प्रकरण १२
दरम्यान नेरॉवन्स्कीला एक महत्वाचा शोध लागला होता. मॉमसेन लंग्जमध्ये ऑक्सीजन भरण्याची जरूर नव्हती. उच्छ्वासावाटे बाहेर पडणारा कार्बन डाय ऑक्साईडपासून सोडालाईमद्वारे पुरेसा ऑक्सीजन वेगळा होत होता !
हेस ट्रकची ताकद हळूहळू कमी पडत चालली होती. स्वत:ला कसंबसं सावरत तो एस्केप ट्रंकमधून बाहेर पडला. सुदैवाने डेक्करने बाहेरच्या शिडीला बांधलेली वर जाणारी दोरी त्याच्या नजरेस पडली ! सावधपणे दोरीचा आधार घेत ट्रक बाहेर पडला. त्याला आता लाईफ जॅकेटची गरज नव्हती, परंतु तरीही त्याने ते धरुन ठेवलं होतं.
लाईफ जॅकेटमुळे ट्रक वरच्या दिशेने ढकलला जात होता. परंतु दोराचा आधार घेत सावधपणे तो वर निघाला होता.
एस्केप ट्रंकमध्ये असलेल्या नेरॉवन्स्कीची दोरीला बसणा-या हिसक्यांमुळे ट्रक खूपच घाईत वर जातो आहे अशी समजूत झाली. ट्रकला वेग कमी कमी करण्यासाठी सुचवावं म्हणून त्याने दोरीला हिसका दिला. परंतु त्यामुळे ट्रकचं मॉमसेन लंग्ज त्याच्यापासून सुटं झालं आणि पाण्यात दिसेनासं झालं !
ट्रक टँगपासून वीस फूट उंचीवर होता. अद्याप त्याला १६० फूट वर जाणं आवश्यक होतं. धीर न सोडता हळूहळू तो वरच्या दिशेने जात होता. हळूहळू पाण्याचा दाब कमी कमी होत गेला आणि एका क्षणी तो पाण्याच्या पृष्ठभागावर पोहोचला !
सुदैवाने त्याला कोणताही त्रास झाला नव्हता ! क्षणभर आपण बेशुध्द पडणार असं त्याला वाटलं, परंतु धीर धरुन तो लाईफ जॅकेटच्या सहाय्याने तरंगत राहीला.
काही मिनीटांनी ट्रकला हाक ऐकू आली. आजूबाजूला पाहताच त्याला डेक्कर दिसला. पन्नास यार्डांवर तो पिवळ्या रंगाच्या बुऑयला धरून तरंगत होता. ट्रक डेक्करपाशी पोहोचला. दोघांनी मिळून लाईफजॅकेट बुऑयला बांधलं.
डेक्कर आणि ट्रकने आपल्या जवळील जास्तीचं सर्व सामान खाली फेकून देण्याचा निर्णय घेतला. आपल्या जवळील रिव्हॉल्वर आणि खाद्यपदार्थ त्यांनी खाली सोडून दिले.
१८० फूट खाली एस्केप ट्रंकमध्ये जॉन फ्लूकरची सहनशक्ती संपली. पाणबुडीतून निसटण्याचा विचार सोडून मरण पत्करण्याचा त्याचा पक्का निश्चय झाला होता. त्याने बाहेरील हॅच बंद केली आणि नेरॉवन्स्कीने टॉर्पेडो रुमच्या दारावर दणादणा आघात करुन ते उघडण्याची सूचना केली.
काही वेळाने टॉर्पेडो रुमची हॅच उघडली गेली. फ्लूकर खाली उतरुन एका बंकमध्ये शिरला.
नेरॉवन्स्की अद्याप एस्केप ट्रंकमध्ये होता. कोणत्याही परिस्थीतीत बाहेर पडण्याचा त्याचा ठाम निश्चय होता. त्याने टॉर्पेडो रुममध्ये हाका मारण्याचा सपाटा लावला होता. बाहेर पडण्यासाठी मॉमसेन लंग्जमध्ये ऑक्सीजन भरण्यासाठी शेवटचा ऑक्सीजन व्हॉल्व उघडण्याची त्याने सूचना दिली.
