Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण 3

आम्ही महालापाशी पोहोचतो न पोहोचतो तोच एक माणूस धावतच आमच्यापाशी आला आणि वाघमारेंचे पाय धरत म्हणाला,


"वाघमारे साहेब... वाघमारे साहेब, मला वाचवा!! खुप भयानक संकट कोसळले आहे हो माझ्यावर.. संग्रहालयाची जबाबदारी माझ्यावर आहे हो.. या घटनेसाठी मला जबाबदार धरले जाईल! मी कुटुंब असलेला माणूस आहे साहेब.. उद्या माझ्याबरोबर काय होईल सांगता येत नाही.. काहीतरी करा साहेब, काहीतरी करा!! "


" शांत व्हा सावंत, शांत व्हा.. " वाघमारेंनी त्यांना उठवून त्यांची समजूत घातली, " आम्ही तुमच्या मदतीसाठीच धावून आलो आहोत. आपण नक्कीच यातून काही मार्ग काढू."


श्री. सावंतांनी आपला घामाने थबथबलेला चेहरा पुसला. ते अपादमस्तक थरथरत होते. वाघमारेंनी रखवालदाराच्या मदतीने त्यांना आत नेऊन बसवले आणि प्यायला पाणी दिले. पाणी पिल्यानंतर सावंत थोडे शांत झाले.


"मला प्रथम सांगा, की ही घटना घडलेली आहे, हे माहीत असणारे आपल्याव्यतिरीक्त आणखी कोण कोण  आहे? "


" फक्त चेअरमन साहेब. आपल्याव्यतिरीक्त फक्त त्यांनाच ही गोष्ट कळालेली आहे. ते आजारपणामुळे आधीच घरी झोपून होते. त्यातच ही बातमी ऐकून त्यांनी हाय खाल्ली आहे. त्यांची तब्येत सध्या खुपच बिकट अवस्थेत आहे. "


" मग त्यांनी ही गोष्ट कोणाला सांगितली असेल काय? "


" नाही नाही.. त्यांनी मला वचन दिलंय. अगदी डॉक्टरांनाही कळत नाहीये की चेअरमनसाहेबांची तब्येत अशी अचानक का बिघडली. पण साहेबांनी ही बातमी फुटू दिली नाहीये. " सावंत म्हणाले.


" नाव काय आहे चेअरमनसाहेबांचं? " अल्फाने विचारले.


" सुधाकर लिमये. " श्री. सावंत म्हणाले.


" आपल्या सर्वां-व्यतिरीक्त आणखी एक अशी व्यक्ती आहे, जिला हा प्रसंग कसा घडला, याची आपल्यापेक्षा निश्चितच अधिक चांगली माहिती आहे; आणि ती व्यक्ती म्हणजे गुन्हेगार, ज्याला आपण शोधायचं आहे. " वाघमारे म्हणाले, " रखवालदार, तू मला खुनाची जागा दाखवू शकतोस का? "


" हो.. हो साहेब.. चला.. " रखवालदार तर चांगलाच गांगरून गेला होता. त्याने आम्हा तिघांना आतमधल्या दालनात नेले. तेथे कित्येक जुन्या, ऐतिहासिक वस्तू काचेच्या पेट्यांत बंद केलेल्या अवस्थेत होत्या. एरवी मला त्या पहायला नक्कीच आवडल्या असत्या. पण सद्यस्थितीत त्या दालनात लक्ष वेधून घेणार्‍या फक्त दोनच गोष्टी होत्या. एक - दालनाच्या मधोमध असणारी रत्नजडित खंजिराची सताड उघडी पडलेली रिकामी पेटी ; आणि दोन - त्या पेटीलगतच खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह!!


माझ्या डोळ्यांसमोर दोन क्षण अंधारीच आली. अंगावर शिरशिरी आणणारे ते भयानक दृश्य पाहून मी माझे डोळे बंद करून घेतले. असे काही पाहण्याचा प्रसंग माझ्यावर पहिल्यांदाच आला होता. वाघमारे आणि अल्फा त्या मृतदेहाजवळ गेले. त्या रखवालदाराच्या छातीत धारदार सुरा खुपसून त्याचा खून करण्यात आला होता. छातीमध्ये सुरा तसाच होता. अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला असावा.


वाघमारे आणि अल्फाने त्या देहाची, तसेच त्या दालनाची तपासणी केली. मला तर ताबडतोब तेथून बाहेर पडण्याची इच्छा होत होती. पण कसेबसे मी स्वतःला रोखून धरले.


