Get it on Google Play
Download on the App Store

अशा विवाहाला संमती देण्यामागचा कुंतीचा हेतू

पांडवांचा द्रौपदीशी संसार पुढे कसा चालला याही विषयाला अनेक पदर आहेत. सर्व पांडवांनी इतरही विवाह केले. भीमाचा हिडिंबेशी संबंध पूर्वीच आला होता व त्याला घटोत्कच हा पुत्रही झाला होता. मात्र त्याचा दुसऱ्या कोणा स्त्रीशी विवाह झाल्याचा उल्लेख नाही. युधिष्ठिर, नकुल व सहदेव यांचे दुसरे विवाह कधी झाले त्याचा उल्लेख नाही पण ते झाले हे नक्की. अर्जुनाचे तर अनेक विवाह झाले. पांडव-द्रौपदी विवाहानंतर पांडव इंद्रप्रस्थाला राज्य करू लागल्यावर एकदा नारद त्यांच्या भेटीला आले असतां त्यांनी सुंदोपसुंदांची कथा त्याना सांगून पत्नीवरून तुमच्यांत वितुष्ट येऊ देऊ नका असा सल्ला दिला. पांडवांनी स्वत:च यासाठी नियम केला की एका भावाच्या द्रौपदीशी एकांताचा दुसऱ्याने भंग केला तर अपराध्याने तीर्थयात्रा करावी व ब्रह्मचर्य पाळावे. किती काळ ते स्पष्ट नाही. नारदाने याला संमति दिली. मात्र पांच भावानी द्रौपदीचे पतित्व, एकमेकांशी वितुष्ट येऊ न देता कसे उपभोगावे याबद्दल या नियमात काहीच सांगितलेले नव्हते! फक्त एकांतभंगाला शिक्षा ठरवून दिली होती. पण मग, हा वेळपर्यंत व येथून पुढेहि आयुष्यभर, पांडव कोणता नियम पाळत होते? याचा स्पष्ट उल्लेख कोठेच केलेला नाही! बहुपतित्वाचा रिवाज पाळणाऱ्या समाजात अजूनही जी चाल आहे असे म्हणतात व जी नैसर्गिक म्हणावी लागेल ती म्हणजे एकेका भावाने क्रमाक्रमाने, पतित्व उपभोगावे व अपत्यजन्मानंतर पतिहक्क पुढील भावाकडे जावा. संततीच्या पितृत्वाबद्दल निरपवादित्व असण्यासाठी ही चाल योग्यच म्हटली पाहिजे. पांडवांनीहि अर्थातच हाच क्रम चालवला असला पाहिजे. अर्जुन तीर्थयात्रेला गेला तोपर्यंत द्रौपदीला अपत्यप्राप्ती झालेली नव्हती. युधिष्ठिरापासून व मग भीमापासून तिला अपत्य झाल्यावर मग अर्जुनाचा क्रम येणार होता! हा वेळपर्यंत त्याचा इतरही कोणाशी विवाह झालेला नव्हता. त्यामुळे वैतागून जाऊन, द्रौपदीसाठी वाट पहात बसण्यापेक्षा बाहेर पडावे हे बरे असे त्याने ठरविले असावे. चोरांपासून ब्राह्मणांच्या गायी सोडवण्यासाठी शस्त्रागारात जावे लागून युधिष्ठिर-द्रौपदी यांचा एकांत भंग केल्याचे कारण त्याला आयतेच मिळाले. नियमच केलेला असल्यामुळे त्याला अडवताही आले नाही! ठरलेल्या नियमाप्रमाणे खरेतर त्याने तीर्थयात्रेच्या काळात ब्रह्मचर्य पाळावयास हवे होते. ते त्याने अजिबात पाळले नाही. उलुपी व चित्रांगदा यांचेशी त्याने विवाह केले. चित्रांगदेला बभ्रुवाहन हा पुत्रही झाला. मात्र तीं दोघें तिच्या पित्याच्या घरीं राहिली. अर्जुन पुन्हा एकटाच! तीर्थयात्रेच्या अखेरीला तो द्वारकेला गेला असतां सुभद्रा त्याला दिसली व आवडली. बलरामाची संमति मिळणार नव्हती तेव्हा कृष्णाच्या सल्ल्याप्रमाणे त्याने सुभद्रेला सरळ पळवून नेली. अर्जुनाशी कोण लढणार तेव्हा यादव अखेर कबूल झाले. मात्र विवाह करण्यापूर्वी दूत पाठवून युधिष्ठिराची संमति विचारली. बहूधा अर्जुनाला भीति वाटली असावी कीं ही पण पांचांची पत्नी होणार नाही ना? सुभद्रेला घेऊन तो इंद्रप्रस्थाला परत आला. लक्षांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अर्जुनाने नाही पण इतर पांडवांनी या काळात बहुधा ब्रह्मचर्य पाळले असावे. कारण अजूनहि द्रौपदीला अपत्य झालेले नव्हते! सुभद्रेचा पुत्र अभिमन्यु जन्मल्यानंतर मात्र एकएक वर्षाच्या अंतराने तिला एकेका पांडवापासून एकेक पुत्र झाला. यावरून स्पष्ट दिसते की पांडवानी वर उल्लेखिलेला रिवाजच पाळला. तेथून पुढे जीवनाच्या अखेरीपर्यंत द्रौपदी सर्व सुखदु:खात, हाल अपेष्टांत, तसेच ऐश्वर्यांत पांडवांची पत्नी व सखी ल्हाली. कुंतीचा या विवाहामागे जो पांचांना एकत्र ठेवण्याचा हेतु होता तो निश्चितच सफळ झाला. पांडवांचे उदाहरण इतर कोणी गिरवल्याचे मात्र दिसून येत नाही. असा संसार यशस्वी करणे हे लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांनाच शक्य, येरागबाळाचे काम नोहे हे त्याचे कारण म्हणतां येईल.