दरम्यान हँक फ्लॅगनन शुध्दीवर आला होता. नेरॉवन्स्कीचा आवाज येताच त्याने त्याच्याबरोबर पाणबुडीबाहेर पडण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. एव्हाना टॉर्पेडो रुममध्ये धूर पसरण्यास सुरवात झाली होती. काही वेळातच बॅटरीतून येणारा क्लोरीन टॉर्पेडो रुममध्ये शिरुन सर्वाचा जीव घेणार होता.
फ्लॅगनन एस्केप ट्रंकमध्ये पोहोचला.
" अजून कोणीतरी चला आमच्याबरोबर !" फ्लॅगननने आवाज दिला.
जेसी डी'सिल्वा टॉर्पेडो ट्यूबजवळ उभा होता. फ्लॅगननचा आवाज ऐकताच तो आपल्या मित्राकडे ग्लेन हॉजकडे वळला. हॉ़ज विवाहीत होता. त्याची पत्नी गरोदर होती.
फ्लॅगननने पुन्हा आवाज दिला. हॉजला प्रयत्न करण्याचीही धास्ती वाटत होती.
" मी जातो आहे !" अखेर डी'सिल्वाने शिडी चढण्यास सुरवात केली, " कम ऑन् !"
हॉजने खालूनच हात हलवला आणि मागे फिरुन तो एका बंकमधे शिरला !
एव्हाना सकाळचे ८.०० वाजले होते. टँगने सागरतळ गाठल्यास पाच तास उलटून गेले होते.
पाणबुडीतील इतरांनी मृत्यूला सामोरं जाण्याची मानसिक तयारी केली. आपापल्या बंकमध्ये पडून ते आपली वेळ येण्याची वाट पाहत होते. पॉल लार्सन त्यांना शक्यं ती सर्व मदत करत होता. पाणबुडीतून बाहेर पडणा-या शेवटच्या तुकडीबरोबर बाहेर पडण्याचा लार्सनने विचार केला होता.
एस्केप ट्रंकमध्ये नेरॉवन्स्कीने पाणी भरण्याची यंत्रणा सुरु केली. पाण्याचा दाब असह्य होत होता, परंतु तरीही बाहेर पडायचंच या तीव्र इच्छेने ते तिघं तग धरुन होते. अखेरीस एस्केप ट्रंकमधील पाण्याचा दाब समुद्राच्या दाबापेक्षा वाढला.
नेरॉवन्स्कीने एस्केप ट्रंकची हॅच उघडली आणि बुऑयकडे जाणा-या दोरीच्या सहाय्याने तो पाणबुडीतून बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ हँक फ्लॅगनन आणि जेसी डी'सिल्वा बाहेर पडले होते. हळूहळू एकेक फूट पार करत ते वरच्या दिशेने निघाले होते.
पाणबुडीपासून सुमारे ऐशी फूट वर आल्यावर डी'सिल्वाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याने आपला वेग कमी केला. तो आवश्यकतेपेक्षा वेगाने वर निघाला होता. स्वतःला सावरत त्याने एकेक फूट अंतर कापण्यास सुरवात केली. हळूहळू पाण्याचा दाब कमी झाला आणि एका क्षणी तो पृष्ठभागावर पोहोचला !
डी'सिल्वाने आजूबाजूला नजर टाकली. काही अंतरावर त्याला पीट नेरॉवन्स्की आणि हँक फ्लॅगनन दिसले. ते ब-यापैकी सुस्थीतीत होते. काही अंतरावर त्याला पिवळा बुऑय आणि त्याच्या सहाय्याने तरंगणारे ट्रक आणि डेक्कर दिसले. डी'सिल्वाने बुऑय गाठला. त्याच्या पाठोपाठ नेरॉवन्स्की आणि फ्लॅगननही तिथे पोहोचले.