"घटना ज्यावेळी घडली, तेव्हा तू इथेच होतास? " वाघमारेंनी दुसर्‍या रखवालदाराला विचारले.


" होय... होय साहेब... मी.. मी गेटपाशी उभा होतो."


"मग मला सविस्तर सांग, इथे काय घडलं आणि तू काय पाहिलंस ते. "


" साहेब, माझं नाव तुकाराम माळी. मी गेली दोन वर्षे या संग्रहालयाची रखवाली करतो. इथे रखवालदार तीन वेळांत काम करतात. एका वेळी दोघेजण. संग्रहालयातील सर्व वस्तू फायबरच्या काचपेटीत बंद असल्यामुळे सुरक्षेसाठी फारसे मनुष्यबळ लागत नाही. आज रात्री रखवाली करण्याची जबाबदारी आमची होती, मी आणि हा पाटील. मी समोरच्या आणि हा पाटील मागच्या गेटपाशी उभा होता. दहा वाजण्याच्या सुमारास, बहुधा पावणेदहा असावेत, हा पाटील पुढच्या गेटला आला. तासभर एकटे उभे राहून आम्ही कंटाळलो होतो. त्यामुळे पाच - दहा मिनिटे असेच गप्पा मारत उभारलो. मध्येच पाटलाला कसलातरी आवाज ऐकू आला म्हणे. मला तर काहीच जाणवले नव्हते. बहुधा माझे लक्ष नसावे. पाटलाचे कान तीक्ष्ण होते, हे मी कधीही मान्य करेन. मग तो म्हणाला, तू इथेच थांब. मी जरा आतमधली पाहणी करून आलो. मी त्याला हो म्हणालो. तो आत गेला तो गेलाच.. पाच मिनिटे झाली, दहा मिनिटे झाली, तरी हा बाहेर यायला तयारच नाही. मग मी स्वतःच आत येऊन पाहिलं, तर.... "


माळी तेथेच थांबला. पुढचे बोलण्याचे त्याचे धाडसच झाले नाही. अल्फाने त्या उघड्या पडलेल्या काचपेटीचे सखोल निरीक्षण केले. त्या पेटीला कुठल्याही बाजूने आघात झाल्याचे किंवा तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निशाण नव्हते. फक्त त्या पेटीचे लॉक मात्र ओपन होते आणि किल्ली त्यालाच लागून राहिली होती. आतमधला रत्नजडित खंजिर गायब होता.


"या सगळ्या पेट्यांच्या लॉकच्या किल्ल्या ठेवण्याची जागा कोणती आहे? " अल्फाने विचारले.


" चेअरमन साहेबांची केबिन. " माळी म्हणाला, " तिथल्या कपाटात या सर्व पेट्यांच्या चाव्या असतात. "


" मी त्या पाहू शकतो का? "


" हो, हो. या ना साहेब. दाखवितो. "


माळीने आम्हाला चेअरमनच्या केबिनमध्ये नेले. ती केबिन खुपच टापटीप होती. जमिनीवर मऊ गालिचा अंथरला होता. माळीने कपाट उघडले आणि ड्रॉवर बाहेर काढून त्यामागचा चोरकप्पा दाखविला. त्यामध्ये बऱ्याच य किल्ल्या जुडग्यामध्ये एकत्र बांधल्या होत्या.


" विचित्र..." अल्फा पुटपुटला.


"काय? " मी विचारले. अल्फाने नकारार्थी मान डोलावली. त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसत होते, की त्याच्या मनातील विचार किती वेगाने धावत असतील..


" हं.. म्हणजे इथून गुन्हेगाराने चावी मिळविली. " फारच हुशार दिसतोय हा माणूस! माझ्या मते आपण या केबिनची तपासणी करायला हवी."


"होय, होय. अगदी योग्य बोललात सर. " अल्फाने सहमती दर्शविली. ते दोघे मिळून केबिनची तपासणी करू लागले. मीही, जरी मला काय शोधायचे हे ठाऊक नसले तरी, इकडे तिकडे काही दिसते का ते पाहू लागलो. त्या कपाटावर किंवा दरवाजावर गुन्हेगाराने कोणतेच निशाण सोडले नव्हते. अल्फा चेअरमनच्या टेबलापाशी शोधू लागला. अचानक चमकून त्याने खाली वाकून पाहिले.


"इथे काहीतरी आहे! " तो वाघमारे सरांना म्हणाला. त्याने आपल्या खिशातून भिंग काढले आणि टेबलाजवळच्या गालिचाचे नीट निरीक्षण केले. वाघमारेही वाकून पाहू लागले.


