भाग 4
गुहेतील दिव्य तळ्याकडे सर्वजण आश्चर्याने पाहत होते. अजयच्या हातात नीलमणी चमकत होता, जणू काही त्यात अमर्याद शक्ती होती. अजयने तळ्यात नीलमणी टाकण्याचा निर्धार केला आणि तो तळ्याकडे जाऊ लागला तेव्हा अचानक तळ्यातून खूप मोठी पाण्याची लाट उडून अजयच्या अंगावर आदळली आणि तो फेकला गेला, पण नीलमणी त्याच्या मुठीत घट्ट धरलेला होता. ते पाणी त्याने तोंडात आणि नाकात जाऊ दिले नाही. त्याने श्वास रोखून धरला. कारण ते पाणी विषारी होते.
आणि अचानक, तळ्याच्या काठावर एक स्त्री आली. तिचं शरीर कमरेपासून वर मानवाचं होतं, पण खाली एक लांब सर्पाकृती शेपटी होती. ती अत्यंत सुंदर, आणि भव्य पण धोकादायक दिसत होती. होय! ती कर्कोटकी होती. नागलोकचा अंत जवळ आल्याचे तिला क्लाराने सांगितले होते. क्लारा विविध काळ-दरवाज्यांतून नागलोकांत जाऊन पोहोचली होती. नाग लोकात क्लारा थांबली होती, आणि तिने सगळे सैन्य तयार ठेवले होते, गरज पडलीच तर ती येणार होती. कर्कोटकी स्वत: लढायला आली कारण तिला शिवराजवर राग होता. तिच्या डोळ्यांत प्रखर तेज होतं. ती अजयकडे रोखून पाहत ठाम आवाजात म्हणाली, "तू हा मणी तळ्यात टाकू शकत नाहीस आणि कुठे आहे तो गद्दार शिवराज? त्याचा मी आधी खातमा करते!"
शिवराज समोर आला, "माझे काय करायचे ते कर! पण मला तुझ्या अत्याचारी नागलोकाचा अंत करायचा आहे!"
"अरे वा? इतका काळ आमच्यात राहिलास, लहानाचा मोठा झालास आणि त्याचे पांग हे फेडलेस? तुला एक संधी देते. पुन्हा माझ्या बाजूने ये. मी तुला नाग लोकाचे सेनापतीपद देते!"
"मला कसल्याच पदाची अपेक्षा नाही. मला हे सर्व नवीन सहा मानव-मित्र मिळालेत हेच खूप झाले!"
"हे मानव-मित्र तुझ्या काय उपयोगाचे? मी एक फुंकर मारली की ते उडून हवेत अनेक कोस दूर जाऊन पडतील!"
"त्यांना हात तर लावून बघ. तुझी गाठ माझ्याशी आहे!"
कर्कोटकी खदाखदा हसायला लागली.
"बघा तरी! मला कोण आव्हान देत आहे? माझ्याच नागलोकातील एक साधा नागकुमार!"
तेवढ्यात संधी साधून पवनने भाला उचलला आणि तो कर्कोटकीकडे फेकला. तिने शेपटीने वेटोळे घालून तो भाला पकडला आणि फेकून दिला. तो अजयच्या बाजूला पडला.
अजय थोडा गोंधळला. त्याच्या एका हातात मणी होता पण त्याने धैर्य एकवटून दुसऱ्या हाताने भाला उचलला आणि तळ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. शिवराजकडचे तिचे लक्ष विचलित झाले आणि अजयला थांबवण्यासाठी आपली सर्पाकृती शेपटी कर्कोटकीने अजयच्या दिशेने झेपावली. तिच्या चपळ हालचालींमुळे अजयला सावधगिरीने पुढे जावं लागलं. त्यांच्यात एक तीव्र संघर्ष सुरू झाला.
तेव्हा नाग-कुमार शिवराज, पुढे आला.
त्याने कर्कोटकीला आव्हान दिलं, "कर्कोटकी, हा मणी तळ्यात अजय टाकणारच. तू त्याला थांबवू शकत नाहीस."
अजयने भाला शिवराजकडे फेकला. त्याने झेलला.
शिवराज आणि कर्कोटकी यांच्यात एक जोरदार युद्ध सुरू झालं. त्यांच्या चपळ हालचालींनी आणि शक्तीने तळ्याच्या काठी एक भयानक दृश्य निर्माण केलं.
शिवराज आणि कर्कोटकीमध्ये प्रचंड शक्ती आणि कौशल्याचं प्रदर्शन सुरू झालं. त्यांच्या सर्पाकृती शरीरांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी पुरेपूर वापर केला. शिवराजने आपल्या शक्तीने कर्कोटकीला पाठीच्या दिशेने जोरदार धक्का दिला, ज्यामुळे ती थोडीशी डगमगली. शिवराजच्या हातातील भाल्याचे टोक चमकायला लागले.
कर्कोटकी शिवराज सोबत लढण्यात व्यस्त होती, तोपर्यंत सर्वांनी अजयच्या आजूबाजूला संरक्षणाचं वर्तुळ तयार केलं, ज्यामुळे अजयला तळ्याकडे जायला संधी मिळाली. शेवटी अजयने वेगाने तळ्याच्या दिशेने तो मणी फेकला तो बरोबर मध्यभागी जाऊन पडला. गढूळ रंगाचे तळे एकदम स्वच्छ झाले. तेवढ्यात मध्यभागतील पाणी वर उसळले आणि त्या पाण्यातून पांच मासे वर उसळी मारून आले आणि त्या पाण्यातच तरंगत राहिले. ते उसळी मारणारे पाणीसुद्धा तिथेच कारंजासारखे उसळत राहिले.
