शिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.
शिवाजीमहाराजांचे एकूण आयुष्यच अवघे ५० वर्षे आणि दोन महिन्यांचे. अविश्रांत श्रम हेच या आयुष्याचे सार. ते श्रम केवळ शरीरालाच नव्हते तर मनाला आणि बुद्धिलाही गराडा घालून बसले होते. इ. १६४६ पासून ते इ. १६८० पर्यंत ३५ वषेर् या राष्ट्रनिर्मात्याला अव्याहत भयंकर वादळी आयुष्यच जगावे लागले. त्यांच्या जीवनात चमत्कृतीपूर्ण नाट्यमय घटना घडत गेल्या. आज हे सारे विषय तुम्हा आम्हाला दिपवून टाकतात. आपण त्यातील नाट्याचा रोमहर्षक आनंद लुटीत असतो.
त्यावर नाटके , कादंबऱ्या , चित्रपट आणि काव्ये महाकाव्ये रचीत असतो. पण त्यातील तळमळ , ध्येयवेड घामाची शिंपण आपण कधी एकांतात मनाची समाधी लावून विचारात घेतो का ? विचार केलाच तर एवढाच करतो , की शिवाजीमहाराजांचा पुतळा किती लाख रुपयांचा बनवायचा ? त्याची स्थापना कुठे करायची अन् कुणाच्या हस्ते करायची ? त्यांनी केलेले राष्ट्र आणि समाज उभारणीचे काम की , ते करण्याचा सक्रिय प्रयत्न आपण करतो का ? याचे प्रामाणिक उत्तर नकाराथीर्च असते. होतो फक्त जयजयकार!
सह्यादीच्या डोंगराळ दुर्गम प्रदेशात त्यांनी स्वराज्य मांडले. त्याची देखरेख ठेवण्याकरताही ते जातीने हिंडत असल्याच्या नोंदी सापडतात. ‘ राजेश्री गड किल्ल्यांच्या पाहणीस अमुक भागात गेले. ‘ अशा नोंदी सापडतात. प्रत्यक्ष लहानमोठ्या लढायांचा तपशील तर किती सांगावा ? त्यातीलच ही एक नोंद पाहा. महाराजांचा राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला. त्याची तयारीही रायगडावर सुरू झाली. रायगड कामाधामांत आणि तेवढ्याच लगीन आनंदात बुडून गेला होता. अन् त्यातच महाराजांच्या मनात वाई आणि भोरच्या जवळचा केंजळगड नावाचा किल्ला जिंकून स्वराज्यात घेण्याचा विचार आला. वाई आणि भोर या भागातील हा एकच डोंगरी किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात उरला होता. अन् महाराजांनी तो स्वत: जातीने हल्ला करून , लढून घ्यावयाचे ठरविले. माझ्या मनात विचार येतो. की हा किल्ला जिंकून घेण्याकरता महाराजांनी स्वत:च जाण्याची आवश्यकता होती का ?
तो कुणीही घेऊ शकला असता , तरीही महाराज स्वत: अचानक रायगडावरून ससैन्य गुपचूप निघाले का ? तो दिवस होता दि. २२ एप्रिल १६७४ या दिवसापूर्वी अवघ्या एकच महिना आधी म्हणजे दि. १९ मार्च १६७४ या दिवशी महाराजांच्या एक राणीसाहेब अचानक रायगावरच मृत्यू पावल्या होत्या. महाराजांचं या काशीबाई राणीसाहेबांवर अतिशय प्रेम होतं. त्या या गजबजलेल्या संसारातून अचानक निघून गेल्या. महाराज अतिशय दु:खी झाले. सरसेनापती प्रतापराव गुजर हे महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे योद्धे होते. तेही या आधी महिन्यापूवीर्च रणांगणात ठार झाले होते. (दि. २४ फेब्रु. १६७४ ) एका बाजूने राज्याभिषेकाची मंगल तयारी चाललेली होती अन् दुसऱ्या बाजूने महाराजांच्या काळजातून दु:खाचे अश्रू पाझरत होते.
