Get it on Google Play
Download on the App Store

भाग 3

भाग 3


अजय हे सर्व ऐकून सुन्न झाला होता. एक दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला, "म्हणजे, आपली स्पर्धा फक्त क्लाराशी नाही तर काळाशी सुद्धा आहे! त्यामुळे आपण आता जास्त वेळ दडवून चालणार नाही! पण क्लाराने सांगितलेले नक्की खरे होते का? की आपली दिशाभूल करायला तिने हे सगळे सांगितले? खरच तिच्यात आणि शिवराजमध्ये लढाई होईल?"

पवन म्हणला, "माझे मन मला मनापासून सांगते आहे की, जर मला हनुमानाने पुन्हा इकडे येण्याचा मार्ग दाखवला आहे, तर तिने सांगितलेले खरेच असेल. कदाचित तुझे रूप तिने घेतले असल्याने तिला जास्त खोटे बोलता आले नसावे. बरेचदा आपण ज्याचे रूप घेतो तसेच बनून जातो! तूच मला एकदा रावणाची कथा सांगितली होती, आठवते?"

"होय, तुझे म्हणणे बरोबर आहे. रावणाने सीतेला आपलेसे बनवण्यासाठी सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले तेव्हा तिच्यावर प्रभाव टाकण्यासाठी रामाचे रूप घेतले पण त्याच्या मनातील पापी विचार नाहीसे झाले. तो वाईट विचार करूच शकत नव्हता!", अजयने सांगितले.

"पण इंद्राने अहिल्येला मिळवण्यासाठी गौतम ऋषींचे रूप घेतले तेव्हा मात्र असे झाले नाही!"

"ते कोण कोणाचे रूप घेतो, त्या त्या व्यक्तीच्या स्वभाव आणि प्रवृत्तीवर सुद्धा अवलंबून असते!"

"खरे आहे! चल तर मग! आता आपण आपल्या टीमकडे जाऊ!", पवन म्हणला आणि ते टीमकडे गेले.

"काय रे! इतका वेळ हेड लॅम्प शोधायला? हेड लॅम्प शोधत होते का गप्पा मारत होते?", करण.

"दोन्ही!", अजय आणि पवन एकदम म्हणाले आणि टाळी देत हसायला लागले.

अजय आणि पवन दोघेही सोबत चालत होते.

शिवराज बऱ्याच वेळेपासून अस्वस्थ होता. त्याला अजय ला काहीतरी सांगायचे होते, पण अजून हिम्मत होत नव्हती असे वाटते होते.

अंधाऱ्या गुहेत चालत असताना शक्य तितक्या जोड्या एकमेकांच्या हातात हात धरून चालत होते. गुहेतले वातावरण आता चांगलेच थंड आणि ओलसर होते. प्रत्येक पावलासोबत त्यांच्या बुटांचा आवाज गुहेच्या भिंतींवर आपटत होता, जो त्यांच्या मनात भीती निर्माण करत होता.

अचानक, करणच्या पायाखालून जमीन सरकली आणि तो किंचाळत खाली कोसळला. त्याच्या आवाजाने सगळे घाबरून गेले आणि एकमेकांना घट्ट धरून उभे राहिले. अमरने टॉर्चचा प्रकाशझोत त्याच्या दिशेने फेकला. खाली मोठा काळा खड्डा दिसत होता, पण एका खडकाला धरून ठेवल्याने करण त्या खड्ड्यात पडता पडता वाचला होता. शिवराजने पटकन त्याला हात देऊन वर ओढले. करण सावरला. करण पडला होता तेव्हा स्वराचा चेहरा मात्र भीतीने पंधरा पडला होता. तिला करण बद्दल आत्मीयता वाटू लागली होती. करण खड्ड्यात पडण्यापासून वाचताच ती त्याला जाऊन बिलगली. करण तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. तिला प्रेमाने कुरवाळू लागला. तिच्या केसांतून हात फिरवू लागला, तिच्या कमरेवर त्याने एक हात ठेवला आणि तिला आणखी जवळ ओढले. तेवढ्यात अमरने मोठ्याने खकारून दोघांना जाणीव करून दिली की गुहेत ते दोघेच नाहीत, इतर जण सुद्धा आहेत. तेव्हा स्वरा बाजूला झाली आणि चक्क लाजली. या घटनेदरम्यान क्लारा मात्र सर्वात मागे उभी होती.

"अरे वा! एक पोरगी लाजली रे बाबा!", करण तिला चिडवू लागला.

