Get it on Google Play
Download on the App Store

मोगल सरदार

या सगळ्या घडामोडींमुळे संभाजीराजे अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यांना पुढे करून दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळाने किल्ला नेटाने लढवला पण शत्रुपक्षात युवराज संभाजीराजे आहेत हे कळताच शरणागती पत्करली. संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी दिलेरखानाकडे केली. पण विजयोन्मादाने हर्षभरित झालेल्या दिलेरखानाने ७०० मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना त्याचा भयंकर संताप आला. त्यानंतर दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या अत्याचारांचा जाब विचारला. पण दिलेरखानाने त्यांना जुमानले नाही. संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे स्वराज्यातील पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष दूर होते.

संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यांची पन्हाळगडावर भेट घेतली. त्यांनी संभाजीराजांना शिक्षा केली नाही. संभाजीराजांची त्यांनी स्वतः समजूत काढली. मात्र संभाजीराजांच्या स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकर्‍यांमधील दरी अजूनच रुंदावली. सोयराबाईंनी संभाजीराजांना राजारामाच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. शिवाजी महाराजांचे राजारामाच्या विवाहानंतर काही दिवसात निधन झाले. ही बातमी सोयराबाईंनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कळवलीच नाही.

सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करायचा हुकूम पन्हाळ्याचा किल्लेदारास सोडला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा त्यांचा डाव होता. या अवघड प्रसंगी सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वास्तविक हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. पण संभाजीराजे हे गादीचे हक्काचे वारसदार होते. तसेच शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात लवकरच औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर हल्ला करणार अश्या बातम्या येत होत्या. अशा प्रसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे होते. राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळी असणे दौलतीसाठी हानिकारक ठरेल याची हंबीररावांना जाणीव होती. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावला आणि अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. मोरोपंत पेशव्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी कटात सहभागी केले होते.