Get it on Google Play
Download on the App Store

*परिशिष्ट 13

परिशिष्ट तिसरें ।
अशोकाचा भाब्रु शिलालेख आणि त्यांत निर्देशिलेलीं सूत्रें

भाब्रू हें स्थान जयपुर संस्थानांतील एका डोंगराळ प्रदेशात आहे. तेथे राहणार्‍या भिक्षुसंघाने अशोक राजापाशीं संदेश मागितल्यामुळे अशोकाने हा संदेश पाठविला व तो एका शिलेवर कोरावयास लावला असावा. अशा प्रकारचे संदेश अशोक वारंवार पाठवीत असावा. परंतु त्यापैकी जे त्याला महत्त्वाचे वाटत, तेच तो शिलांवर किंवा शिलास्तंभावर कोरावयास लावी. ह्या शिलालेखात निर्देशिलेलीं सूत्रें मगधदेशांतील बौध्दांनी वाचावीं असे संदेश तोंडी किंवा पत्रीं अशोकाने पाठविलेच असतील; पण तें कोरावयास लावले नाहीत. कां की, आसपासचे संघ काय करतात, काय वाचतात, याचे वर्तमान त्याला वारंवार समजत होतें. त्यासाठी त्याने खास अधिकारी नेमले होते. परंतु राजपुतान्यासारख्या दूरच्या प्रदेशांतून बातम्या येण्यास उशीर लागत होता. तेव्हा असा एक शिलालेख तेथे राहणें अशोकाला योग्य वाटलें असावें. माझ्या समजुतीप्रमाणे या शिलालेखाचें भाषांतर खाली देत आहें.

भाब्रु शिलालेखाचें भाषांतर

''प्रियदर्शी मगधराजा संघाला अभिवादन करून संघाचें स्वास्थ व सुखनिवास विचारतो. भदन्त, आपणाला, माझा बुध्द धर्म व संघ यांविषयी किती आदर व भक्ति आहे हें माहीत आहेच. भगवान बुध्दाचें वचन सर्वच सुभाषित आहे. पण, भदन्त, जें मी येथे निर्देशितों तें एवढयाच साठी की सध्दर्म चिरस्थायी व्हावा, आणि त्याचसाठी बोलणें योग्य वाटते. भदन्त, हे धर्मपर्याय (सूत्रें) आहेत- विनयसमुकले, अलियवसानि, अनागतभयानि, मुनिगाथा, मोनेयसूते, उपतिसपसिने आणि राहुलाला केलेल्या उपदेशांत खोंटे बोलण्याला उद्देशून जें भगवान बुध्दाने भाषण केलें तें. ह्मा सूत्रासंबधाने, भदन्त, माझी इच्छा अशी की, तीं पुष्कळ भिक्षुनी व भिक्षुणींनी वारंवार ऐकावीं व पाठ कारावीं. त्याचप्रमाणे उपासकांनी व उपासिकांनी. भदन्त, हा लेख मी कोरावयास लावला आहे; कारण, माझे अभिहित(संदेश सर्वजण) जाणोत.''

ह्या सात सुत्तापैंकी पहिलें विनयसमुत्कर्ष किंवा धर्मचक्रप्रर्वतन त्याचे रूपांतर पांचव्या प्रकरणांत दिलेच आहे (पूर्वाध १३६-१३८). बाकी राहिलेल्या सुत्तांचीं रूपान्तरें क्रमश: देत आहें.

अलियवसानि किंवा अरियर्वससुत्त

हें सुत्त अंगुत्तरनिकायाच्या चतुक्कनिपातांत सापडतें. त्याचे रूपांतर येणेप्रमाणे-

भिक्षुहो, हे चार आर्यवंश अग्र व फारा दिवसांचे वंश आहेत. ते प्राचीन व असंकीर्ण असून कधीही संकीर्ण झाले नाहीत, संकीर्ण होत नाहीत व संकीर्ण होणार नाहीत. त्यांना कोणत्याही श्रमणांनी व ब्राह्मणांनी दोष लावलेला नाही. ते चार कोणते?

येथे भिक्षु मिळेल तशा चीवराने संतुष्ट होतो, अशा संतुष्टीची स्तुति करातो, चीवरासाठी अयोग्य आचरण करीत नाही, चीवर नाही मिळालें तर त्रस्त होत नाही, मिळालें तर हावरा न होतां, मुक्त न होता, आसक्त न होता, चीवरांत दोष जाणून केवळ मुक्तीसाठी तें वापरतो. आणि त्या आपल्या तशा प्रकारच्या संतुष्टीने आत्मस्तुति, व परनिंदा करीत नाही. जो अशा संतोषात दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान् होतो, भिक्षुहो, त्यालाच प्राचीन अग्र आर्यवंशाला अनुसरून वागणारा भिक्षु म्हणतात.

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
आत्मवाद 1 आत्मवाद 2 आत्मवाद 3 आत्मवाद 4 आत्मवाद 5 आत्मवाद 6 आत्मवाद 7 आत्मवाद 8 आत्मवाद 9 आत्मवाद 10 आत्मवाद 11 आत्मवाद 12 कर्मयोग 1 कर्मयोग 2 कर्मयोग 3 कर्मयोग 4 कर्मयोग 5 कर्मयोग 6 कर्मयोग 7 कर्मयोग 8 कर्मयोग 9 कर्मयोग 10 कर्मयोग 11 यज्ञयाग 1 यज्ञयाग 2 यज्ञयाग 3 यज्ञयाग 4 यज्ञयाग 5 यज्ञयाग 6 यज्ञयाग 7 यज्ञयाग 8 यज्ञयाग 9 यज्ञयाग 10 यज्ञयाग 11 यज्ञयाग 12 यज्ञयाग 13 जातिभेद 1 जातिभेद 2 जातिभेद 3 जातिभेद 4 जातिभेद 5 जातिभेद 6 जातिभेद 7 जातिभेद 8 जातिभेद 9 जातिभेद 10 जातिभेद 11 जातिभेद 12 जातिभेद 13 जातिभेद 14 जातिभेद 15 मांसाहार 1 मांसाहार 2 मांसाहार 3 मांसाहार 4 मांसाहार 5 मांसाहार 6 मांसाहार 7 मांसाहार 8 मांसाहार 9 मांसाहार 10 दिनचर्या 1 दिनचर्या 2 दिनचर्या 3 दिनचर्या 4 दिनचर्या 5 दिनचर्या 6 दिनचर्या 7 दिनचर्या 8 दिनचर्या 9 दिनचर्या 10 दिनचर्या 11 दिनचर्या 12 *परिशिष्ट 1 *परिशिष्ट 2 *परिशिष्ट 3 *परिशिष्ट 4 *परिशिष्ट 5 *परिशिष्ट 6 *परिशिष्ट 7 *परिशिष्ट 8 *परिशिष्ट 9 *परिशिष्ट 10 *परिशिष्ट 11 *परिशिष्ट 12 *परिशिष्ट 13 *परिशिष्ट 14 *परिशिष्ट 15 *परिशिष्ट 16 *परिशिष्ट 17 *परिशिष्ट 18 *परिशिष्ट 19 *परिशिष्ट 20 *परिशिष्ट 21 *परिशिष्ट 22 *परिशिष्ट 23