Get it on Google Play
Download on the App Store

कसिणे 5

खिडकीच्या फटीतून किंवा वृक्षाच्या सांद्र छायेतून जेथे वर्तुळाकार किरण पडला असेल त्याला आलोककसिण समजून त्याची भावना करावी.

परिच्छिन्नाकासकसिणावर भावना करू इच्छिणार्‍याने भिंतीला किंवा मंडपादिकाला एक वीत चार आंगळे व्यासाचे वर्तुळाकार भोक पाडून त्याने व्यापलेली जागा आकाश आहे, असे चिंतन करावे.

याप्रमाणे या दहा कसिणांची विधाने झाली.  आता त्यांची निमित्ते कशी प्राप्‍त होतात याचे थोडक्यात विवेचन करतो.  परिकर्मनिमित्त, उद्ग्रहनिमित्त आणि प्रतिभागनिमित्त अशी तीन निमित्ते आहेत. परिकर्मनिमित्त म्हणजे डोळ्यांसमोर असलेले कसिणमंडळ.  हे अर्थातच भौतिक असते.  पण जेव्हा तेच निमित्त डोळे मिटले तरी डोळ्यांसमोर उभे रहाते तेव्हा त्याला उद्ग्रहनिमित्त म्हणतात.  या निमित्तात जडनिमित्ताचे दोष स्पष्ट दिसतात.  पण जेव्हा त्याच्याचसारखे पण निर्दोष आणि दिव्य असे मंडळ डोळ्यांसमोर येते तेव्हा त्याला प्रतिभागनिमित्त म्हणतात.  उदाहरणार्थ पृथ्वीचे जे जडमंडळ भावनेसाठी समोर ठेविले जाते, ते परिकर्मनिमित्त समजावे.  त्यानंतर बराच काळ चिंतन केल्याने तेच मंडळ डोळ्यासमोर येऊ लागले.  पण त्याबरोबरच पृथ्वीचा उंचसखलपणा किंवा असेच दुसरे दोष त्यात दिसू लागतात.  परंतु भावनेच्या योगे जेव्हा मन स्थिर होत जाते, तेव्हा तेच मंडळ पिशवीतून बाहेर काढलेल्या निर्मळ आरशाप्रमाणे अत्यंत शुद्ध आणि देदिप्यमान दिसू लागते.  यालाच प्रतिभागनिमित्त म्हणतात.  इतर कसिणांतहि ही तीन निमित्ते यथा योग्यपणे लागू पडतात. परंतु त्यांचा विस्तारपूर्वकविचार करण्याची जरूरी दिसत नाही.

या कसिणांवर चारहि ध्याने प्राप्‍त होतात, एवढेच नव्हे तर आकाशआनंत्यादिक जी चार अरूपावचर आयतने सांगितली आहेत, ती साध्य करण्याला यांची फार मदत होते.  परंतु त्यासाठी ही कसिणे मर्यादित न ठेवता अमर्यादित करावी लागतात.  आरंभ जरी कटोर्‍याएवढ्या किंवा सुपाएवढ्या कसिणापासून केला, तरी प्रतिभागनिमित्त प्राप्‍त झाल्यावर किंवा ध्यान प्राप्‍त झाल्यावर त्यांची मर्यादा क्रमाक्रमाने वाढवून ती विश्वमर्यादेपर्यंत नेऊ पोचवायची असते.  अशा रीतीने अमर्यादित केलेल्या कसिणावर जेव्हा चार ध्याने साध्य होतात तेव्हाच योग्याच्या अंगी अरूपावचर आयतनांचे ध्यान करण्याची योग्यता येते.

समाधिमार्ग

धर्मानंद कोसंबी
Chapters
समाधिमार्ग 1 समाधिमार्ग 2 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 1 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 2 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 3 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 4 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 5 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 6 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 7 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 8 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 9 आनापानस्मृतिभावना 1 आनापानस्मृतिभावना 2 आनापानस्मृतिभावना 3 आनापानस्मृतिभावना 4 आनापानस्मृतिभावना 5 कायगतास्मृति आणि अशुभे 1 कायगतास्मृति आणि अशुभे 2 कायगतास्मृति आणि अशुभे 3 कायगतास्मृति आणि अशुभे 4 कायगतास्मृति आणि अशुभे 5 ब्रम्हविहार 1 ब्रम्हविहार 2 ब्रम्हविहार 3 ब्रम्हविहार 4 ब्रम्हविहार 5 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 1 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 2 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 3 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 4 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 5 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 6 कसिणे 1 कसिणे 2 कसिणे 3 कसिणे 4 कसिणे 5 अरुपावचर आयतने 1 अरुपावचर आयतने 2 विपश्यनाभावना 1 विपश्यनाभावना 2 विपश्यनाभावना 3 विपश्यनाभावना 4 विपश्यनाभावना 5