" इथला गालिचा दबला गेलाय. " वाघमारे म्हणाले, " माळी, या केबिनमध्ये आज कोणी बराच वेळ थांबलेलं होतं का? "


" नाही साहेब. सकाळी सफाई कामगार स्वच्छता करून गेला. मग सावंत साहेबांनी थोडा वेळ काम पाहिलं. त्यानंतर कोणीच नाही आलेलं. चेअरमनसाहेब आजारी असल्याने गेले काही दिवस केबिन रिकामीच आहे. "


" मला खात्री आहे, की हा गालिचा श्री. सावंतांमुळे दबलेला नाहीये. इतक्या वेळात तो पुन्हा पूर्ववतही झाला असता. हे काही वेळापूर्वीचेच निशाण आहे. इथे नक्कीच खुनी उभा राहिला असला पाहिजे. " वाघमारे म्हणाले.


" उभा नाही सर, बसला असला पाहिजे. " अल्फाने सुचविले, " गालिचा वरवर नाही, तर चांगलाच खोल दबला गेलाय. त्याअर्थी त्यावर नक्कीच जास्त भार पडला असणार. आणि शिवाय, खुनी गालिचा एवढा खोल दबला जाईपर्यंत तसाच मख्खपणे उभा राहिल, हे मला नाही पटत. "


" हं .. कदाचित असेच असेल." वाघमारे विचार करीत बोलले, "पण मग तो बसला तरी का? त्याचे काम फक्त इतकेच होते, की कपाटातून चावी मिळविणे, बाहेरच्या पेटीचे लॉक काढणे आणि खंजीर घेऊन पळून जाणे. पण हे टेबल तर कपाटापासून जवळपास तीन मीटर तरी लांब आहे. मग तो इकडे का आला??"


अल्फाने आणखी खाली वाकून टेबलाखाली काही आहे का ते पाहिले. पण त्याला काहीच दिसले नाही. मग खालचा ड्रॉवर उघडला. त्यातही सर्व सामान जागच्या जागी होतेे. वाघमारेंच्या प्रश्नाचे उत्तर काही अल्फाला सापडेना. मग त्याने टेबलाचे निरीक्षण केले. ते टेबल एकसंध, पांढऱ्या रंगाचे आणि लाकडी होते. त्या टेबलाच्या बाजूच्या भागाकडे, दबलेल्या गालिचाच्या वरच्या बाजूला अल्फाने बोट दाखविले. मी जवळ जाऊन पाहिले, तेव्हा मला त्या पांढर्‍या पृष्ठभागावर थोडेसे काळपट डाग पडलेले दिसले. अल्फा आपल्या भिंगातून त्या डागांचे निरीक्षण करू लागला. अगदी अस्पष्ट होते, पण नुकतेच पडल्यासारखे वाटत होते. अल्फाने प्रथम आपल्या मोबाईलमध्ये त्या डागांचा फोटो काढला. मग त्यावरून हलकेच बोट फिरविले. त्याचे बोटही काळे पडले. बहुधा तो कसलातरी काळा तेलकट पदार्थ होता. अल्फाने त्याचा वास पाहिला. मी बराच वेळ त्याची कृती पहात होतो. पण त्या डागांमध्ये त्याला काय मिळाले आहे, हे मला समजत नव्हते. जेव्हा अल्फाने आपल्या बोटाचा वास घेतला, तेव्हा तो जास्तच गोंधळात पडलेला मी पाहिला.


मग अल्फाने त्या केबिनचा थोडा अंदाज घेतला. दरवाजासमोर बरोबर कपाट होते. कपाटाला लागूनच आलिकडे भिंतीत खिडकी होती. त्यामधून मंद असा चंद्रप्रकाश केबिनमध्ये येत होता. डाव्या बाजूला कपाटापासून थोड्या अंतरावर टेबल होते. तो दबलेला गलिचाचा भाग टेबलाच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजे कपाट ज्या बाजूला होते, त्याच्या बरोबर विरूद्ध बाजूला होता. अल्फाने ती केबिन मनात साठवून ठेवली.


"काही विशेष मिळाले का रे? किती वेळ इथेच घुटमळतोयस! " वाघमारेंना तेथून बाहेर पडायची घाई झाली होती.


