भाग ३ रा 56
५७
अनाथपिंडिक
“दायक उपासकांत गृहपति सुदत्त अनाथपिंडिक श्रेष्ठ आहे.”
ह्याचा जन्म श्रावस्ती येथें सुमनश्रेष्ठीच्या कुळांत झाला. सुदत्त हें त्याचें नांव. तो गरिबांना पिंड देत असे, म्हणून त्याला अनाथपिंडिक असें म्हणत, व ह्याच नांवानें पुढें तो प्रसिद्धीस आला. राजगृह येथें त्यानें भगवंताची भेट कशी घेतली व पुढें श्रावस्तीला जाऊन जेतवनविहार कसा बांधला, हा सर्व वृत्तांत चुल्लवग्गांत आला आहे. त्याचा सारांश बुद्धलीलासारसंग्रहाच्या दुसर्या भागांत (प्र.९) दिला असल्यामुळें येथें देण्यांत येत नाहीं. भगवंतानें उपदेशाला आरंभ काशीला केला असला तरी त्याची प्रसिद्धि बिंबिसारराजाच्या हयातींत राजगृह येथें विशेष झाली, व तेथूनच अनाथपिंडिकानें त्याला आमंत्रण करून श्रावस्तीला नेलें.
अजातशत्रूनें बिंबिसाराला मारून गादी बळकावल्यावर, व तो देवदत्ताच्या नादीं लागल्यावर भगवान् बुद्ध बहुधा वर्षावासासाठीं श्रावस्तीलाच रहात असे. येथें जेतवनाप्रमाणेंच विशाखेनें बांधलेला दुसरा एक प्रासाद होता. या दोन्ही ठिकाणीं भगवान् बुद्ध आळीपाळीनें राही. पसेनदि कोसलराजानें भगवन्तासाठीं निराळा विहार बांधला नव्हता; तरी भगवंतावर त्याचें फार प्रेम होतें, व तो वारंवार जेतवनांत जाऊन भगवंताची भेट घेत असे. त्यामुळें भगवंताला श्रावस्ती येथें कोणाचाहि फारसा उपसर्ग पोंचत नसावा, व उत्तरवयांत चातुर्मासासाठीं येथेंच रहाणें, त्याला इष्ट वाटत असावें. अर्थात्, अनाथपिंडिकाच्या आरामांत राहून भगवंतानें केलेल्या उपदेशाची संख्या फारच मोठी आहे.
अनाथपिंडिकोवाद नांवाचें मज्झिमनिकायांत एक सुत्त आहे. त्यावरून व संयुत्तनिकायांतील सोतापत्तिसंयुत्तांतील कांहीं सुत्तांवरून सारिपुत्तानें अंतकाळी अनाथपिंडिकाला उपदेश केला व त्यायोगें अत्यंत वेदना भोगीत असातांहि शांतपणें त्याला मरण आलें, असें दिसून येतें. म्हणजे बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणापूर्वीं बरींच अनाथपिंडिक निवर्तला असावा. कारण भगवंताच्या परिनिर्वाण समयीं सारिपुत्त हयात नव्हता. अनाथपिंडिक मोठा पंडित नव्हता; केवळ दाता होता. तरी बौद्ध वाङ्मयांत त्याचें नांव अजरामर होऊन बसलें आहे.
५८
चित्र (चित्त) गृहपति
“धर्मोपदेश करणार्या उपासकश्रावकांत चित्र गृहपति श्रेष्ठ आहे.”
हा मगधराष्ट्रांत मक्षिकाशंड नगरांत एका श्रेष्ठीकुलांत जन्मला, व बापाच्या मरणानंतर स्वतः नगरश्रेष्ठी झाला. पंचवर्गीय भिक्षूंपैकीं महानाम स्थविर मक्षिकाशंडाला आला असतां त्याचा उपदेश ऐकून चित्र प्रसन्न झाला; व या स्थविरासाठीं त्यानें अंबाटकाराम नांवाच्या उद्यानांत विहार बांधून दिला. त्या उद्यानाजवळ चित्राचा मिगपथक नांवाचा एक गांव होता, व तेथें तो वारंवार येत असे, व अशा वेळीं अंबाटकरामांत वस्तीला राहिलेल्या भिक्षूंचीहि भेट घेत असे. सुधर्म नांवाच्या भिक्षूकडून तो इतर भिक्षूंना आमंत्रण पाठवीत असे; परंतु सारिपुत्त-मोग्गल्लनासारख्या प्रसिद्ध भिक्षूंना त्यानें स्वतःच आमंत्रण दिल्याची हकिगत पहिल्या भागांत (कलम७५) आलीच आहे. तो उपासक झाला होता तरी पुष्कळ काळपर्यंत बुद्धदर्शनाचा त्याला लाभ झाला नाहीं. नंतर मुद्दाम राजगृहाला जाऊन त्यानें भगवंताची भेट घेतली, असें मनोरथपूरणींत म्हटलें आहे.