आजारी सिंह आणि कोल्हा
एकदा एका सिंहाने अशी बातमी पसरवली की, आपण आजारी आहोत व जे प्राणी समाचाराला येतील ते प्राणी माझे मित्र आहेत असे समजेन. हे ऐकताच कोल्ह्याशिवाय सगळेजण सिंहाच्या समाचाराला आले. कोल्हा आला नाही असे पाहताच तो न येण्याचे कारण काय, याची चौकशी करण्यासाठी सिंहाने लांडग्यास पाठविले. तेव्हा लांडगा कोल्ह्यास म्हणाला, ' अरे, तू इतका निर्दय कशानं झालास ? सगळेजण महाराजांच्या समाचाराला गेले असता, तुझ्यानं राहवलं तरी कसं ?' त्यावर कोल्हा म्हणाला, 'लांडगेदादा, सिंहोबाला माझा नमस्कार सांगा नि माझी एक विनंती त्यांना कळवा की, माझी निष्ठा महाराजांच्या पायी पूर्वीइतकीच आहे अन् ती पुढेही कायम राहील. आपल्या आजाराची बातमी ऐकताच आपल्या समाचाराला यावं असं मला वाटतं, पण काय करावं ? महाराजांची गुहा दिसली की मला भीती वाटते. कारण जे प्राणी महाराजांच्या समाचाराला गेले ते सुरक्षितपणे परत आलेले मी अजून तरी पाहिले नाहीत.'
तात्पर्य
- एखादा माणूस काही तरी मतलबाने एखादी अफवा पिकवितो, ती एकाएकी खरी मानून त्या माणसाच्या कटात सापडणे मूर्खपणाचे होय.