Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण 7

बस जेव्हा समडोळी गावात येऊन थांबली, तेव्हा अंधार पडला होता. सर्वत्र दिवे लागलेले होते. मी अल्फाच्या मागोमाग चालू लागलो. दहा मिनिटे चालल्यानंतर एका छोटेखानी वर्कशॉपसमोर येऊन आम्ही थांबलो. त्या वर्कशॉपवर बोर्ड होता-

'श्रीराम रिपेअर्स '
प्रो. प्रा. अनिल पाटील

म्हणजे हेच अनिल पाटलाचे गॅरेज होते. अल्फा आणि मी आत शिरलो. आतमध्ये एक थोडा बुटका, पण अंगाने मजबूत, भरघोस मिशा असलेला, तपकिरी डोळ्यांचा असा एक माणूस सोडून कोणीच नव्हते. त्याचा पोषाख आणि हात अॉईलच्या काळ्या रंगाने माखलेले होते आणि तो एका गाडीची रिपेअरी करीत होता. अल्फा आणि मी त्याच्या नजरेस पडताच आपले काम थांबवून तो आमच्याकडे पाहू लागला.

"शुभसंध्या,  श्री. पाटील. " अल्फा म्हणाला.

" आपण?" अनिलने गोंधळून विचारले.

"मी अल्फा. मी एक गुप्तहेर आहे. पोलिसांच्या मदतीसाठी मी स्वतंत्रपणे काम करतो. हा माझा सहकारी प्रभव. "

" बरं, मग? " त्याने काहीशा रागीटपणे विचारले.


" आठ तारखेला सांगलीच्या संग्रहालयात घडलेल्या गुन्ह्याबद्दल आम्हाला तुमच्याशी काही बोलायचे आहे. " अल्फा म्हणाला.


" आणखी काय बोलायचे शिल्लक आहे? पोलीसांना तर मी माझ्या भावाची सगळी माहिती दिलेली आहे! " अनिल थोडासा बावरलेला दिसला.


" पहिली गोष्ट म्हणजे, पोलिसांचे आणि आमचे काम स्वतंत्र आहे. त्यांच्या चौकशीशी आमचा काहीएक संबंध नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आम्हाला जी माहिती अपेक्षित आहे, ती अजून तुम्ही दिलेलीच नाहीये. तेव्हा तुम्ही तुमच्या हातातले काम थोडा वेळ बाजूला ठेवून आम्हाला मदत केली, तर फार बरं होईल. " मोघम भाषेत अल्फा म्हणाला. थोडे वैतागूनच अनिलने हात धुतले आणि बाजुच्या टेबलामागे असलेल्या खुर्चीवर जाऊन तो बसला.


" बसा. " तो म्हणाला. अल्फा आणि मी समोरच्या दोन खुर्च्यांवर बसलो.


" गावात तुमची होणारी वानवा टाळायची असेल, तर प्रथम गॅरेजचे दार लावून घ्या. " अल्फा म्हणाला.


" कसली वानवा? काय म्हणायचेय तुम्हाला?? "


" मी तुम्हाला व्यवस्थित स्पष्टीकरण देतो. पहिला सांगतोय तसे करा. "


थोड्या घुश्श्यातच अनिल उठला आणि त्याने गॅरेजचे दार लावून घेतले.


" आम्हाला तुमच्याशी 9 तारखेला पेपरात आलेल्या बातमीसंबंधी प्रथम चर्चा करायची आहे. " अल्फा म्हणाला.


" कुठली बातमी? "


अल्फाने पेपर त्याच्या हातात दिला. अनिलने बातमी वाचली-


'सांगलीच्या संग्रहालयात चोरीचा प्रयत्न '


" मी ही बातमी वाचली आहे. " तो म्हणाला.


" मग तुम्हाला हे ठाऊक असेलच, की त्या बातमीमध्ये चोरीचा प्रयत्न असफल झाल्याचे आणि चोरांनी तुमचा सावत्र भाऊ महादबाचा खुन केल्याचे छापले होते.. "


" हो, ठाऊक आहे. " अनिल म्हणाला.