"एक पोरगी प्रेमात पडली!", अमर म्हणाला.

"चल! काहीतरीच काय?", असे म्हणून तिने लाजून चेहऱ्यावर दोन्ही हात झाकले.

"मित्रांनो, बास झाली प्रेमकहाणी! सध्या थ्रिलर स्टोरी सुरु आहे, लव्ह स्टोरी नाही! आटपा तुमचे लवकर!", पवन म्हणाला.

तेव्हा अचानक गुहेत एक गडगडाट ऐकू आला आणि गुहेची भिंत हलू लागली. त्यांच्या आजूबाजूला छोटे छोटे खडक खाली पडू लागले. हे पाहून सर्वांचीच धडधड वाढली. ते जागेवरच थबकले आणि एकमेकांना सांभाळत पुढे जायचा मार्ग शोधू लागले. आता पुढचा रास्ता बंद झाला होता पण खालच्या बाजूला तीन वेगवेगळ्या दिशांना तीन मोठे भुयार दिसत होते.

कोणत्या भुयारतून पुढे जायचे असे ठरत असतांना क्लारा म्हणाली, "वुई मस्ट गो विथ दी मिडल वन! मधल्या भुयारतून जाऊ!"

शिवराज म्हणाला, "नाही! उजव्या भुयारात जाणे योग्य राहील!"

क्लारा, "नो! माधल्या!"

शिवराज चिडला, "नाही! राइट साइड ओन्ली! यू व्हिलन!"

क्लारा, "व्हॉट? हाऊ डू यू देअर टू से धीस?" काशी हीमत जाली तुजी?"

शिवराज, "मला माहीत आहे तू नागकन्या आहेस. आणि आम्हा सर्वांना तू दिशाभूल करून नाग लोकात घेऊन चालली आहेस! मी हे होऊ देणार नाही! तू आम्हा सर्वांना पण नागलोकात घेऊन जाणार आणि आम्हाला न मारता आमचे रूपांतर पण नागात करणार! अशा रीतीने तुम्ही तुमची सेना वाढवणार आहात, आणि पुन्हा देवांवर आक्रमण करणार आहात! "

अमर हसायला लागला, "व्हॉट? नागकन्या? ब्रिटिश लोकांमध्ये पण नागकन्या असते?"

सर्वजण हसायला लागले. पवन आणि अजयला आता समजले की तो प्रसंग आला आहे.

शिवराज म्हणाला, "परदेशी पर्यटक तरुणी सोबत भारतीय मुले एक आकर्षण म्हणून लगेच मैत्री करतात हे माहीत असल्याने तिने विदेशी तरुणीचे रूप घेतले!"

आपले रहस्य माहीत पडले हे कळताच क्लारा चिडली. तिच्या पायांवर आणि चेहऱ्यावर नागाच्या त्वचेवर असतात तसे खवले उमटू लागले. सर्वजण आ वासून हे दृश्य बघत होते.

क्लारा फुत्कारत म्हणली, "मी तुम्हाला कुणालाच सोडणार नाही. शिवराजला तर मी सर्वात आधी मारेल. पण शिवराज, तुला माझे रहस्य कसे माहीत?"

शिवराज हसत म्हणाला, "मला ओळखले नाहीस? मी पण नाग लोकतील एक नागकुमार! मला कर्कोटकीची योजना आधीपासून माहीत होती. सध्या जे काही नाग लोकात चालले होते ते मला आवडत नव्हते. म्हणून मी काही दिवसांपूर्वी नागलोकाचा त्याग केला आणि पृथ्वीवर आलो. तुझ्यावर पाळत ठेवली."

क्लाराचा आक्रमक पवित्रा बघतच पवन मध्ये पडणार तेवढ्यात क्लाराने शिवराजवर हल्ला केला. स्वरा आणि मीना शिवराजला वाचवायला म्हणून क्लाराला मागे खेचू लागल्या तेव्हा तिने दोघींना जोरात ढकलले. त्या खाली जाऊन पडल्या. मग क्लारा अर्धी साप आणि अर्धी मानव बनली आणि आपल्या शेपटीने तिने शिवराजला गुंडाळण्याचा प्रयत्न केला. अजयने एक बाजूला पडलेला दगड उचलून क्लाराकडे फेकणार तेवढ्यात क्लारा चां पाय घसरला आणि ती अंधारातील जवळच्या एका लाकडी दरवाजाकडे घसरत गेली आणि तो दरवाजा उघडून ती गायब झाली.

