शिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत !
सूर्यालाही तेजोवलय असते. महाराज शिवाजीराजे यांच्याही जीवनाला एक विलक्षण तेजोवलय होते. ते होते जिजाऊसाहेबांचे. कर्तृत्वाच्या प्रचंड दुदुभीनिनादाच्या मागे सनईचौघडा वाजत असावा तशीच शिवाजीमहाराजांच्या जीवनाच्या मागे जिजाऊसाहेबांची सनई निनादत होती. जिजाऊसाहेब हे एक विलक्षण प्रेरक असे सार्मथ्य होते. महाराजांना जन्मापासून सर्वात जास्त मायेचा आशीर्वाद लाभला तो आईचाच. त्यांना उदात्त, उत्कट आणि गगनालाही ठेंगणी ठरविणारी महत्वाकांक्षी स्वप्ने वयाच्या अगदी लहानपणापासूनच पडू लागली. ती आईच्या सहवासातच. महाराज लहानपणापासूनच खूप-खूप मोठे झाले.
त्यांचे प्रेरणास्थान पाठीवरून फिरणाऱ्या आईच्या मायेच्या हातातच होते. अगदी अलिप्त मनाने या आईच्या आणि मुलाच्या जीवनाचा अभ्यास केला तर जिजाऊसाहेबांची कधी दृश्य तर कधी अदृश्य, म्हणजेच कधी व्यक्त झालेली तर कधी अव्यक्त राहिलेली प्रेरक शक्ती अभ्यासकांच्या प्रत्ययास येते. प्रतिपच्चंद लेखेव ही महाराजांची विश्ववंद्य मुदा केव्हा निर्माण झाली? आज तरी या मुदेचे अस्सल पत्र इ. स. १६३९ चे सापडले आहे. पण जिजाऊसाहेबांच्या बरोबर बोट धरून शिवाजीराजे पुण्यास वडिलांच्या जहागीरीचा अधिकृत अधिकारी म्हणून आले त्याचवेळी, म्हणजे इ. स १६३७च्या अगदी प्रारंभी ही प्रतिपच्चंद लेखेव मुदा निर्माण केली गेली असली पाहिजे.
या मुदेतील नम्र पण उत्तुंग ध्येयवाद खरोखरच गगनाला गवसणी घालणारा आहे. शुद्ध, संस्कृत भाषेत असलेली ही कविताबद्ध मुदा प्रत्यक्षात कोणा संस्कृत जाणकार कवीकडून जिजाऊसाहेबांनी तयार करवून घेतली असेल. पण त्यातील अत्यंत नेटका आणि तेवढाच प्रखर आदर्श ध्येयवाद या बालशिवाजीराजापुढे अन् अवघ्या युवा विश्वापुढे कोणी मांडला असावा? जिजाऊसाहेबांनीच. या आईचे जेवढे काही कार्य आणि कर्तृत्व आपणास अस्सल कागदोपत्री उपलब्ध आहे ते वाचल्यावर आणि त्याचे चिंतन केल्यावर हे आपणास निश्चित पटेल. आपणच विचार करून ठरवा. वयाच्या अवघ्या कोवळेपणापासूनच महाराजांचे मन कसा आणि कोणता विचार करत होते?
तो विचार होता क्रांतिकारक बंडाचा. स्वातंत्र्याचा. आदिलशहा बादशहाचे पहिले फर्मान या स्वातंत्र्यबंडाच्या विरोधात सुटले ते दि. ११ एप्रिल १६४१ चे आहे. महाराज त्यावेळी अकरा वर्षाचे आहेत. इतक्या लहान वयात प्रचंड सुलतानी सत्तांविरूद्ध स्वातंत्र्ययुद्धाचा विचार आणि नेतृत्व करणारा जगाच्या इतिहासात शिवाजीराजांशिवाय आणखी कोणी आहे का? एक मुलगा हे बंड करतो आहे. या बंडाची प्रेरणा त्या प्रतिपच्चंद लेखेव मुदेत आहे. या मुदेमागे उभ्या आहेत जिजाऊसाहेब. पहा पटते का. घरातील वडिलधारी व्यक्ती म्हणून सर्व अधिकार जिजाऊसाहेबांच्याच हातात होते. राजांना शिकवित.. शिकवित सर्व कारभार त्याच पहात होत्या.