" तुम्हाला हेही ठाऊक असायलाच हवं, की ही बातमी खोटी होती आणि आणि आदल्या रात्री संग्रहालयात काही वेगळ्याच घटना घडल्या होत्या.. " अल्फा आपली नजर अनिलवर रोखत म्हणाला. क्षणात अनिलचा चेहरा भीतीने भारून गेला.


" हे... हे.. मला ठाऊक असण्याचं.. कारण.. क्... काय... मला.. मला नाही ठाऊक.. "


" तुम्हाला ठाऊक असायलाच हवं!! ही गोष्ट ठाऊक असणारी हातच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसं आहेत आणि त्यांपैकीच तुम्ही एक आहात, श्री अनिल पाटील!! आणि तुम्हाला ही गोष्ट माहित असण्याचे कारण म्हणजे, गुन्हा घडला तेव्हा तुम्ही खुद्द तेथे उपस्थित होता..!! "


आता मात्र अनिलच्या चेहऱ्यावरील भीतीचे भाव रागामध्ये परिवर्तीत झाले.


" पुरे झाला हा मूर्खपणा!! आत्ताच्या आत्ता माझ्या गॅरेजमधून बाहेर व्हा, नाहीतर तुमचेही काम फत्ते करून टाकेन! " तो चवताळून ओरडला.


" मी पोलीसांना कळविले आहे, श्री पाटील. " अल्फावर त्याच्या चिडण्याचा काडीमात्रही परिणाम झाला नाही,   "ते काही वेळातच येथे पोहोचतील. तुमच्या भावाचा खुन आधीच तुमच्या खात्यावर आहे. आम्हाला मारून त्यात आणखी दोघांची भर घालायची, की आम्हाला मदत करून शांतपणे यातून मार्ग काढायचा, हे आता तुमच्या हातात आहे."


पोलिसांचे नाव काढताच अनिल गर्भगळीत झाला.


"प्.. पण... कशावरून... कशावरून मी खुन केलाय... क्.. काय पुरावा आहे... तुमच्याकडे?? "


" चेअरमनच्या टेबलाच्या बाजूला तुमच्या हातांच्या अॉईलचे काळपट डाग लागलेले आहेत. खुन झाल्याच्या रात्री तुम्ही सांगलीतच आला होता, याचेही पुरावे आमच्याकडे आहेत. या साऱ्या गोष्टी तुमच्या विरोधात असताना तुम्ही तुमचा बचाव करू शकत नाही. तेव्हा लवकर सत्य सांगून टाका. कदाचित पोलीसांपासून आम्ही तुमचा बचाव करू शकू.. "


हे ऐकल्यानंतर मात्र अनिलचा धीर संपला. त्याने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. मी आणि अल्फा तो काय करेल, याचा विचार करीत त्याच्याकडे पाहू लागलो. शेवटी अनिलने मान्य केले.


" होय, मीच मारलेय महादबाला!! " दुखावलेल्या स्वरात अनिल म्हणाला, " मंगळवारी रात्री. माझ्या डोक्यामध्ये संतापाने इतके थैमान घातले होते, की.. संपवलं त्याला मी... याच हातांनी..!! "


" पण फक्त जमिनीच्या साध्याशा वाटणीवरून तुम्ही इतकी खालची पातळी गाठलीत?? तुम्ही कोर्टातही जाऊ शकला असता. " अल्फा कठोरपणे म्हणाला.


