Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण 4

दुसऱ्या दिवशीच्या सांगली वार्ताच्या पहिल्या पानावर ठळक बातमी छापून आली होती :

'सांगलीच्या संग्रहालयात चोरीचा प्रयत्न '

रखवालदाराच्या प्रसंगावधानामुळे मौल्यवान ऐवज बचावला..!!

सांगली, ता. 9: येथील राजवाड्यामागील मध्यवर्ती संग्रहालयात काल रात्री झालेल्या नाट्यामुळे सर्वांचीच झोप उडाली होती ; पण संग्रहालयाच्या रखवालदाराने दाखविलेल्या हुशारी आणि धैर्यामुळे संग्रहालयाचा अतिशय मौल्यवान ऐवज बचावला. चोरी करणाऱ्या व्यक्तीचा संग्रहालयातील दोनशे वर्षे जुना आणि सर्वात किंमती ऐतिहासिक वस्तू असलेला रत्नजडित खंजिर चोरण्याचा हेतू होता, असे सूत्रांकडून समजते. पण हा हेतू सफल झाला नाही.

संग्रहालयातील पहारेकऱ्याने सांगितलेल्या माहितीनुसार, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोघे पहारेकरी संग्रहालयावर पहारा देत होते. अचानक संग्रहालयालयाच्या आतमध्ये कोणीतरी उडी मारल्याचा आवाज आला. दोघांपैकी एकजण आतमध्ये पहाणी करण्यासाठी गेला. मिनीटभरातच बाहेर उभारलेल्या पहारेकऱ्याला एक अस्फुट अशी किंकाळी ऐकू आली. तो धावतच आत गेला. आतमध्ये पहिला पहारेकरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. आणखी दोन बुरखा घातलेल्या व्यक्ती तेथे होत्या, ज्या खंजीराभोवतीची फायबरची पेटी फोडण्याचा प्रयत्न करीत होत्या. पहारेकऱ्याने तत्काळ त्यांच्यावर बंदूक रोखली आणि पोलीसांना फोन लावला. त्यामुळे घाबरून त्या व्यक्ती मागच्या गेटवरून उडी मारून पळून गेल्या. जरी त्या कोण होत्या हे समजू शकले नसले, तरीही त्यांचा बेत मात्र फसला. रत्नजडित खंजिर आहे त्या जागी सुरक्षित आहे. महापौरांनी संग्रहालयावरचा पहारा वाढविण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

"मिडियावालेही बिनडोक आणि त्यांच्याबरोबर ही बातमी वाचणारे लोकही बिनडोक! " मी ती बातमी वाचून संपवितो न संपवितो तोच अल्फा मोठ्ठ्याने हसून म्हणाला. आम्ही रात्री उशिरा रूमवर आलो होतो आणि त्यामुळे सकाळचे उठणेही उशीराच झाले होते. सकाळी दहाच्या सुमारास आमचे पेपर वाचन सुरू होते, " त्या मागील गेटपाशी असलेल्या पाऊलखुणा माझ्या आणि वाघमारे सरांच्या पावलांशी जुळवून पाहिल्या, तर त्यांत जराही फरक आढळणार नाही. पण थँक गॉड! सर्वांना आम्ही केलेला चोरीच्या प्रयत्नाचा देखावा पटला!"

"हे असंभव आहे अल्फा! " मी पेपर बाजूला फेकत म्हणालो, " तू मूर्खासारखी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहेस. रविवारपर्यंत खंजिर शोधून संग्रहालयात परत ठेवणे.. आज कोणवार आहे याची कल्पना आहे का तुला? बुधवार!! आणि आपल्या हातात तरी काहीच नाहीये. आता चार दिवसांत तू गुन्हेगाराला जगाच्या कुठल्या टोकाला जाऊन शोधणार आहेस? आणि कोणत्या आधारावर?? "


" जगाचे टोक कसे रे? पृथ्वी तर गोल आहे आणि गोलाला कधी टोक असते का? टोक शोधण्यासाठी एका ठिकाणाहून निघशील तर फिरून परत त्याच ठिकाणी परत येशील.. पण टोक मात्र सापडणार नाही. आता फर्डिनांड मॅगेलनच घे ना. पृथ्वीचे टोक शोधायला निघाला आणि गोल वळसा मारून पुन्हा आपल्याच देशात जाऊन पोहोचला! तेव्हा खऱ्या अर्थाने सिद्ध झालेे, की पृथ्वी गोल आहे!! आणि तुला ठाऊक आहे का, हा मॅगेलन त्याची समुद्रसफर संपायच्या आतच मेला होता. मग त्याच्या सहकाऱ्यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली. पण नाव मात्र झाले मॅगेलनचे! बिचारे त्याचे सहकारी! त्यांना कोणी कुत्र्यानेही विचारले नसेल.. "


वायफळ बडबड आणि विषयावरून भरकटणे ही अल्फाची नेहमीची सवय. आता फर्डिनांड मॅगेलनचे सहकारी आणि संग्रहालयात झालेली चोरी यांचा कुठे तिळमात्र तरी संबंध होता का?


