Get it on Google Play
Download on the App Store

पत्र सातवे 1

दीनदलितांचा कैवार हाच खरा धर्म !

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.

आज खूपच थंडी आहे. बाहेरच्या गुलाबावरच्या कळया नीट फुलल्या नाहींत. सूर्याची ऊब मिळेल तेव्हां त्या फुलतील. प्रेमाची ऊब सर्वांना हवी. सूर्याचे प्रसन्न व प्रेमळ असे हात लागतांच या कळया खुदकन् हंसतील. वसंता, आज पहाटें एक मांजर थंडीत कुडकुडत होतें. तें माझ्या दाराजवळ येऊन केविलवाणें ओरडत होते. मी दार उघडलें व ते आंत आले. ते माझ्या पांघरुणांत शिरलें. मी त्याला जवळ घेतलें. तें घुरघुर करीत मला बिलगलें. प्रेमानें अनोळखी पशुपक्षीहि माणसाळतात. मग माणसें नाहीं का माणसाळणार?

परंतु आम्हांला द्वेषाचेच डोहाळे होत आहेत. आणि आश्चर्य हें कीं धर्माच्या नांवानें हे द्वेष माजवले जात आहेत. संस्कृतीचें संवर्धन का द्वेषाने करायचें? धर्माच्या नांवानें आतांपर्यत जेवढी हिंसा जगांत झाली असेल तेवढी दुस-या कोणत्याहि कारणासाठी झाली नाहीं ! आम्ही पुन्हा आज तेंच करीत आहोंत. परंतु धर्माच्या लंब्याचौडया गप्पा मारणारे हे लोक गरिबांची पिळवणूक दूर करण्याच्या बाबतींत मात्र मुके असतात.

वसंता, कांहीं महिन्यांपूर्वी मुंबई कौन्सिलमधील रिकाम्या झालेल्या कांही जागांची निवडणूक होती. काँग्रेसनें आपले उमेदवार उभे केले होते. परंतु काँग्रेसच्या उमेदवारास प्रतिस्पर्धी म्हणून जे उमेदवार हिंदुमहासभावाले, वर्णाश्रमावाले, लोकशाहीवाले वगैरेंनीं मिळून उभें  केले हाते, त्यांची भूमिका काय होती? काँग्रेसनें कुळ कायदा केला म्हणून जे लोक रागावले होते त्यांच्या वतीने जे उमेदवार होते. कुळ कायद्यांत वास्तविक कांही विशेष नव्हतें. तो एक साधा कायदा होता. जमिनदारांच्या जमिनी काढून कुळांना देण्यांत आल्या नव्हत्या. परंतु कुळकायद्यांचा पहिला खर्डा प्रसिध्द होतांच, '' आतां जमिनदारांना फांशीं द्या ! '' अशी ओरड होऊं लागली. अरे फांशीं कुणाला दिलें आहे? कुळांनी जर वेळच्या वेळी खंड दिला, जमीनीची नासधूस केली नाहीं तर त्यांना काढून टाकूं नये अशा अर्थाचें तें साधं बिल होते. परंतु आमचे खोत व जमीनदार रागावले. आणि या रागावलेल्यांची बाजू केसरी वगैरे पत्रांनी घेतली ! कर्नाटकांतील श्री. बेळवी हे स्वत:ला लोकमान्यांचे अनुयायी म्हणवितात. परंतु लोकमान्य तर तेल्यातांबोळयाचे पुढारी म्हणून उपहासिले जात. लोकमान्यांना अटक झाली तेव्हां मुंबईच्या कामगारांनीं दंगे केले. बेळवी जर स्वत:ला लोकमान्यांचे अनुयायी समजत असतील तर गरीबांची बाजू त्यांनीं घेतली असती. परंतु ते म्हणाले, '' काँग्रेस कुळकायदा करते. तिला विरोध केलाच पाहिजे, '' आणि अशा या बेळवी वगैरे असंतुष्टांस कोणी पाठिंबा दिला?

हिंदुमहासभावाले, वर्णाश्रमवाले, केसरी वगैरे पत्रें-सर्वांनीं.