दुर दहा मैलांवर चीनचा समुद्रकिनारा दिसत होता. सध्याच्या आपल्या परिस्थीत आपण तिथे पोहोचू शकणार नाही याची डेक्करला कल्पना होती. पाण्याचा तीव्र प्रवाह खुल्या सागराच्या दिशेने वाहत होता. ट्रक आणि नेरॉवन्स्कीने मात्र चीनच्या दिशेने मार्ग काढण्यास सुरवात केली. मात्रं अवघ्या काही मिनीटांतच ते माघारी परतले.
टँगच्या टॉर्पेडो रुममध्ये पॉल लार्सनने शेवटचा प्रयत्न करण्याचा निश्चय केला होता. त्याच्याबरोबर ओ'केनचा केबीन बॉय असलेला हॉवर्ड वॉकर होता. टॉर्पेडो रुममध्ये मॉमसेन लंग्जविना उभं राहणंही अशक्यं झालं होतं. उष्णतेमुळे पाणबुडीच्या आतील भागातला रंग वितळण्यास सुरवात झाली होती !
लार्सन आणि नाक फुटलेल्या वॉकरने एस्केप ट्रंकमध्ये पाणी भरण्यास सुरवात केली होती. वाढत जाणा-या पाण्याचा दाब कसाबसा सहन करुन दोघं पाणबुडीतून बाहेर पडले होते, परंतु ढासळत्या मानसिक अवस्थेत सावधपणे हालचाली करणं त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं.
पॉल लार्सन प्रथम पृष्ठभागावर पोहोचला. परंतु त्याची अवस्था भयंकर झाली होती. तो जेमतेम जिवंत होता इतकंच. त्याचे हात-पाय आकडीमुळे वेडे-वाकडे झाले होते. त्याला श्वसनाला त्रास होत होता. त्याची फुफ्फुसं कामातून गेली असावीत अशी डेक्करला शंका आली.
डी'सिल्वा आणि नेरॉवन्स्कीने लार्सनला बुऑयपाशी आणलं. लार्सनला आपलं डोकं पाण्यावर ठेवणंही जमत नव्हतं. डी'सिल्वाने लार्सनचे हात बुऑयच्या खाचेत ठेवले, परंतु लार्सनला बुऑय धरण्याइतकीही ताकद उरली नव्हती. तो मृत्यूपंथाला लागला होता.
लार्सन पाठोपाठ बुऑयपासून सुमारे पस्तीसेक फूट अंतरावर हॉवर्ड वॉकर पृष्ठभागावर प्रगटला ! त्याने मॉमसेन लंग्जचा वापर केलेला दिसत नव्हता. कदाचित त्याच्या फुटलेल्या नाकामुळे त्याला मास्क चढवता आला नसावा. वर येताच तो पोहता येत नसलेल्या माणसाप्रमाणे हात-पाय झाडू लागला.
जेसी डी'सिल्वाने वॉकरच्या दिशेने सूर मारला ! परंतु डी'सिल्वा त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच वॉकर पाण्याखाली गेला होता. काही क्षण त्याचं शरीर दिसत होतं, परंतु खोल समुद्रात जाणा-या प्रवाहाबरोबर तो इतरांपासून दूर खेचला गेला.
जेसी डी'सिल्वाला पुन्हा बुऑय गाठण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागली.
बुऑयपाशी सर्वजण लार्सनचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. त्याने बरंच पाणी गिळलं होतं. योग्य वैद्यकीय मदत मिळाली असती तर लार्सनचा जीव वाचण्याची शक्यता होती. परंतु भर समुद्रात कोणती मदत मिळणार होती ?
सकाळचे नऊ वाजून गेले होते.
टँगमधून आपले आणखीन सहकारी वर येतील या अपेक्षेने सर्वजण आजूबाजूला नजर ठेवून होते, परंतु कोणाचाही मागमूस लागला नाही. टँगमधून बाहेर पडलेले लार्सन आणि वॉकर हे शेवटचे नौसेनीक होते.