" आणि माय डिअर प्रभव, चार नाही, पाच दिवस आहेत. आपल्याकडे. रविवारच्या दिवशी तपासणीसाठी त्या खंजिराची पेटी उघडेपर्यंत वेळ आहे आपल्याकडे. स्वतःला कधीच कुठे कमी समजू नकोस मित्रा. तसे केल्यामुळे आपल्या आतील निद्रिस्त शक्ती निद्रिस्तच राहते. आव्हाने स्वीकारायची असतात. त्याशिवाय ही शक्ती जागृत होत नाही. "


" पण तू सुरूवात कोठून करणार? " मी विचारले.


" सोप्पं आहे! खंजिर मिळविण्यासाठी त्या पेटीच्या किल्ल्या कोठे ठेवलेल्या असतात, हे माहित असणं आवश्यक होतं. तसं असणारे फक्त काहीच लोक आहेत, ज्यांची नावे व पत्ते मी काल लिहून आणले आहेत. कपाटातल्या चोरकप्प्यातील किल्ल्या फक्त अशी व्यक्ती घेऊ शकते, जिची चेअरमनच्या केबिनमध्ये सारखी ये जा असेल आणि जिला केबिनची सखोल माहिती असेल. त्यांची प्रथम मी माहिती काढणार आहे आणि कोण गुन्हा करण्यास अनुकूल आहे, हे ताडून पाहणार आहे. " अल्फा म्हणाला.


" हं. लॉजिक तरी बरोबर आहे. " मी म्हणालो.


" पण तरीही, मला या केसची चिंता चांगलीच सतावतेय." अल्फा म्हणाला, "हे लॉजिक वापरून ही केस सुटेल, याबाबत मी साशंक आहे. मला तर वाटतेय, की ही केस दिसतेय तेवढी साधीसुधी मुळीच नाहीये. काहीतरी प्रचंड घोटाळा आहे यामध्ये."


"कसला घोटाळा?? "


" चेअरमनची केबिन!! " अल्फा म्हणाला, " तिथे काय घडलेलं असावं, हेच समजत नाहीये. पहिली संशयास्पद गोष्ट म्हणजे तो चाव्यांचा जुडगा. त्यामध्ये किमान दहा तरी चाव्या होत्या. त्यामधून खुनीला बरोबर खंजिराच्या पेटीची चावी सापडावी? आणि तीही पटकन? ती व्यक्ती काय इतक्या सरावाची होती? मला तर तो चोरकप्पा शोधणेही बरेच अवघड गेले असते. इथे तर या महाशयांनी कप्पा शोधला, जुडग्यातून चावी शोधली, खंजिर घेतला, पहारेकऱ्याचा खुन केला.. तेही अत्यल्प वेळात! निश्चितच पटण्यासारखे नाही. त्यामुळे खुनी हा केबिनमध्ये वावर असलेला आणि केबिनची चांगली खडानखडा माहिती असलेलाच कोणीतरी असणार, असा माझा कयास आहे.


दुसरी गोष्ट म्हणजे चेअरमनचे टेबल आणि त्याच्या पायलगतचा गालिचा. जर खुनीला चावीच हवी होती, तर ती घेऊन त्याने पटकन आपले काम उरकायला हवे होते. मग हा पठ्ठ्याने टेबलापाशी जाऊन बसकण कशाला मारली? तेही इतका वेळ, की त्याच्या वजनाने गालिचा दबला जावा.. या दोन्ही गोष्टी पूर्णपणे विसंगत आहेत एकमेकांशी. आणखी एक गोष्ट, जी मी तेथे पाहिली - हे बघ. "


अल्फाने आपला मोबाईल मला दाखविला.


" हे काय आहे? " मी विचारले.


" मोबाईल आहे! काय रे प्रभव! तुला नाही त्या वेळी थट्टा कशी सुचते? " अल्फा म्हणाला.


" अहो विद्वान, मी मोबाईलमधल्या फोटोबद्दल विचारतोय! "


" अच्छा. असे स्पष्ट नमूद कर ना मग! " अल्फा म्हणाला, " त्या टेबलावरचा काळा डाग. हा त्या दबलेल्या गालिचाच्या वरच्याच बाजूला होता. मी त्याचा वास घेऊन पाहिला. आपण गाड्यांना वगैरे Aa^इलींग करण्यासाठी वापरतो ना, त्या Aa^ईलचे डाग होते ते. वंगणाचे. "


" अच्छा, म्हणजे तू त्याचा वास पहात होतास काल? मी पाहिले होते तुला तेव्हा. " मी.