या कौन्सिलच्या निवडणुकींत काँग्रेसचे कांहीं उमेदवार पडले. कारण या निवडणुकीचे मतदार जरा मोठे जमीनदार असतात. जमीनदार रागावले होते. केसरीनें लिहिलें, '' काँग्रेसचे उमेदवार पडले. याचा काँग्रेसनें धडा घ्यावा. '' धडा कोणता घ्यायचा बाबा? धडा काँग्रेसनें हा घेतला कीं श्रमणा-यांची बाजू जसजशी काँग्रेस घेईल, तसतशी भांडवलवाल्यांची काँग्रसभक्ति नाहीशी होईल. पू. विनोबाजींना जळगावाला एका कम्युनिस्टाने एक प्रश्र विचारला कीं '' काँग्रेस ही भांडवलवाल्यांची नाहीं का? '' विनोबांजींनी शांतपणे उत्तर दिलें, '' स्वातंत्र्याचा खरा लढा अद्याप सुरू झाला नाहीं. तो लढा सुरू झाल्यावर हे काँग्रेसवाले खडयासारखे वेगळे पडतील. आणि तरीहि जे राहतील ते मग भांडवलवाले म्हणून राहणार नाहींत. '' स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे सर्व दरिद्रयनारायणाचा संसार सुखाचा करणें.  हें कार्य जसेजसें जोरानें होऊं लागेल तसतसें श्रीमंताचें व वरिष्ठ वर्गांचें काँग्रेस-प्रेम कमी कमी होऊ लागेल.

श्यामची पत्रे

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
पत्र पहिले 1 पत्र पहिले 2 पत्र पहिले 3 पत्र पहिले 4 पत्र पहिले 5 पत्र पहिले 6 पत्र पहिले 7 पत्र दुसरे 1 पत्र दुसरे 2 पत्र दुसरे 3 पत्र दुसरे 4 पत्र दुसरे 5 पत्र दुसरे 6 पत्र दुसरे 7 पत्र दुसरे 8 पत्र तिसरे 1 पत्र तिसरे 2 पत्र तिसरे 3 पत्र तिसरे 4 पत्र तिसरे 5 पत्र तिसरे 6 पत्र तिसरे 7 पत्र तिसरे 8 पत्र तिसरे 9 पत्र चवथे 1 पत्र चवथे 2 पत्र चवथे 3 पत्र चवथे 4 पत्र चवथे 5 पत्र पाचवे 1 पत्र पाचवे 2 पत्र पाचवे 3 पत्र पाचवे 4 पत्र पाचवे 5 पत्र पाचवे 6 पत्र पाचवे 7 पत्र सहावे 1 पत्र सहावे 2 पत्र सहावे 3 पत्र सहावे 4 पत्र सहावे 5 पत्र सहावे 6 पत्र सातवे 1 पत्र सातवे 2 पत्र सातवे 3 पत्र सातवे 4 पत्र सातवे 5 पत्र सातवे 6 पत्र सातवे 7 पत्र आठवे 1 पत्र आठवे 2 पत्र आठवे 3 पत्र आठवे 4 पत्र आठवे 5 पत्र आठवे 6 पत्र आठवे 7 पत्र आठवे 8 पत्र आठवे 9 पत्र नववे 1 पत्र नववे 2 पत्र नववे 3 पत्र नववे 4 पत्र नववे 5 पत्र नववे 6 पत्र नववे 7 पत्र नववे 8 पत्र नववे 9 पत्र दहावे 1 पत्र दहावे 2 पत्र दहावे 3 पत्र दहावे 4 पत्र दहावे 5 पत्र दहावे 6 पत्र अकरावे 1 पत्र अकरावे 2 पत्र अकरावे 3 पत्र अकरावे 4 पत्र अकरावे 5 पत्र बारावे 1 पत्र बारावे 2 पत्र बारावे 3 पत्र बारावे 4 पत्र बारावे 5 पत्र बारावे 6 पत्र तेरावे 1 पत्र तेरावे 2 पत्र तेरावे 3 पत्र तेरावे 4 पत्र तेरावे 5 पत्र तेरावे 6 पत्र तेरावे 7 पत्र तेरावे 8 पत्र तेरावे 9 पत्र तेरावे 10 पत्र चवदावे 1 पत्र चवदावे 2 पत्र चवदावे 3 पत्र चवदावे 4 पत्र चवदावे 5 पत्र चवदावे 6 पत्र चवदावे 7