संत निवृत्तीनाथांचे अभंग
हरि आत्मा होय परात्पर आलें । नाम हें क्षरलें वेदमतें ॥ १ ॥
वेदांतसिद्धांत नाहीं आनुहेत । सर्वभूतीं हेत हरि आहे ॥ २ ॥
हरिवि न दिसे गुरु सांगतसे । हरि हा प्रकाशे सर्व रुपीं ॥ ३ ॥
निवृत्तिनें कोंदले सद्गुरूंनीं दिधलें । हरिधन भलें आम्हां माजी ॥ ४ ॥