जास्त वेळ लागला म्हणून क्लारा निवडक सैनिक घेऊन तळ्याकडे निघाली.
राहू केतू हे दोघे दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या एका अज्ञात ठिकाणी भरलेल्या शिबिरात गेलेले होते. त्यामुळे इथल्या घडामोडी त्यांच्यापर्यंत नाग लोकांतील कुणी पोहोचवू शकले नाही.
इकडे कर्कोटकी सावरली आणि तिने आणखी त्वेषाने शिवराजवर हल्ला केला. शिवराजने तो चुकवला. कर्कोटकीच्या कपाळाच्या मध्यभागी मारण्याचा चान्स शिवराजला मिळत नव्हता. तिथे मारले की कर्कोटकीला मृत्यू येणार असा तिला भगवान शिवाचा शाप होता. हे त्याने नाग लोकांत चोरून ऐकले होते. पण याची कर्कोटकीला कल्पना नव्हती. तिने शिवराजला आपल्या शेपटीत गोल गुंडाळून करकचून दाबले. तो जिवाच्या आकांताने ओरडू लागला. त्याच्या हातातून भाला खाली पडला. पण इतर कुणालाही "तो भाला कर्कोटकीच्या कपाळात मार" असे खुणेनेसुद्धा शिवराजला सांगणे जमत नव्हते.
आपण दोर गुंडाळून भोवरा जमिनीवर सोडून देतो तसे कर्कोटकीने शिवराजला शेपटीने भिरकावले त्यामुळे शिवराज हवेत गोल गोल गोल फिरत फिरत गुहेच्या एका भिंतीवर आपटून जोरात गरगरत खाली पडला.
कर्कोटकी त्वेषाने हसत दोन्ही हातांनी विजय दर्शवणारी छाती ठोकत होती आणि मोठी आरोळी देत होती.
घरंगळत शिवराज मीनाच्या पुढ्यात पायाशी येऊन पडला, त्याने तिला खुणेने भाला उचलून कर्कोटकीच्या कपाळाच्या मध्यभागी मारण्याची खूण केली.
मीनाने हवेत एक उंच उडी घेतली, भाल्यावर झेपावली आणि तो उचलून तिने नेम धरून पुनः उंच उडी मारली आणि बरोबर कर्कोटकीच्या कपाळाच्या दिशेने फेकला. तिला तो बरोबर लागला आणि कर्कोटकीचा अजस्त्र देह धडकन तळ्याच्या बाजूला कोसळला. जमीन अशी थरथरली की जणू काही भूकंप झाला. कर्कोटकी मेल्यामुळे क्लारा आणि इतर सैन्य पण मातीच्या ठिसुळ ढेकळासारखे फुटून नष्ट झाले. सर्वत्र ओली माती माती पसरली. मीनाने भाल्यासाहित जमिनीवर अलगद उडी मारली.
"अरे मीना! तू साडीतली सुपर हीरोईन, देसी वंडर वूमन आहेस की काय?", अजय अति आनंदाने म्हणाला.
मीना ऐटीत म्हणाली, "पुढच्या वर्षीच्या ऑलिंपिकमध्ये मी भालेफेक स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे! माझे खूप आधीपासून भालाफेकचे प्रशिक्षण सुरु आहे! काय समजलात मला तुम्ही लोक?"
"वा! ही मीना तर छुपी रुस्तूम निघाली!", स्वरा.
जमिनीवर रक्ताळलेल्या स्थितीत उठून बसलेल्या शिवराजला पण हसू आवरत नव्हते. तो हसत म्हणाला, "कमाल केलीत मीनाताई तुम्ही!"
"ए अजय! लवकर ते तरंगणारे मासे काढ तिथून आणि काढ ते पंचतत्व गोल त्यांच्यातून! मग तो खजिना", अमर.
"जरा दमानं घे! थोडा आराम कर! मेली ना आता ती, कर्बोदकी! थोडा आराम करूया, मग बाकीचे काम करू!", करण.
"कर्बोदकी नाही, कर्कोटकी!", अजय.
"अरे, नावात काय आहे! असे महान डेव्हिड हॅमिल्टन म्हणाला ते उगाच नाही!", पवन.
"अरे लिटरेचरच्या भुकेल्या साहित्यिक माणसांनो, मला जाम भूक लागली आहे. पोटात कावळे भुंकत आहेत! आधी पोटाचे बघा मग डोक्यात थोरा मोठ्यांचे विचार भरा!", स्वरा.
"इथे गुहेमध्ये फूड डिलिव्हरी होते का? म्हणजे होम डिलिव्हरी सारखे, केव्ह डिलिव्हरी!", करण.
"त्यासाठो मोबाइल तर चालू असायला पाहिजे ना!" अमर.
सर्वजण विजयाच्या आनंदात तिथेच लोळले कारण खूप थकवा आला होता. रात्रीचे किती वाजले याची सुद्धा कुणाला अजून माहिती नव्हती. तळ्याच्या मध्यभागी उसळलेल्या कारंज्याच्या वर ते पाच मासे अजूनही त्या पाण्यात गोल गोल उसळत तरंगत होते. गुहेतील काळोखात दूर असलेल्या एका कोनाड्यात एक विचित्र आकाराचा प्राणी बसला होता. आपले चमकणारे हिरवे डोळे रोखून तो त्या सर्वांकडे एकटक बघत होता.