Get it on Google Play
Download on the App Store

छत्रपती संभाजी महाराजांचे दानपत्र

छत्रपती संभाजी महाराजांना साधूसंतांबद्दल प्रचंड आदरभाव होता. त्या आदरभावाचे वेळोवेळी प्रकटीकरण झालेले आपल्याला त्यांच्या चरित्रातून दिसते. याचे एक उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे त्यांनी ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना करून दिलेले संस्कृत मधील दानपत्र. छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महदप्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्ती साठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री (ज्यांना संभाजी महाराज स्वामी म्हणतात) यांना दरसाल १०,००० पादशाही होनांचे संस्कृत दानपत्र करून दिले. हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाकारोहणानंतर एका महिन्याने म्हणजे दि. २४ ऑगस्ट १६८० (भाद्रपद शुद्ध १० सोमवार शके १६०२) रोजी केले आहे. दानपत्र ३०० से.मी. लांब आणि २३.५ से.मी. रुंद आहे. या दान्पात्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची १६ बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्च अक्षरात संस्कृत मध्ये २ ओळी लिहिल्या आहेत. त्या स्वतः शंभू राजांच्या हस्ताक्षरातील आहेत. त्य ओळी खालील प्रमाणे;

|| मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज ||
|| छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं || श्री ||


हे दानपत्र म्हणजे श्री शंभू राजांचे संक्षिप्त आत्मचरित्रच आहे. यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात. आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजास निशायुद्धाप्रवीण, तसेच 'हैन्दवधर्मजीर्णोद्धारकरणघृतमति' म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालून हिंदवी (हिंदू) धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'म्लेंछक्षयदीक्षित' म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्रांना पराभूत केले असा करतात. या वरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन होते.