सगळे इतके आश्चर्यचकीत झाले की समोरचे घडले त्याचे अजून त्यांना आकलन होत नव्हते. त्यातच पवन म्हणाला, "पुढे काय घडले ते मला माहिती आहे!"

त्यामुळे त्यांच्या गोंधळात आणखी भर पडली.

मग पवनने सगळ्यांना आतापर्यंत घडलेला सर्व प्रसंग सांगितला.

शिवराज म्हणाला, "अच्छा म्हणजे असे आहे तर! मग तो नीलमणी आपण लगेच मिळवायला हवा. मग तळ्यातील विष नष्ट करून पाच मासे हस्तगत करायला हवे. त्याद्वारे हे नागलोक नष्ट करायला हवे!"

"तुला आम्ही चुकीचं समजलो, तुझ्यावर संशय घेतला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत!", स्वरा आणि मीना म्हणाले.

"हरकत नाही. प्रसंगानुसार तुमचा संशय बरोबरही होता. सगळेजण वेगवेगळे गुहेत शिरलो असतो तर क्लाराने दगा फटका केला असता आणि इतर गुहेतील काहीजण वाचले असते, असा विचार करून मी वेगवेगळे जायचे म्हणत होतो! या तीन भुयारी मार्गांपैकी मधला मार्ग ज्यावर क्लारा अडून बसली होती तोच नागलोकाचा मार्ग होता! हे मला माहिती होते, म्हणून मी विरोध केला तेव्हा ती चिडली! ती कसेही करून तुमच्या सोबत मोहिमेवर आलीच असती पण त्या रात्री तुम्ही सर्वजण आयतेच तिच्याकडे गेलात त्यामुळे तिचे काम आणखी सोपे झाले. "

"मग आता इथून बाहेर कसे पडायचे?", मीनाने विचारले.


"हा उजव्या बाजूचा भुयारी मार्ग आहे तिथून! काळजी करू नका. मी अर्धा नाग आणि अर्धा मनुष्य अशा रुपात परावर्तित होईल आणि तुम्ही सर्व माझ्या अंगावर बसा. मी सरपटत या भुयारी मार्गातून वेगाने तुम्हाला बाहेर घेऊन जाईन! हा मार्ग भुयाऱ्यातून सहाव्या पर्वताकडे जातो. तिथून पर्वताच्या आत मधल्या भुयारातून वरच्या मंदिरात जाईन, पूर्ण साप रूपामध्ये तो घंटेतला नीलमणी हस्तगत करेल आणि पुन्हा खाली येईल. तोपर्यंत तुम्ही सर्वजण खाली तळ्याजवळ थांबा", शिवराज म्हणाला.

अंधाऱ्या गुहेतून पुढे जाताना अमर, पवन, स्वरा, मीना, करण, अजय शिवराजच्या पाठीवर बसले होते. त्याच्या अंगावर मजबूत, खडबडीत खवले चमकत होते.

गुहेतील वातावरण थंड आणि ओलसर होते, पाण्याच्या टपकण्याच्या आवाजाने वातावरण अधिक गूढ झाले होते. नागाच्या भुयारतून सरपटण्याच्या आणि चालण्याच्या प्रत्येक हालचालीने भुयारात एक प्रतिध्वनी निर्माण होत होता. सर्वजण एकमेकांच्या जवळ बसले होते, त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती, पण त्यांच्या डोळ्यांत एक चमक होती, तसेच अनपेक्षित आणि अद्भुत प्रवासाचा उत्साह!


"इमॅजीका मधले रोलर कोस्टर राईड, या आपल्या राईडच्या पुढे काहीच नाहीत. इथे येऊन खजिना मिळो न मिळो पण या राईडमुळे पैसे वसूल झाले बघा!"

"अरे शिवराज भाऊ जरा, उलटे पुलटे होऊन दाखव ना?"

"अरे वेड्यानो, मी उलटा पुल्टा होईल पण तुम्ही सीट बेल्ट लावलेले आहेत का? घरंगळत जाऊन उगाच कुठेतरी गुहेत जाऊन एखाद्या दरवाजावर पडाल आणि जाल महाभारत काळातील युद्धात! तिथे गेल्यावर लागेल एखाद दुसरा बाण आणि व्हाल जखमी"

"हा, ते पण बरोबर आहे म्हणा!"

"माझ्या खवल्यांना पक्के धरून ठेवा. मी आता वेग वाढवतो आहे!"