हे दु:ख विसरण्याकरताच महाराजांनी ही दि. २२ एप्रिल ची केंजळगडची मोहिम काढली असेल का ? त्याचवेळी वार्धक्याने थकलेली मृत्यूच्याच दिशेने निघालेली आपली आई समोर त्यांना दिसत नव्हती का ? अन् राज्याभिषेकाचा दिवस अवघ्या सव्वा महिन्यावर आलेला महाराजांना दिसत नव्हता का ? तरीही महाराज केंजळगडच्या मोहिमेवर निघाले. दि. २४ एप्रिल १६७४ या मध्यरात्री महाराजांनी स्वत: ससैन्य केंजळगडावर हल्ला चढवला. धडाडून लढाई पेटली. महाराजांनी केंजळगड जिंकलाही.
चांगले झाले. तुमच्या आमच्या आजच्या शिवचरित्राच्या आनंदातही भर पडली. पण युद्धाच्या त्या अंधाऱ्या रात्री वैऱ्याच्या तलवारीचा फटकारा महाराजांवरच फिरला असता तर ? शिवचरित्र राज्याभिषेकाच्या आधीच संपले असते. पण तो राष्ट्रपुरुष त्या काळात तसा वागला. या त्यांच्या वागण्याचा आम्ही आज कधी विचार तरी करतो का ? फार फार तर एखादी कविता रचून मोकळे होतो. आपल्याला महाराजांचे रक्ताचे अन् घामाचे थेंब दिसतात. पण त्यांचे अश्रू कधी दिसतात का ?
एकांतात मनोसमाधी या चरित्राशी साधता आली तरच ते दिसू शकतील.
याच काळात पावसाळा समीप आलेला असतानाही (इ. १६७४ मे मध्य) महाराज चिपळूण जवळच्या दळवटणे या गावी आपल्या मराठी सैन्याची एक छावणी योजनापूर्व ठेवण्यासाठी स्वत: गेले होते. कोकणचा नकाशा भूप्रदेश आणि तेथील हवामान डोळ्यापुढे आणा आणि महाराजांची ही राज्यसाधनाची लगबगसुद्धा डोळ्यापुढे आणा. म्हणजे आज सुट्टीच्या काळात पत्ते कुटायची वा टीव्हीला मिठी मारून बसायची इच्छा थोडीतरी बाजूला राहील.
उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधाराने शिवाजीमहाराजांची डायरी आपल्याला लिहिता येतेय. लिहा. अन् स्वत:च शोधून पाहा की , महाराजांनी आराम विश्राम घेण्यात किती वेळ खर्च केलाय. विश्रांतीकरता म्हणून ते एकदा मनोहरगडावर आणि वर्धनगडावर राहिल्याची नोंद आपल्याला सापडेल. पण विश्रांतीकरता जाऊन राज्याची आणि राजकारणाचीच कामे तेथे उरकीत बसल्याचा आपल्याला सुगावा लागेल हा! आग्ऱ्याच्या कैदेत औरंगजेबाच्या कृपेने महाराज तीन महिने छान विश्रांती घेत होते. नाही! या पलिकडे महाराजांना विश्रांती गवसलीच नाही.
महाराजांचे असंख्य पुतळे. विविध शिल्पकारांनी घडविलेले आपण पाहतो. बहुतेक सर्वच पुतळ्यांत महाराजांच्या हाती तलवार दाखविलेली आणि ते घोड्यावर बसलेले आहेत , असेच आपण पाहतो. क्वचित एखाददुसराच पुतळा हात उंचावून उभा असलेला आपल्याला दिसतो. असं वाटतं , त्या पुतळ्यातील शिवाजीमहाराज हा उंचावून तुम्हा आम्हालाच सांगताहेत की ‘ पराक्रमाचे तमाशे दाखवा! ‘
-बाबासाहेब पुरंदरे