पत्र पाचवे 5
धर्मांमध्यें कांही भाग अमर असतो. कांहीं त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणें असतो. अरब लोक आपसांत भांडत होते. त्यांचीं भांडणे मिटविण्यासाठी मुहंमद म्हणाले, '' आपसांत काय भांडता? दुनियेंत जा. जग तुमचें आहे. तुमचा धर्म जगाला द्या. '' आपल्या मराठयांच्या इतिहासांत असाच एक प्रसंग आहे. राजाराम महाराजांच्या वेळेस मराठे आपसांत भांडत होते. तेव्हां राजाराम महाराजांनीं असें फर्मान काढलें, '' दिल्लीच्या साम्राज्याचा जो जो मुलूख कोणी जिंकून घेईल, तो तो त्याला जहागीर म्हणून देण्यांत येईल ! हें जाहीर होतांच आपसांत भांडणारे मराठे सरदार हिंदुस्थानभर पसरले. दिल्लीच्या साम्राज्याचे लचके त्यांनीं तोडले. मुहंमदांनाहि त्या वेळेस तसा सल्ला द्यावा लागला. याचा अर्थ नेहमीच परधर्मीयांना मारा असा नव्हे. कुराणांत एक ठिकाणी लिहिलें आहे, '' ज्याप्रमाणें मला ईश्वरी ज्ञान झालें आहे, त्याप्रमाणें जगांत इतर महात्मांसहि झालें असेल. अरबांनों, तुम्ही मला मान देतां तसा त्यांनाहि द्या. '' मुसलमानी धर्मांत थोर तत्वें आहेत. त्याकडे आपण लक्ष दिलें पाहिजे. तो खरा धर्मात्मा कीं जो दुस-या धर्माविषयीहि आदरबुध्दि दाखवितो. तो खरा मातृभक्त्त, जो इतर मातांसहि मान देतो. तो खरा देशभक्त, जो इतर देशांच्या स्वातंत्र्याचीहि इच्छा करतो. जो दुस-या धर्माची टिंगल करील त्याला धर्म कळलाच नाहीं. गीतेनें सांगितलें आहे कीं '' जेथें जेथें मोठेपणा दिसेल तेथें तेथें माझा अंश मान ! ईश्वराचा मोठेपणा सर्वत्र भरलेला आहे. स्वामी विवेकानंद मुहंमदांच्या जन्मतिथीस उपवास करीत, ख्रिस्ताच्या जयंतीस उपवास करीत, ज्याप्रमाणें रामनवमी, गोकुळाष्टमीस ते उपवास करीत. विवेकानंदांना का हिंदुधर्मांचा अभिमान नव्हता? परंतु त्यांचा अभिमान मुहंमद पैगंबरांची पूजा करण्याइतका आर्य होता.
किंती सुंदर सुंदर संवाद व वचनें मुसलमानी धर्मग्रंथांतून आहेत. एके ठिकाणी प्रभूचा देवदूतांशीं झालेला संवाद आहे. देवदूत परमेश्वराला विचारतात, '' सर्वं जगांत बलवान काय? ''
देव म्हणाला, '' लोखंड. ''
त्यांनीं पुन्हा विचारले, '' लोखंडाहूनहि बलवान काय? ''
ते म्हणाले, '' अग्नि ! कारण अग्नि लोखंडाचा रस करतो. ''
त्यांनीं पुन्हा विचारले, '' अग्नीहून प्रबल कोण? ''
देव म्हणाला, '' पाणी. कारण पाण्याने अग्नि विझतो. ''
पुन्हा त्यांचा प्रश्न आला, '' पाण्याहून बलवान कोण? ''
तो म्हणाला, '' वारा. कारण वा-यामूळें पाण्यावर लाटा उत्पन्न होतात. ''
पुन्हा ते विचारते झाले, '' वा-याहून प्रबळ काय? ''
देव म्हणाला, '' पर्वत. कारण पर्वत वा-यांना अडवतात. ''
शेवटीं प्रश्न आला, '' पर्वताहून प्रबळ कोण? ''
देवानें उत्तर दिलें, '' परोपकारी हृदय. तें पाषाणासहि पाझर फोडील. ''
असे हे संवाद त्या धर्माचा गाभा आहे. '' तूं एकटा खाऊं नकोस. शेजा-याला तुझी भाकर दे. '' असें कुराण सांगतें. सुफी कवि म्हणतात, '' बाहेरच्या मशिदीचा दगड दुखावला गेला तरी चालेल, परंतु कोणाच्याहि दिलाची मशिद दुखवूं नकोस ! ''
आपण कच-याच्या पेटीजवळ कचरा टाकतो. तेथें धान्याचा अंकुर वर आलेला दिसतो. तो सुंदर अंकुर त्या कच-यांतून का वर आला? नाहीं. त्या कच-यात धान्याचा एक टपोरा दाणा होता. त्या दाण्यांतून तो अंकुर वर आला. कच-यांत ती शक्ति नव्हती. जगांत जें सत्य आहे त्याचीच वाढ होते. जी कांहीं पुण्याई असते ती फळत असते. ती पुण्याई संपली म्हणजे भाग्य संपतें. जगांत कोठेंहि कोणाचाहि जो विकास होतो, तो त्यांच्या पापांमुळे होत नसतो. काहींतरी सत्अंश त्या पापसंभारांत असतो. तो सत्अंश वाढतो.