Get it on Google Play
Download on the App Store

पांडवविवाहातील विसंगति



महाभारत हा भारताचा सांस्कृतिक ठेवा आहे. त्यांतील मुख्य कथा सर्वपरिचित आहे. पांच पांडव व एक द्रौपदी यांचा विवाह ही एक विलक्षण घटना आहे. एका स्त्रीचा पांचांशी विवाह हा आर्यांच्या आचारचौकटीत बसणारा नाही. इतिहास-पुराणात इतरत्र कोठेही अशी घटना आढळत नाही. भारताच्या उत्तरसीमेवरील काही लोकसमूहांमध्ये असा आचार अजूनहि चालू आहे असे म्हणतात पण त्याला कोठेहि प्रतिष्ठित समाजात मान्यता नाही. मात्र नवलाची गोष्ट ही कीं महाभारताचे नायक म्हणतां येतील अशा पांडवांशी ही घटना निगडित असूनहि त्यामुळे त्याना गौणत्व आले असे दुर्योधन व कर्ण सोडून इतर कोणीहि म्हणत नाही. इतर कोणी लेखक, विचारवंत वा टीकाकार तसे म्हणत नाही. पांडव, द्रौपदी, व कुरु-पांचाल कुळांनी हा विवाह आनंदाने मान्य केला. पांडवांच्या वैवाहिक जीवनावर त्याची छाया पडलेली नाही. महाभारतांतील अनेक कोड्यांपैकी हे एक कोडे आहे. महाभारत वाचताना या घटनेचा सर्व तपशील चौकसपणे तपासला तर अनेक गोष्टी नजरेला येतात. त्यांचा परामर्ष घेताना मी अशी भूमिका घेतली आहे कीं ही माणसांची कथा आहे, देव वा राक्षसांच्या अवतारांची नव्हे. घडलेल्या घटना मूळ लेखकाने यथातथ्य नोंदल्या आहे पण जय चा महाभारत होताना कित्येक विसंगति भरल्या आहेत व त्या या विवाहाचे समर्थन करण्यासाठी आल्या आहेत. सर्व पात्रे मानवी आहेत ही भूमिका घेतली की काही गोष्टींचा खुलासा शोधण्यासाठी थोडे कल्पनास्वातंत्र्य घ्यावे लागते. या दृष्टिकोनातून पांडवविवाहाची पूर्वपीठिका तपासून पहावयाची आहे. सर्व पांडवकथा सुरवातीला पाहण्याची गरज नाही, ती सुपरिचित आहे. कौरव-पांडवांच्या शिक्षणसमाप्तीपासून सुरवात करूं.