" नाही सर. मला फार काही वेगळे मिळाले नाही. " अल्फा म्हणाला. आम्ही चौघेजण केबिनच्या बाहेर आलो. मग अल्फाने त्या महालाचा उरलेला भाग तपासला. पुढे, मागे, इकडे, तिकडे. मी त्याच्या मागे मागेच होतो. त्या महालाच्या मागील बाजूच्या खिडकीपाशी तो बराच वेळ थांबला. तेथेही त्याने मघासारखाच फोटो काढून घेतला. ते झाल्यानंतर आम्ही पुन्हा मुख्य कक्षात आलो. मग अल्फाने त्या मृत रखवालदाराच्या देहाची पुन्हा एकदा तपासणी केली. वाघमारे अल्फाकडे 'हा काय शहाणाच समजतोय फार स्वतःला' अशा अविर्भावात पहात होते. अल्फा चेहऱ्यावरून तरी काही दर्शवित नव्हता. पण त्याचे मन बऱ्याच गोष्टींची नोंद घेत असावे, असे मला वाटले.


"श्री. माळी, तुमच्या चेअरमन साहेबांशी ज्यांची खास ओळख आहे आणि केबिनमध्ये ज्यांची बऱ्याचदा ये-जा असते, अशा लोकांची नावे सांगाल का? "


" अं.. थांबा साहेब. जरा विचार करतो.. हां, पहिले म्हणजे आपले संचालक सावंतसाहेब, व्यवस्थापक श्री गणपते, शिवाय चेअरमनसाहेबांचे मित्र आणि संग्रहालयाचे देणगीदार श्री फुले, जे विलिंग्डन कॉलेजचे प्राध्यापक आहेत, आणखी, श्री शिंगारे, जे सांगलीतील नामवंत डॉक्टर आहेत, तेही इथले देणगीदार आहेत. श्री उपाध्ये आणि श्री मोरे, हेदेखील देणगीदार आहेत. उपाध्ये स्टेट बँकेचे मॅनेजर आहेत आणि मोरे राजकीय पक्षनेते आहेत. यांतील कोणी तसे वारंवार येत नाही, पण इतरांच्या तुलनेत या लोकांनी चेअरमन साहेबांची केबिन सर्वात जास्त पाहिली आहे. "


" मला या सर्वांचा कॉन्टॅक्ट आणि पत्ता हवा आहे. " अल्फा म्हणाला.


" देतो ना साहेब. या. "


केबिनमधील रजिस्टरमधून अल्फाने सर्वांची माहिती लिहून घेतली. मग आम्ही चौघे श्री सावंत जेथे बसले होते, तेथे आलो.


" काही विशेष मिळाले का? " सावंतांनी विचारले. वाघमारेंनी नकारार्थी मान डोलावली.


" सद्यस्थितीत तरी गुन्हेगार कोण आहे, हे निश्चितपणे सांगणे शक्य नाही. कारण त्याने खुपच कमी पुरावे सोडले आहेत. चेअरमनांच्या केबिनमध्ये आम्हाला गुन्हेगाराची थोडी विसंगत वागणूक आढळलीय खरी, म्हणजे तो टेबलाच्या बाजूला एकाच ठिकाणी बसला असावा किंवा उभा असावा, बऱ्याच वेळासाठी. पण त्यावरून काही तर्कसंगती लागत नाहीये. केस अवघड आहे. "


" मग आता तुम्ही काय करणार आहात श्री सावंत? काही तासांतच सूर्योदय होईल आणि रत्नजडित खंजिर चोरीला गेल्याचे जगजाहीर होईल. " अल्फा म्हणाला. सावंतांनी नैराश्याने डोक्याला हात लावला.


" एक मिनीट सावंत.. " अल्फा म्हणाला, " तुमच्याकडे त्या खंजिराची एखादी प्रतिकृती वगैरे आहे काय? म्हणजे, जवळपास त्याच्यासारखीच दिसणारी?? "


सावंतांनी मिनिटभर विचार केला आणि एकदम ते खाडकन् उभे राहिले.


" आहे!! माझ्याकडे आहे!! " ते उत्साहित होऊन म्हणाले, " पेशव्यांच्या काळात, म्हणजे जेव्हा हा खंजिर वापरात होता तेव्हा, एका कारागिराने हलक्या धातूचा वापर करून या खंजिराची एक हुबेहुब प्रतिकृती बनविली होती आणि ती महाराजांना भेट दिली होती. रत्नांसाठी त्याने काचेचा वापर केला होता. राजेसुद्धा क्षणभर संदिग्ध झाले, की आपल्याकडचाच खंजिर हा आपल्यालाच भेट देतोय की काय. राजांनी खुश होऊन त्याला खुप मोठा इनाम दिला होता, असे म्हणतात. सुदैवाने तो खंजिर मी माझ्याच घरी व्यवस्थित जपून ठेवला आहे. "


" ही तर खुपच चांगली गोष्ट आहे श्री सावंत. " वाघमारे म्हणाले, " तुम्ही तो खंजिर घेऊन या घरातून. आत्ताच्या आत्ता. "


पण क्षणातच सावंतांचा सगळा उत्साह मावळला.