" या प्रकरणात जमिनीचा प्रश्न कुठेच नव्हता. " अनिल म्हणाला, " महादबाचे म्हणणे होते, की मी मोठा भाऊ असल्यामुळे सगळी जमीन माझ्याच वाट्याला यायला हवी. त्याच्या या वक्तव्याची मला मनस्वी चीड आली होती; आणि ते स्वाभाविकच होते. पण या कारणासाठी मी त्याचा खुन नाही केला. आमच्यात बरेच वाद झाले. पण इतक्यावरून मी त्याचा खुन करणे शक्यच नव्हते. पण जेव्हा एखादा माझ्या बायकोबद्दल दुष्ट विचार करीत असेल, तर माझा संतापाने तिळपापड का होऊ नये? "


" काय?? " आम्हाला धक्काच बसला.


" होय. " अनिल म्हणाला, " मी काही फार विस्ताराने सांगत नाही, कारण ती गोष्ट माझ्याच्याने बोलवतही नाही. महादबा माझ्या पत्नीबद्दल असे उलटसुलट विचार करीत असेल, असे वाटलेही नव्हते. माझ्या पत्नीने मला दोन - तीनदा बोलूनही दाखविले होते. पण मी मोठा भाऊ म्हणून मनावर दगड ठेवून ते दडपण्याचा प्रयत्न केला होता. माझी पत्नी महादबाच्या पत्नीपेक्षा तरूण, सुंदर आणि निश्चितच जास्त शिकली - सवरली आहे. त्यामुळे त्याच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार भरला होता. गेल्या आठवडय़ात मात्र त्याने कहरच केला. त्याने माझ्या पत्नीची वाट अडवली आणि तिला नाही नाही ते बोलला. तेव्हा मात्र माझी सहनशक्ती संपली. एकवेळ त्याने सगळी जमीन आपल्या नावावर करून घेतली असती, तरी मी मान्य केले असते. पण हे मी खपवून घेणार नव्हतो. मग मंगळवारी रात्री मी संधी साधली आणि संग्रहालयात जाऊन त्याचा खेळ संपविला.. मी ज्या परिस्थितीत हे कृत्य केले, त्याला अनुसरून तुम्हीच सांगा, मी काय चुकीचे केले? "


अल्फा आणि मी काही वेळ शांत बसलो. अनिलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.


" तुमच्या जागी उभे राहून विचार केला, तर तुमची कृती अतिशय योग्य आहे, श्री पाटील. अशा परिस्थितीत एखाद्या निष्ठावान पतीने जे केले असते, तेच तुम्ही केलेय. पण कायद्याच्या दृष्टीने हा एक गुन्हाच आहे. दुष्ट लोकांना शिक्षा देण्याचे काम पोलिसांचे आहे, तुमचे नाही. त्यामुळे तुम्हीही एक गुन्हेगारच ठरता. तुम्ही असे करायला नको होते. " अल्फा म्हणाला.


" मला जाणवतंय ते आता. " अनिल मुसमुसत म्हणाला, " पण संतापाने तेव्हा माझ्या अंगाची लाही लाही झाली होती. त्यामुळे माझा माझ्या मनावरचा ताबा सुटला आणि.. आणि मी.. त्याला मारून टाकलं..!! खरंच चूक झाली माझी... "


" आता रडू नका. जे झालं ते झालं. " अल्फा म्हणाला, " यात तुमच्या दुर्दैवाने की काय,  पण तुम्ही ज्या ठिकाणी आणि ज्या वेळी हे कृत्य केलेले आहे, ते ठिकाण आणि ती वेळ इतकी अजब होती, की त्यामुळे खुपच मोठी गुंतागुंत होऊन बसली आहे. रत्नजडित खंजिर तुमच्या उपस्थितीतच चोरला गेला आहे आणि तुम्ही केलेल्या खुनामुळे चोराचे चांगलेच फावले आहे. त्याला सराईतपणे खंजिरावर हात मारणे शक्य झाले. आता आम्हाला तुमच्याकडून खुप अपेक्षा आहेत. सर्वप्रथम आम्हाला सांगा महाशय, तुम्ही त्या मागहून आलेल्या व्यक्तीला पाहिले होते का? "


