म्हातारा आणि पोपट
एका म्हातार्यास मुलबाळ काही नव्हते म्हणून आपला वेळ घालविण्याकरता एक पोपट विकत घेण्याचे त्याने ठरविले. तो बाजारात गेला. तेथे बोलायला शिकलेले बरेच पोपट पिंजर्यात घालून विकायला आणले होते. त्यापैकी काही पोपट निरनिराळी वाक्ये पुन्हा पुन्हा म्हणत होते पण एक पोपट काही न बोलता गंभीर चेहरा करून शांत बसला होता. त्याच्याकडे वळून बघत म्हातारा म्हणाला, 'अरे, तू का बोलत नाहीस ?' त्यावर तो पोपट तत्त्ववेत्त्याप्रमाणे म्हणाला, 'मला बोलण्यापेक्षा विचार करणंच अधिक आवडतं.' हे शहाणपणाचे उत्तर ऐकून हा पोपट आपल्या चातुर्याने आपले बरेच मनोरंजन करील अशा समजुतीने म्हातार्याने त्याला विकत घेतले व आपल्या घरी नेऊन एका पिंजर्यात ठेवले. तेथे सुमारे एक महिना त्याने त्या पोपटाला आणखी काही वाक्ये शिकविण्याचा फार प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग तो मोठ्या रागाने त्या पोपटाला म्हणाला, 'अरे, तू अगदीच मूर्ख दिसतोस व तुझ्या एकाच वाक्याने फसून मी तुला विकत घेतला हा माझा मूर्खपणाचा होय !'
तात्पर्य
- पहिल्याच भेटीत एखाद्याविषयी ठाम मत ठरविणे हा मूर्खपणा होय.