" काय झालं? " वाघमारेंनी विचारले.


" हा नकली खंजिर फार दिवस काम चालवू शकणार नाही, वाघमारेसाहेब. " सावंत म्हणाले, "  महिन्यातून एकदा या संग्रहालयातील सर्व वस्तूंची तपासणी असते. सगळ्या वस्तू व्यवस्थित, स्वच्छ आहेत का, दुरुस्तीची कुठे गरज आहे का, याची तपासणी केली जाते; आणि या महिन्याची तपासणी येत्या रविवारी आहे, आजपासून बरोबर चार दिवसांनी!! "


" अरे देवा! " वाघमारे निराश होऊन म्हणाले. सगळेचजण पुन्हा चिंतेत पडले. अल्फाने थोडा विचार केला आणि तो म्हणाला,


" आम्हाला चालेल. "


" चालेल?? " सावंतांनी विस्मयाने विचारले.


" रविवारपर्यंत गुन्हेगार शोधण्याची जबाबदारी मी उचलतो. तुम्ही तोपर्यंत तो प्रतिकृती असलेला खंजिर इथे आणून ठेवा. " अल्फा म्हणाला.


" तू काय बोलतोयस याची कल्पना आहे ना तुला? चार दिवसांत गुन्हेगार शोधणे, तेही पोलिसांच्या मदतीशिवाय.." वाघमारेंनी साशंकतेने पाहत विचारले.


"होय. मला पूर्ण कल्पना आहे. रविवारपर्यंत खरा रत्नजडित खंजिर त्याच्या नेहमीच्या जागी स्थापित झालेला असेल. " अल्फा म्हणाला.


" ठिक आहे तर, श्री सावंत. आम्ही हे मिशन पूर्ण करण्याची जबाबदारी उचलतो. रविवारपर्यंत आम्ही तुम्हाला तुमचा रत्नजडित खंजिर पुन्हा मिळवून देण्याचे वचन देतो. "


" धन्यवाद, धन्यवाद वाघमारे साहेब.. " सावंत म्हणाले, " पण तुम्ही हे करणार कसे?"


"छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. कारण बारीक सारीक गोष्टीच खूप काही सांगून जातात. " अल्फा म्हणाला, " असो. ती आमची जबाबदारी समजा. तुम्ही फक्त तो नकली खंजिर पटकन आणा. तोपर्यंत आम्ही या मृतदेहाचे काय करायचे ते पहातो."


" होय हो.. तुम्ही निघा लगेच. आणि सावंत.. " थोडे थांबून वाघमारे म्हणाले, " तुम्ही फार काळजी करू नका. सर्व काही ठीक होईल. "


सावंतांच्या डोळ्यांत थोडे का होईना, पण समाधान तरळले. ते लगेचच म्युझियमच्या बाहेर पडले.


" हे बघ अल्फा.. " सावंत गेल्यानंतर वाघमारे म्हणाले, " तुला असं नाही वाटत का, की तू भलताच आत्मविश्वास दाखवला आहेस? हे खुपच अवघड काम आहे आणि ते झालं नाही, तर माझंच नाक कापलं जाणार आहे. आपल्याला रत्नजडित खंजिरासाठी पुढचे चार दिवस जंग जंग पछाडले पाहिजे. या खंजिरासारखा मौल्यवान ऐतिहासिक वारसा गहाळ होणे, ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. या सगळ्या नाट्यात आपली भूमिका खूप महत्वाची आहे, हे लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे कृती कर. मला एरवी तुला बरोबर घेऊन काम करणे मुळीच आवडले नसते, पण आता परिस्थितीच अशी आहे, की आपल्याला एकत्र काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. तू तुझ्या पद्धतीने शोध घे. मी माझ्या पद्धतीने घेतो. काही सुगावा लागला, तर आपण एकमेकांना सांगत जाऊया. "


" नक्की सर. मी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याप्रमाणेच कृती करेन. "अल्फाने आश्वासन दिले.


" आता फक्त एकच काम बाकी आहे या म्युझियममध्ये. " वाघमारे म्हणाले, " चोरी झाकण्यासाठी आपल्याला आता या रखवालदाराच्या मृत्यूचा खोटा देखावा उभा करावा लागणार आहे... "