टँगपासून काही मैल अंतरावर पी-३४ ही जपानी पेट्रोल बोट गस्त घालत होती. रात्रभरात टँगच्या हल्ल्याला बळी पडलेल्या बोटीतील नौसेनीकांची सुटका करण्याचं काम पी-३४ करत होती. टँगने उडवलेल्या ऑईल टँकरमधील वाचलेले अनेक नौसेनीक पी-३४ च्या डेकवर विव्हळत पडले होते. बॉयलरचा स्फोट झाल्याने ते वाईट रितीने भाजलेले होते.
पी-३४ च्या डेकवरुन एक लाईफबोट समुद्रात सोडण्यात आली. हातात भरलेल्या रायफली घेतलेले दोन जपानी नौसेनीक त्या बोटीत होते. आदल्या रात्री टँगने बुडवलेल्या एका बोटीच्या अद्याप समुद्रावर असलेल्या पुढील भागाकडे ती लाईफबोट निघाली.
बिल लेबॉल्ड आणि फ्लॉईड कॅव्हर्ली बुडालेल्या बोटीच्या पुढील भागाकडे निघाले होते. लाईफबोटीतील जपानी सैनीकांच्या ते दृष्टीस पडले.
" आपण त्या बोटीकडे जाऊ !" बुडालेल्या बोटीच्या पुढच्या भागाकडे हात करत कॅव्हली लेबॉल्डला म्हणाला, " तिथे एखादी लाईफबोट मिळाली तर आपल्याला चीनचा किनारा गाठता येईल !"
त्याचवेळी कॅव्हर्ली आणि लेबॉल्डला जपानी लाईफबोट दिसली. दोघांनी त्यांना हाका मारण्याचा सपाटा लावला, पण जपान्यांना त्यांची भाषा समजत नव्हती. त्यांच्या युरोपीय तोंडावळ्यामुळे जपानी गोंधळले होते.
" दोईत्सू का ? ( तुम्ही जर्मन आहात का ?)" दोघांपैकी एका जपान्याने त्यांना विचारलं.
दोघा जपान्यांनी कॅव्हर्ली आणि लेबॉल्डला लाईफबोटीवर ओढून घेतलं. टँगने बुडवलेल्या बोटींपैकी एका बोटीवर जर्मन नौसेनीक होते. हे दोघे त्यांच्यापैकीच असावेत अशी त्यांची कल्पना झाली होती.
" दोईत्सू का ?" जपान्यांनी पुन्हा प्रश्न केला.
कॅव्हर्लीने लेबॉल्डला डोळा मारला आणि जपान्यांकडे वळून त्याने खाडकन जर्मन पध्द्तीने सॅल्यूट ठोकला.
" हाईल हिटलर !"
जपानी दोघांसह पी-३४ कडे परत फिरले. काही अंतरावर त्यांना पाण्यावर तरंगणा-या एका माणसाचं डोकं दिसलं. एका लाकडी फळीच्या आधाराने तो तरंगत होता.
टँगचा कमांडर रिचर्ड 'डिक' ओ'केन !
लेबॉल्ड आणि कॅव्हर्लीने ओ'केनला वर ओढून घेतलं.
" गुड मॉर्नींग कॅप्टन ! तुम्हांला लिफ्ट हवी आहे ?" लेबॉल्डने मजेत प्रश्न केला.
लेबॉल्डच्या तोंडून ' कॅप्टन ' हा शब्द ऐकताच जपान्यांची ट्यूब पेटली. त्यांनी समुद्रातून वाचवलेले नौसेनीक जर्मन नसून अमेरिकन होते ! दोघांपैकी एकाने रायफलच्या धाकाखाली तिघांना लाईफबोटीच्या मागच्या भागात बसवलं आणि त्यांच्यावर नजर ठेवून ती लाईफबोट पी-३४ वर परतली.
सकाळचे १०.३० वाजले होते. टँगमधून वाचलेल्या तिघा नौसेनीकांना घेऊन ती लाईफबोट पी-३४ वर पोहोचली. शिडीवरुन डेकवर पाऊल ठेवताच कॅव्हर्लीच्या तोंडावर एक सणसणीत ठोसा बसला !
जपानी पाहुणचाराची ती सुरवात होती !