"ए! आपण हे सगळं संपलं ना की इथे परत येऊ आणि रामायण काळात जाऊ!"

"जाऊ जाऊ नक्की जाऊ. मी तर भविष्यकाळात जाईन. जेव्हा सगळीकडे रोबोटचे राज्य असेल!"

"मी तर अलेक्झांडरच्या काळात जाणार!"

आत पुढे गुहेतील भुयार अरुंद आणि गुंतागुंतीचे होते. नागाने त्याच्या सर्पाकृती शरीराच्या साहाय्याने सहजपणे त्या मार्गांमधून मार्ग काढला. आता कुणीच एकमेकांशी संवाद साधला नाही, फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज आणि नागाच्या पुढे जाण्याच्या आवाजानेच वातावरण भरले होते.

थोड्यावेळाने, ते एका मोठ्या पोकळीत आले.

आता त्यांच्यासमोर एक विशाल तळं दिसू लागलं, ज्याचा पाण्याचा पृष्ठभाग शांत आणि आरशासारखा होता. पाण्याच्या पृष्ठभागावर टॉर्चचा प्रकाश पडताच एक दिव्य तेज निर्माण झालं. नागाने तळ्याच्या काठावर थांबून सर्वांना खाली उतरवलं. ते सगळे विस्मयचकित झाले होते, तळ्याचं पाणी नितळ आणि निळसर रंगाचं होतं, जणू काही स्वप्नातील दृश्य!

त्या अर्ध नागाने त्या दिव्य तळ्याच्या काठावर उभं राहून एक मंत्र जपायला सुरुवात केली. त्या मंत्राच्या प्रभावाने तळ्याच्या पाण्यात एक हलचल निर्माण झाली आणि त्याच्या हातात एक प्राचीन भाला प्रकट झाला, ज्याच्या टोकाला तेज होतं.

सर्वजण त्या प्रसंगाने थक्क झाले होते, त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि विश्वासाचा भाव होता.

शिवराज म्हणाला, " हा भाला घ्या. एखादे संकट आल्यास ह्या भाल्याच्या मदतीने त्याचा सामना करा! तुम्ही सर्वजण इथेच थांबा! आता मी वर जाऊन तो नीलमणी घेऊन येतो!"

असे म्हणून शिवराज भुयारतून वर निघाला सुद्धा!

सर्वजण तळ्याकाठी बसले.

बराच वेळ झाला.

अमर म्हणाला, "हा शिवराज गेला नीलमणी आणायला! पण तो खरच आपल्याकडून आहे ना? की तोही क्लारा कडून आहे? दोघांनी मिळून नाटक करून आपल्याकडून नीलमणी कुठे आहे हे जाणून घेतले आणि ते दोघी आता नीलमणी घेऊन पसार तर होणार नाहीत ना? नाही म्हणजे, धूम टू पिक्चर मध्ये नाही का ऐश्वर्या राय नेमकी कोणाकडून आहे तेच लवकर समजत नव्हतं. ऋतिक कडून की अभिषेक बच्चन कडून! म्हणून म्हटलं!"

"ए अरे गप बस ना भाऊ! इथे प्रसंग काय आणि तुला चित्रपट कसला सुचतो रे?", त्याच्या पाठीतील एक गुद्दा हाणत करण म्हणाला.

स्वरा पण हसत हसत म्हणाली, "आपल्यासमोर जे घडतंय ते काय बाहुबली पिक्चर पेक्षा कमी आहे का? त्याचा अनुभव घ्यायचा सोडून तुला तो कसला चोर लोकांचा पिक्चर आठवतो! धूम टू?"

इकडे शिवराज पूर्ण सर्प रूपात मंदिराच्या घंटी वर चढला. त्यातून घंटेच्या जिभेवर म्हणजे आपण घंटी हाताने ज्याद्वारे वाजवततो त्यावर चढला. रात्र होती त्यामुळे मंदिरात कोणी नव्हते. त्या जिभेला घट्ट विळखा घालून तोंडाने जिभेच्या पुढचा फुगीर भाग त्याने तोडला, त्यातला नीलमणी तोंडात धरून ठेवला आणि पुन्हा त्याच वेगाने भुयारातून खाली तळ्याकडे येऊ लागला.

शिवराज आला आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

"हे घे अजय! तुझ्या हातून टाक तो मणी तळ्यात!" शिवराज म्हणाला.


* * *