" नाही. " अनिल म्हणाला, " मी त्या व्यक्तीला पाहिले नाही. माझे मन इतके सैरभैर झाले होते, की मला स्वतःचा बचाव करण्याशिवाय काहीच सुचले नाही. "


" च्.. च्.. च्.. " अल्फा हळहळला, " मला तुमच्या याच उत्तराची भीती वाटत होती. हरकत नाही. मला आता तुम्ही संग्रहालयात शिरल्यापासून ते तेथून बाहेर पडेपर्यंत काय काय घडले, ते इत्यंभूत सांगा. अगदी क्षुल्लक वाटणारी घटनाही सोडू नका. "


" ठिक आहे. " अनिल म्हणाला, " मंगळवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास मी संग्रहालयात गेलो होतो. तसे म्हटले तर संध्याकाळपासून मी सांगलीतच होतो. हे कृत्य करण्यासाठी माझे मन तयार करण्यात बराच वेळ गेला. सव्वादहा वाजता मी संग्रहालयाच्या मागच्या गेटपाशी आलो. महादबा तेथे नव्हता. मग मी आत जाण्याचे ठरविले. कोणी पहात नाही, हे पाहून मी खिडकीतून उडी मारून आत शिरलो आणि महादबा आत येण्याची वाट पाहू लागलो. सुदैवाने काही वेळात तो आत आला. मी संधी साधून त्याच्या छातीत सुरा खुपसला आणि त्या दुष्टाला संपविला. त्यानंतर पुढची दोन मिनिटे मी स्वतःला शांत करण्यासाठी तसाच उभा होतो. मग तो रक्ताळलेला चाकू मी काढून घेतला. मी जवळपास निघण्याच्या तयारीतच होतो, तितक्यात मला वरून कोणाचातरी आवाज आला. मी जिथून आत शिरलो, त्याच बाजूने कोणीतरी येत होते. माझी तर बोबडीच वळली. हॉलमध्ये लपण्यासारखी कोणतीच जागा नव्हती. मला चेअरमनची केबीन खुली दिसली. मी ताबडतोब आतमध्ये शिरलो आणि टेबलामागे लपलो. ती व्यक्ती हॉलमध्ये काही वेळ थांबली आणि थेट मी जेथे होतो त्याच केबिनमध्ये शिरली. तेव्हा तर मी अपादमस्तक थरथरू लागलो. मला वाटलं, आता सगळा खेळ संपला! पण त्या व्यक्तीचे केबिनमध्ये इतरत्र लक्ष नव्हते बहुतेक. कारण मला चेअरमनचे कपाट उघडण्याचा आवाज आला आणि मिनीटभरातच पुन्हा केबिनचे दार बंद झाल्याचा. काय चाललेय मला काहीच कळत नव्हते. ती व्यक्ती रखवालदार आहे, की आणखी कोण याचा काहीच थांगपत्ता लागेना. पण मी ते जाणून घेण्याचे धाडसही केले नाही. माझे अस्तित्व त्याला जाणवणार नाही, अशा बेताने मी आहे त्याच जागी चुपचाप बसून राहिलो. बऱ्याच वेळाने मला बाहेरच्या दालनातून काही हालचाल ऐकू येईनाशी झाली. मग धीर एकवटून मी दार उघडले. बाहेर कोणीच नव्हते. थोड्या निरीक्षणातच माझ्या लक्षात आले, की महादबा जेथे पडला होता, त्याच्या बाजूच्याच पेटीतला तो सुप्रसिद्ध रत्नजडित खंजिर नाहीसा झाला होता. पेटी उघडीच होती आणि किल्ली तशीच लॉकमध्ये अडकली होती. माझ्यावरती किती मोठे संकट येऊ घातले होते, याची जाणीव मला झाली. त्या क्षणी अगदी कोणीही मला तेथे पाहिले असते, तर खंजिर चोरल्याचा आळ माझ्यावरच आला असता. त्यामुळे तडक मी संग्रहालयाच्या बाहेर पडलो आणि तेथून शक्य तितक्या दूरवर गेलो. "


" म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला पाहिले नाही?" मी पुन्हा विचारले.


