Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ११

“गणपती बाप्पा अंतर्धान पावले परंतु मी मात्र त्या कारागृहात होतो.”

राजपुत्र नंदीतेज बोलत होता...

“ मी भानावर आलो, मला हे आता पक्के लक्षात आले होते कि मी स्वप्न पाहत नव्हतो. पिताश्री, आता माझी जी अवस्था आपण पाहत आहात हि माझी शिक्षा आहे आणि हिचा मी स्वत: स्वीकार केला आहे. या शासनातून मुक्त होण्याचा कोणताही मार्ग नाही. मी तुम्हाला अनुरोध करतो कि आपण मला त्याच कारागृहात डांबून ठेवावे. उद्या माझे शरीर पूर्णपणे एका स्त्रीच्या शरीरात परिवर्तीत होईल आणि माझे अस्तित्त्व आपणा सर्वांच्या विस्मृतीत जाईल. कोणालाही कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज आपणास पडणार नाही ज्यामुळे आपणास लज्जित व्हावे लागेल.”

राजपुत्राचे हे शब्द ऐकून सम्राट सेतूपती याचे हृदय हेलावून निघाले.  आपला जिवंत असलेला पुत्र विस्मृतीत जाईल. संपूर्ण प्रजादेखील आपल्या प्राणप्रिय राजपुत्राला विसरून जाईल. अशाप्रकारे आपण मृत परीजानाना देखील विसरत नाही. आणि राजपुत्र? त्याचे काय? त्याला तर संपूर्ण जीवन या अवस्थेत हाल अपेष्टा सहन करत कारागृहात राहावे लागेल? किती दु:खदायक आयुष्य असेल जेव्हा ते सर्वांना ओळखतील परंतु त्यांना कोणीच ओळखू शकणार नाही. ह्या विचारानेच केवळ सेतूपती व्यथित झाला आणि म्हणाला,

“ हे गणराया, हे शक्य आहे का कि तू माझ्या पुत्राला क्षमा कर आणि त्याच्या ऐवजी तू मला....” महाराज पुढे काही बोलणार इतक्यात मोरयाशास्त्री यांनी महाराजांना अडवले.

“ क्षमा करा महाराज, परंतु धनुष्यातून बाण सोडताना आणि मुखातून शब्द बाहेर काढण्यापूर्वी हजार वेळा विचार करणेच योग्य! आपण काळजी करू नका. राजकुमार नंदीतेज यांच्या या अवस्थेवर नक्कीच काही न काही उपाय सापडेल. स्वत: गणपती बाप्पाची देखील हीच ईच्छा असणार. हेच कारण असावे त्यांनी मला येथे येण्याची आज्ञा केली.”

असे म्हणून मोरयाशास्त्री यांनी वज्रसेनाकडे कटाक्ष टाकला.

“ वज्रसेन, तू आता महाराजांची आज्ञा घ्यावीस आणि राजकुमारांना फलाहार करण्यास घेऊन जावेस. त्यानंतर त्यांना त्याच कारागृहात सोडून यावेस.”

पुन्हा त्याच कारागृहात सोडून येण्याची गोष्ट वज्रसेनला पटली नाही तो व्याकूळ झाला आणि महाराजांकडे पाहू लागला. परंतु महाराज काही काहीच बोलू शकले नाहीत. राजपुरोहित यांनी देखील वज्रसेन याला मोरयाशास्त्री यांचा आदेश पालन करण्यास सांगितले.

त्यानंतर महाराज आणि राजपुरोहित यांचा निरोप घेऊन मोरयाशास्त्री राजप्रसादातून बाहेर पडले. चालत चालत दूरवर एका शांत ठिकाणी जाऊन पोहचले. त्यांनी त्या ठिकाणची थोडीशी माती जमा केली आणि त्यापासून गणरायाची एक मंगलमुर्ती तयार केली.

ती मूर्ती त्यांनी जवळच्याच एका शमीच्या झाडाखाली स्थापन केली. तिची मनोभावे पूजा केली आणि उच्छिष्ट गणेशाला आवाहन केले. त्या मूर्तीवर त्यांनी सोबत आणलेल्या २१ दुर्वांच्या जुड्या वाहिल्या. जास्वंदीची फुले वाहिली. पाच फळे नेवैद्य म्हणून अर्पण केली. त्यानंतर मोरयाशास्त्री काही वेळ ध्यानस्थ बसले. नंतर ते म्हणाले,

“ हे गणराया? हां काय विचित्र खेळ मांडला आहेस देवा? तुझी आज्ञा झाली म्हणून तर मी या राज्याच्या राजपुत्राचा युवराज्याभिषेक करण्यासाठी मी इकडे आलो. परंतु येथे आल्यावर कळले कि तुझ्या इकडे अजबच लीला सुरु आहेत. जर तुझी ईच्छा होती कि युवराजाचा राज्याभिषेक पाहावा तर मग या मंगल कार्यात विघ्नहर्ता बनण्याऐवजी विघ्नकर्ता का बरं झाला आहेस? हे गणपती बाप्पा, आता मी इतक्या दूरवर आलो आहे तर मी हं राज्याभिषेक सोहळा पार पडल्याशिवाय जाउच शकत नाही. तर सत्वर सांगावे यावर उपाय काय आहे?”

मोरयाशास्त्री गणरायाचे परमभक्त होते. त्यांच्या केवळ आर्त आवाहनामुळे ती मंगलमुर्ती गालातल्या गालात हसली आणि बोलू लागली.

“ मी काय करू शकतो, मोरयाशास्त्री? राजपुत्र नंदीतेज याने स्वत: हि शिक्षा निवडली आहे.”

“ सत्य आहे. परंतु राजकुमार असाच दंडित अवस्थेत आयुष्यभर राहणार होता तर मला दृष्टांत देऊन इकडे येण्याची आज्ञा का बरे केलीस,  गणराया?” मोरयाशास्त्री

“ मोरयाशास्त्री, राजकुमाराचे मन पश्चातापाने व्याकूळ झाले आहे. आपले दुष्कर्म लक्षात घेऊन त्याने स्वत:च आजीवन कारावास भोगण्याची शिक्षा स्वीकार केली आहे. हि शिक्षा त्याचे आयुष्य संपेपर्यंत त्याला भोगावी लागणार.”

“ अच्छा, आले लक्षात.” असे म्हणून मोरयाशास्त्री यांनी त्या मूर्तीला प्रदक्षिणा घातली. मग एक साष्टांग दंडवत घातला आणि त्या मूर्तीचे उत्तरपूजन करून जवळच्याच एका तलावात विसर्जन केले. नंतर ते राजप्रासादात निघून गेले.

क्रमश: