊनही नवीनचंद्र व सारिका पुढील गतीला गेले.बिचारी सौदामिनी मात्र येथे लटकून पडली आहे.*

*तिची हाडे मिळणे आता शक्य नाही.तिच्या खास वापरातील एखादी वस्तू जर मिळाली तर तिचा उपयोग करून, त्यावर सर्व संस्कार विधिवत करून,जर त्याला अग्नी दिला आणि अवशेष गंगा समर्पण केले.तर ती पुढील गतीला जाईल.*

(क्रमशः)

१३/७/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com