शिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान
शिवाजीराजांना घेऊन काबूलच्या स्वारीवर जाण्याची तयारी रामसिंह करीत होता. बादशाहाचा लाडका क्रूर सरदार शुजाअतखान हा आपल्याबरोबर येणार आहे याचा धसका रामसिंहाला होताच. कूच करण्यास अजून पाच-सात दिवस लागणार होते. महाराज स्वत: या औरंगजेबी डावामुळे अस्वस्थ होते. त्यांनी एक वेगळेच रान यावेळी उठविले. कोणते ?
महाराजांकडे रोज दिवसातून अनेकदा शाही सरदारमंडळी भेटावयास यायची. आजपर्यंत (दि. १७ मे १६६६ ) महाराज या सरदारांशी छान हसून , गोडीने बोलायचे. पण काबूलच्या वातेर्ने चिडलेले महाराज , काबूलचा विषय न काढता या येणाऱ्या सरदारांशी औरंगजेबाबद्दल सरळसरळ टीकात्मक बोलावयास लागले. त्यात चीड होती. राजांचा आशय असा होता , ‘ बादशाहांच्या वतीने केवढी वचने दिली. पण इथे आल्यापासून तुमचे बादशाह आमचा सतत अपमानच करीत आहेत. आम्हाला दिलेल्या वचनांचं काय ? हाच शाही रितरिवाज आहे काय ? शब्दांची किंमत नाही ? आम्ही उघडउघड फसलो आहोत. हे बादशाही प्रतिष्ठेला शोभतं का ?’
भेटीस येणाऱ्या सरदारमंडळींशी हे असंच रोज अन् सतत महाराज वैतागून बोलत होते. ते सरदारही चकीत होत होते कारण अतिशय खानदानी नम्रतेने गोड बोलणारे महाराज बादशाहाबद्दलच वैतागून बोलताना पाहून त्यांना धक्काच बसत होता. बादशाहाबद्दल असं गुपचूप बोलण्याचं धाडसही कुणी करीत नसे. इथे तर महाराजांनी ती आघाडीच उघडली. या सर्व गोष्टींचा वृत्तांत हेच सरदारलोक बादशाहाला भेटून सांगत होते. आपल्याच विरुद्ध ऐन आग्ऱ्यात आपल्याच सरदारांना हा सीवा बिघडवतो आहे अशी भीती बादशाहालाच वाटायला लागली. हे सरदार बादशाहाच्याच हुकुमावरून महाराजांना भेटत होते. यातून बादशाहाच गोंधळला. कारण साऱ्या दरबारी लोकांत हा उघडउघड बादशाहाविरोधी प्रचार धुमसू लागला. बादशाहाला अशीही भीती वाटू लागली की , खैबरखिंडीकडील प्रवासमार्गावर कदाचित हे विरोधी प्रचाराचे भडक बंड अधिकच मोकाट सुटेल. खैबरखिंडीपर्यंत तरी या शिवाजीचा मुडदा पाडता येणार नाही. तोपर्यंत प्रचाराचा वणवा जनतेत पसरेल. त्यातून पुन्हा शाहजादा शुजा याचीही लटकती धास्ती बादशाहाच्या डोक्यावर होतीच. काय करावे ते त्याला कळेना. ‘ वचने देऊन बादशाहाने मला आग्ऱ्यात आणले. ही वचने मिर्झाराजांच्यामार्फत मला दिली गेली आणि आता माझी साफ साफ फसवणूक केली जात आहे. हे बादशाहांना शोभतं का ?’ हा महाराजांचा मुद्दा असंख्य कानांमनांपर्यंत रोज केवळ बेरजेने नव्हे तर गुणाकाराने पेटत चालला होता. बादशाह यामुळेच कमालीचा अस्वस्थ होता. सीवाला ताबडतोब ठार मारावे का ? अशक्य आहे. कारण राजपुताचा शब्द!
काबुलची मोहिम रद्द करावी का ? अशक्य आहे. कारण शाही प्रतिष्ठेला धक्का लागतोय. काय करावं ?
अखेर बेचैन बादशाहाने रामसिंहाला बोलावून जाब विचारला की , ‘ हा सीवा , आम्ही वचने मोडली , आमचा विश्वासघात झाला असे आमच्याविरुद्ध सतत बोलतो आहे. तुमच्या वडिलांनी सीवाला वचने तरी कोणची दिली होती ‘
रामसिंहाला त्याचे उत्तरही देता येईना. महाराज स्वत:ही वचनांचा तपशील सांगेनात. प्रचाराचा प्रचंड कांगावखोर कल्लोळ महाराजांनी शाही सरदारांच्या समोर चालूच ठेवला होता. बादशाहाच्या भोवती गांधील माश्यांचं मोहोळ उठलं होतं.
अखेर बादशाहाने उसने अवसान आणून रामसिंहाला असा हुकुम दिला की , ‘ काबूलच्या मोहिमेवर निघण्याचा बेत आम्ही हुकुम देईपर्यंत पुढे ढकला. ‘
ढकलला. किंबहुना रद्दच झाला. म्हणजेच महाराजांना बेमालूमरित्या खैबरखिंडीच्या आसमंतात गाठून ठार मारण्याचा शाही बेत आपोआप बारगळला.
प्रचाराचं सार्मथ्य काय असतं याचा हा तीनशे वर्षांपूवीर्चा साक्षात नमुना. केवळ शब्दांच्या तीरंदाजीने महाराजांनी हे औरंगजेबी कारस्थान शामियान्यात बसून हाणून पाडले. हत्याराविना महाराजांनी शब्दांची लढाई जिंकली.
पण दोनच दिवसांत एक भयंकर प्रकार घडला. महाराज आपल्या शामियान्यात आपल्या काही मराठ्यांशी सहज बोलत बसले असता शामियान्याच्या दारावरचे मावळे पहारेकरी एकदम दचकून महाराजांकडे धावले. अन् म्हणाले , ‘ महाराज , हे पाहा काय! ‘ महाराज अन् सर्वचजण उठले , दाराकडे धावले. बाहेर पाहतांत तो शेकडो मोगली सैनिक आणि त्यांचा म्होरक्या कोतवाल सिद्दी फौलादखान महाराजांच्या छावणीला सैन्यानिशी गराडा घालीत होता. सुमारे दोन हजार मोगल असावेत. मराठी चिमुकली छावणी गराडली जात होती. कैद! महाराज या गराड्यात कोंडले जात होते. औरंगजेबाने महाराजांना उघडउघड कैद केलं होतं. तुरुंग नव्हता हा. बेड्या नव्हत्या हातात. पण ही कडक कैदच होती. महाराजांना धक्काच बसला. त्यांना भविष्य दिसून आले. पहिला आवेग अनावर झाला. त्यांनी शंभूराजांना पोटाशी कवळीले. एकूणच आपण या आग्रा प्रकरणांत मृत्युच्या जबड्यात अडकलो आहोत याची खात्री झाली. दि. २५ मे १६६६ .
- बाबासाहेब पुरंदरे