Get it on Google Play
Download on the App Store

आनापानस्मृतिभावना 2

आनापानसतिसुत्तांत याचे विधार आहे ते येणेप्रमाणें ः-

बुद्ध भगवान् म्हणतो, ''भिक्षुहो, एखादा भिक्षु अरण्यात, झाडाखाली किंवा एकांतस्थळी जाऊन देह सरळ ठेवून मोठ्या सावधगिरीने बसतो.  तो सावधानपणे आश्वास घेतो व सावधानपणे प्रश्वास सोडतो.  दीर्घ आश्वास घेत आहे असे जाणतो; दीर्घ प्रश्वास सोडीत असला तर दीर्घ प्रश्वास सोडीत आहे असे जाणतो; र्‍हस्व आश्वास घेत असला तर र्‍हस्व आश्वास घेत आहे असे जाणतो; र्‍हस्व प्रश्वास सोडीत असला तर र्‍हस्व प्रश्वास सोडीत आहे असे जाणतो; सर्व देहाची स्मृती ठेवून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; कायसंस्कार शांत करून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो.  प्रीतीचा अनुभव घेऊन आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; चित्तसंस्कार जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; चित्तसंस्कार शांत करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो.  चित्त जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; चित्ताला प्रमुदित करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; चित्ताचे समाधान करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो.  चित्तालां विमुक्त करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो.  अनित्यता जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; वैराग्य जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; निरोध जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; त्याग जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो.  भिक्षुहो, याप्रमाणे आनापानस्मृतीची भावना केली असता ती महत्फलदायक आणि महद्धितकारक होते.''

पहिल्या प्रथम सावधानपणे आश्वास घेणे व प्रश्वास सोडणे याचे विधान आहे.  आणि हेच काम फार कठीण जाते.  श्वासोच्छवासांवर मन ठेवण्याचा प्रयत्‍न केल्याबरोबर ते इकडे तिकडे धावावयास लागते.  त्यासाठी अनेक युक्त्या कराव्या लागतात.  ब्रह्मदेशात सध्या जे एक दोन योगाचार्य आहेत ते अश्वासप्रश्वासांवर चित्त एकाग्र करण्यासाठी प्रथमतः डोळ्यासमोर नासिकाग्रावर अरहं असा शब्द कल्पून त्यावर ध्यान करावयास सांगतात.  त्याच्याबरोबरच अश्वासप्रश्वासांचेही अवलोकन करावयाचे असते.  अशा रीतीने ध्यानाला सुरुवात केली असता काही विपरीत पदार्थ डोळ्यांसमोर येऊ लागले, तर योग्याचे चित्त अद्यापि रुग्णावस्थेत आहे, असे समजले जाते; व त्याच्या मनात वर सांगितलेल्या निवरणांपैकी कोणत्या निवरणाचा प्रादुर्भाव आहे, हे विचारून घेऊन, त्याचा प्रतीकार कोणत्या भावनेने करावा, हे सांगण्यात येते.  अशा रीतीने चित्तदोषांचे दमन करून शांतपणे आणि निर्भयपणे अश्वासप्रश्वासांवर चित्त आणले असता डोळ्यांसमोर समाधीला साधक पदार्थ दिसू लागतात.  एखाद्याला रम्य वनप्रदेश दिसतो, तर दुसर्‍याला एखादी उत्तम नदी वाहात आहे असा भास होतो.  इतरांना कमळे सूर्यमंडल चंद्रमंडल किंवा असेच कामविकारविरहित रम्य देखावे दिसू लागतात.  परंतु त्यात आसक्त न होता अश्वासप्रश्वासांवर ध्यान करण्याचा प्रयत्‍न त्याने तसाच चालू ठेवला पाहिजे.

समाधिमार्ग

धर्मानंद कोसंबी
Chapters
समाधिमार्ग 1 समाधिमार्ग 2 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 1 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 2 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 3 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 4 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 5 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 6 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 7 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 8 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 9 आनापानस्मृतिभावना 1 आनापानस्मृतिभावना 2 आनापानस्मृतिभावना 3 आनापानस्मृतिभावना 4 आनापानस्मृतिभावना 5 कायगतास्मृति आणि अशुभे 1 कायगतास्मृति आणि अशुभे 2 कायगतास्मृति आणि अशुभे 3 कायगतास्मृति आणि अशुभे 4 कायगतास्मृति आणि अशुभे 5 ब्रम्हविहार 1 ब्रम्हविहार 2 ब्रम्हविहार 3 ब्रम्हविहार 4 ब्रम्हविहार 5 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 1 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 2 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 3 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 4 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 5 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 6 कसिणे 1 कसिणे 2 कसिणे 3 कसिणे 4 कसिणे 5 अरुपावचर आयतने 1 अरुपावचर आयतने 2 विपश्यनाभावना 1 विपश्यनाभावना 2 विपश्यनाभावना 3 विपश्यनाभावना 4 विपश्यनाभावना 5