श्लोक ३ रा
न मे मानापमानौ स्तो न चिन्ता गेहपुत्रिणाम् ।
आत्मक्रीड आत्मरतिर्विचरामीह बालवत् ॥३॥
बाल माझें तुझें न म्हणे । उंच नीच कांही नेणे ।
यालागीं मानापमान तेणें । सुखें साहणें सर्वथा ॥५८॥
तिमासांचेनि बाळकें । मानु कोण हें नोळखे ।
अपमानू तोही न देखे । आपुलेनि सुखें क्रीडत ॥५९॥
दुजेपणातें नातळे । बालक आपुलियाचि लीळें ।
आपआपणियाशींच खेळें । आपुलेनि मेळें आपण ॥६०॥
देहगेहांची चितां । बाळासि नातळे सर्वथा ।
स्वभावेंचि निश्चिंतता । चिंताकथा त्या नाहीं ॥६१॥
न देखतां दुजी स्थिती । बाळका आपुली आपणिया प्रीती ।
आपुली आपणिया अतिरती । तैसी गती योगिया ॥६२॥
योगियासी प्रपंचाचें भान । सत्यत्वें नाहीं जाण ।
यालागीं मानापमान । दोन्ही समान तयासी ॥६३॥
चित्रींचेनि सापें खादला । तो चित्रींचेनि अमृतें वांचला ।
तेवीं जिण्या मरण्या मुकला । निश्चिळ ठेला निर्द्वंद्वें ॥६४॥
गृहदारापुत्रचिंता । हे समूळ मिथ्या वार्ता ।
स्वदेहो सत्यत्वें असता । तरी करूं लाहता चिंतेतें ॥६५॥
भवमूळ कल्पना जाण । ते कल्पना मनाआघीन ।
तें मन स्वरूपीं जाहलिया लीन । तेव्हां वस्तुचि होणे सर्वत्र ॥६६॥
तेणें स्वरूपानसंघानें । सुखें क्रीडतु चिद्धनें ।
क्रीडा दैवयोगें करणें । देहाभिमानें विरहित ॥६७॥
पावोनि निजसुखप्राप्ती । मनआदि इंद्रियें उपरमती ।
अणुभरी स्फुरेना वृत्ती । 'समाधि' बोलती या नांव ॥६८॥
तेचि स्वरूपीं ठेवूनि मन । बाह्यस्फूर्तीचें स्फुरे भान ।
ते दशा गा 'व्युत्थान' । साधुजन बोलती ॥६९॥
उंबर्यावरी ठेविला दिवा । तो जेवीं देखे दोंही सवा ।
तैसी व्युत्थानदशा जीवभावा । उभय स्वभावा देखणी ॥७०॥
लवणजळा समरसता । तेवीं स्वरूपीं विरवूनि चित्ता ।
समाधिव्युत्थाना हाणी लाथा । निजीं निजस्वरूपता तापोनी ॥७१॥
त्यासी कोणाचा मानापमान । गृहपुत्रचिंता करी कोण ।
स्वरूपीं हारपलें मन । निजसमाधान पावला ॥७२॥
मनेंवीण जें विहरण । तें बालकाच्या ऐसें जाण ।
दैवयोगें चलनवलन । वृत्तिशून्य वर्तत ॥७३॥