पण तो शिवाजीराजांच्या नावाने. न कचरता प्रत्येक भयंकर संकटला तोंड देणारी ही आई आणि तिची सतत कणखरपणे टिकून राहिलेली मानसिकता आपण विचारात घेतली तरच हे सारे पटेल. जिजाऊसाहेब जरूर त्याच वेळी राज्यकारभारात सल्लामसलत देताना दिसतात. अफजलखानाचा पुरता म्हणजे निर्णायक सूड घेण्याचा सल्ला राजांना देतात. प्रसंगी सिद्दी जोहारविरुद्ध युद्धावर जाण्याची स्वत: तयारी करतात, आग्ऱ्यास जाऊन राजकारण फते करून या म्हणून राजांना या अवघड राजकारणात पाठबळ देतात, आग्रा प्रसंगीचा स्वराज्याचा राज्यकारभार स्वत: जातीने सांभाळतात आणि प्रसंगी शाहीस्तेखानासारख्या अतिबळाच्या शत्रूविरुद्ध स्वराज्याची उत्तर सरहद्द सांभाळतात हे आपण पाहिले की या आईच कणखर मन आपल्या लक्षात येते.
अत्यंत साध्या आणि सात्विक आचार विचाराच्या या आईचा संस्कार किती प्रभावी ठरला हे शिवचरित्राच्याच साक्षीवरून लक्षात येते. महाराज आग्ऱ्याहून आल्यानंतर जिजाऊसाहेबांनी राज्यकारभारात प्रत्यक्ष कुठेच भाग घेतलेला दिसत नाही. पण आईपणाच्या नात्याने स्वराज्याच्या संघटनेवर त्यांची सतत पाखर दिसते. विठोजीनाईक शिळमकर वा तानाजी मालुसरे यांच्या बाबतीत त्यांनी दाखविलेली मायाममता अगदी बोलकी आहे. त्यांच्या उद्दात आचारविचारांचा प्रभाव तेजोवलयासारखा शिवाजीमहाराजांच्या जीवनात दिसून येतो. जिजाऊसाहेब मरण पावल्या आणि महाराजांचा आनंद कायमचा मावळला.
जिजाऊसाहेबांच्या मरणानंतर त्यांच्या खाजगी खजिन्यात पंचवीस लाख होन म्हणजे सुमारे एक कोटी रुपये शिलकीत ठेवलेले लक्षात आले. ही नोंदही बोलकी आहे. इंग्लडच्या इतिहासात, ‘ओ जॉर्ज, यू ट्राय टू बी ए रिअल किंग’ असं सांगणाऱ्या एका इंग्लिश राजमातेचं अपार कौतुक केलं जातं. वास्तविक या जॉर्जचा संघर्ष होता स्वत:च्याच पार्लमेंटशी. कोणा आक्रमक परकीय शत्रूशी नव्हे. नेपोलियनच्या आईचही कौतुक फ्रेंच चित्रकारांनी कलाकृतीत रंगविले. अशी आणखीही काही उदाहरणे देता येतील.
आमचे मात्र जिजाऊसाहेबांच्या उदात्त आणि प्रेरक अन् तेवढ्याच उपभोगविन्मुख अन् प्रसिद्धीविन्मुख चरित्राकडे जेवढे चिंतनपूर्वक लक्ष जावयास हवे आहे तेवढे गेलेले नाही. रायगडावर पाचाड येथे जिजाऊसाहेबांची समाधी महाराजांच्याच वेळी बांधली गेली. अगदी साधी समाधी. पण तीही पुढे कोसळली. फलटणच्या श्रीमंत मालोजीराजे आणि श्रीमंत सौ. लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी या समाधीचा जीणोर्द्धार केला. म्हणूनच ही समाधी आज आपल्यापुढे उभी आहे.
-बाबासाहेब पुरंदरे