"नाही. " अनिल म्हणाला, " पण.. एक मिनीट.. मी त्या व्यक्तीची सावली पाहिलेली आहे!! "


" काय सांगता?? " अल्फा एकदम उत्साहाने उडी मारून म्हणाला.


" होय. मी केबिनमध्ये ज्या टोकाला लपून बसलो होतो, त्याच्या विरुद्ध दिशेला, कपाटाच्या लगतच एक खिडकी  होती. तेथून येण्यऱ्या चंद्रप्रकाशात मी त्या व्यक्तीची सावली पहिली होती. काही क्षणांसाठी. " अनिल म्हणाला.


" मग तुम्ही त्या व्यक्तीचे, म्हणजेच, मला म्हणायचंय की तिच्या सावलीचे ढोबळ वर्णन करू शकाल का? "


" अं.. तसे मी अगदी लक्षपूर्वक पाहिले नव्हते ; कारण माझ्या मनात त्यावेळी भीतीशिवाय दुसरे काहीच नव्हते. पण ती व्यक्ती बऱ्यापैकी सडपातळ आणि उंच होती. पायांत बूट होते, हेदेखील मी खात्रीशीरपणे सांगू शकतो. केस विस्कटलेले होते, कपडे बऱ्यापैकी ढगळे होते. यापेक्षा जास्त काही कळणे शक्यच नव्हते.. "


" खुपच छान... " अल्फा ते सगळे डोक्यात साठवून घेत म्हणाला, " त्या व्यक्तीने केबिनमध्ये शिरल्या शिरल्या थेट कपाटच उघडले? "


" होय. त्याने दुसरीकडे कुठेच लक्ष दिले नाही. " अनिल म्हणाला, " आणखी एक गोष्ट, जी मला ती व्यक्ती केबिनमध्ये प्रवेशल्यानंतर जाणवली. "


" कोणती?? " अल्फा आणि मी दोघांनीही एकदमच विचारले.


" त्यावेळी मला हलकासा आयोडीनचा वास आला - जसा दवाखान्यात गेल्यावर येतो तसा... "


" वा! वा! श्री पाटील, ही फारच महत्त्वाची माहिती दिलीत तुम्ही. आणखी काही आठवतंय का? " अल्फा खुष होऊन म्हणाला.


" नाही.. आणखी त्या व्यक्तीबद्दल मला काहीच कळू शकले नाही. " अनिल म्हणाला.


" हं.. हरकत नाही. एवढ्या माहितीवर गुन्हेगाराला शोधण्यास थोेडे कष्ट पडतील ; पण गुन्हेगार नक्की  सापडेल." अल्फा म्हणाला.


"मला तुम्हाला दोनच प्रश्न विचारायचे आहेत, श्री अल्फा, ज्याबाबत मी अजून संभ्रमात आहे. " अनिल पाटील म्हणाला, " पहिला म्हणजे, रत्नजडित खंजिर चोरीला गेलेला मी स्वतः पाहिला होता. तरीही दुसर्‍या दिवशीच्या पेपरात छापून आले, की रत्नजडित खंजिर सुरक्षित आहे. हा काय प्रकार आहे? त्या बातमीने मला बुचकळ्यातच टाकले. माझी पाहण्यात चूक झाली की काय, असे मला वाटू लागले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, खंजिराचा चोर मी नसून दुसराच कोणीतरी आहे, हे तुम्ही कसे ताडले? त्या ठिकाणची परिस्थिती अशी होती, की कोणालाही असे वाटावे, चोराने रखवालदाराचा खुन करून खंजिर हस्तगत केला आहे..!! "


अल्फाने स्मित केले.


" तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर - रत्नजडित खंजिर हा एक महान ऐतिहासिक वारसा आहे. त्याची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे. तो चोरीला गेल्याची बातमी फुटली असती, तर मोठी खळबळ माजली असती. खूप मोठे राजकारण होण्याची शक्यता होती. शिवाय संग्रहालयाच्या समितीला निलंबित केले गेले असते. मग आम्ही यातून हा मार्ग काढला. चोरी करण्याचा फक्त प्रयत्न झाला आहे, असा देखावा केला. रत्नजडित खंजिरासारखा दिसणारा एक खंजिर तेथे आणून ठेवला आणि सत्यावर पडदा टाकला. त्यामुळे खरी घटना कोणालाच ठाऊक नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, चेअरमनच्या टेबलाच्या बाजूचा दबलेला गालिचा. त्यानेच आम्हाला तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले. कारण खंजिराच्या चोराचे त्या ठिकाणी काहीच काम नव्हते. त्याला फक्त कपाटातून चावी घ्यायची होती. मग त्या दबलेल्या गालिचाच्या ठिकाणी दुसरी एखादी व्यक्ती का असू नये, असा मी विचार केला. शिवाय तुमच्या हातांचे काळे डाग महादबाच्या शर्टावर असणे आणि खंजिराच्या पेटीवर, चाव्यांच्या जुडग्यावर किंवा कपाटावर नसणे, हेदेखील सूचक होते. मग थोड्या खोलवर विचाराअंती हाच निष्कर्ष निघाला, की काळे डागवाला, महादबा पाटलाचा खुनी ही एक व्यक्ती आहे आणि रत्नजडित खंजिराचा चोर ही दुसरीच कोणीतरी व्यक्ती आहे!! हे झाले तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे स्पष्टीकरण..!!! "


" तुमच्या विचारशक्तीचे आणि निरीक्षणक्षमतेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, श्री अल्फा.. " भारावून जाऊन अनिल पाटील म्हणाला. पण लगेचच त्याचा चेहरा पडला, " पण आता सगळं संपलंय.. पोलीस कधीही इथे येऊन मला बेड्या ठोकतील... माझी पत्नी, माझ्या मुलांचे काय होईल?? माझ्या अविचारीपणाचा फटका त्यांना बसेल, याचा विचारच मी केला नव्हता... "


त्याने नैराश्याने डोक्याला हात लावला. ते पाहून अल्फा हसायला लागला. अनिल आणि मी अल्फाला मधूनच काय झाले, म्हणून विचीत्रपणे त्याच्याकडे पाहू लागलो.


" माझे बोलणे तुम्ही इतके गंभीरपणे घ्याल असे वाटले नव्हते. " अल्फा म्हणाला, " जर रत्नजडित खंजिर चोरीला गेलाय, हे पोलीसांना ठाऊकच नसेल, त्याच्या शोधात पोलिसांची मदत घेणे निरर्थकच नाही का?? तुम्ही आम्हाला अपाय करू नये, यासाठीच फक्त मी 'पोलीस' हा शब्द वापरला. असो. तुम्हाला कोणाहीपासून काहीही धोका नाहीये. फक्त इथून पुढे इतकीच काळजी घ्या, की कुठलेही प्रकरण कोणाच्या जीवावर बेतण्यापर्यंत जाऊ नये. कायद्याच्या दृष्टीने तुम्ही गुन्हेगारच आहात. पण नियतीनेच तुम्हाला आणखी एक संधी दिली आहे. तेव्हा व्यवस्थित रहा. तुम्ही दिलेल्या अनमोल माहितीबद्दल धन्यवाद!! चल प्रभव. आता राहिलेले काम फत्ते करण्याच्या मागे लागूया. "


असे म्हणून अल्फा तेथून उठलाच. अनिल पाटलाने भारावून म्हटलेले 'धन्यवाद' अल्फाला ऐकूही आले नाहीत. त्याला आता डोळ्यांसमोर केवळ उंच, सडपातळ आणि विस्कटलेल्या केसांची व्यक्तीच दिसत होती..!!!