" हो. तेव्हाच मला तो डाग दिसला. तसेच डाग मृत पहारेकऱ्याच्या कपड्यांवर आहेत आणि संग्रहालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या या खिडकीवरपण आहेत- जिथून खुनी आत आला. पण गोंधळात टाकणारी गोष्ट आहे ना ही? वंगणाचे डाग इथे कोठून आले? खुनीने संग्रहालयाकडे निघताना नक्कीच गाडीचे काहीतरी काम केले होतं. त्याशिवाय त्याच्या अंगाला वंगणाचे डाग लागणार नाहीत. शिवाय टेबलामागे बसून तो काय शोधत होता, त्याला काय हवे होते, हाही कळीचा मुद्दा आहे. थोडक्यात काय, तर आपल्याला एक असा माणूस शोधायचाय, जो चेअरमनसाहेबांचा निकटवर्तीय आहे, ज्याची केबिनमध्ये सतत ये जा असते, जो काल रात्री दहाच्या सुमारास घरी नव्हता आणि ज्याच्या गाडीची ऐनवेळी काहीतरी तक्रार निर्माण झाली होती.. "


" आणि तेही रविवारच्या आत!! " मी पुन्हा सुरूवातीचाच सूर ओढला.


" शोधू रे.. आपल्याला तो नक्की सापडेल. " अल्फाने पेपरमधल्या बातमीवरून पुन्हा एकदा नजर फिरवली,      " इथेच! इथेच आहे ते कारण! आपण रात्री तयार केलेल्या देखाव्याचा कोणाला तिळमात्रही संशय आला नाही! माझ्यासारखा एखादा चाणाक्ष आणि बुद्धिमान माणूस (मी जरा खोकलोच!) जर पोलीस खात्यात असता, तर त्याने दोनच मिनीटांत ओळखले असते, की हे सगळे चित्र बनावट आहे म्हणून. गुन्ह्याच्या जागेची वरवर पहाणी करायची आणि रिपोर्ट लिहून घ्यायचा एवढेच काम आजकालचे पोलीस करतात. तरी बरं, ती पेटी फुटली नाही. मी त्यावर दोन घाव घातलेच होते.. "


मी हसलो.


" पण अल्फा, वाघमारे तुझ्यावर इतके खार खाऊन का होते रे? तुला पाहून काल त्यांना मुळीच आनंद झाला नव्हता. "


" अरे त्याचं काय आहे, ते सांगलीचे पोलीस अधीक्षक आहेत ना. त्यांच्या कामात मी फारच लुडबुड करतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण ती लुडबुड नसून मदत असते, हे वाघमारे सोडून कोणीही कबूल करेल. बऱ्याच प्रकरणांचा छडा मी लावलेला आहे. त्यामुळे आपल्या निम्मे वय असलेला हा पोरगा आपल्यापेक्षा वेगाने कशी काय प्रकरणे सोडवितो, या विचाराने त्यांचा तिळपापड होत असेल. त्या सोडविलेल्या प्रकरणांचे श्रेय मी कधीच घेत नाही हेही खरंच. पण वाघमारेंना मात्र मी मुळीच आवडत नाही. काल रात्रीच्या प्रसंगी मी तेथे असणे त्यांना नक्कीच अनपेक्षित असेल. पण काय करणार! एखादे कोडे मला खुणावत असेल, तर मीही स्वतःला थांबवू शकत नाही ना. "


" हं. असं आहे तर. " मी म्हणालो.


" चला. भरपूर बडबड आणि विचारमंथन झालेलं आहे. आता कामाला लागायला हवं. " अल्फा खुर्चीवरून उठला, " बाय द वे प्रभव, तुझ्या लिहीण्याचा स्पीड बराच चांगला आहे, असं आत्तापर्यंत मला दिसून आलंय. "


" हो का?" अचानकच अल्फा माझ्या लिहीण्याच्या स्पीडवर कसा आला, हेच मला समजेना.


"आणि आज मला खुपच पळापळ करावी लागणार आहे. तू पाहतोयसच ना! त्या सगळ्या लोकांची माहिती काढणे, पुरावे गोळा करणे आणि बरंच काही.. "


" बरं मग?? " अजुनही मला अल्फाला काय सांगायचे होते, हे कळाले नव्हते.


" आणि नेमकं आज आमच्या महान सरांनी भलामोठ्ठा होमवर्क देऊन ठेवलाय! अर्थात, मी त्यांना आठवडाभर टोलावलं होतं. पण आज मात्र तो मला लिहायलाच हवाय. नाहीतर ते माझी बँड वाजवतील."


आता मात्र माझ्या सर्व ध्यानात आले.


" नाऽऽही!! " मी जोरात म्हणालो, " मी काही तुझा होमवर्क बिमवर्क अज्जिबात करणार नाहीये हां!! "


" अरे यार प्लीज ना! मला आता रविवारपर्यंत हलता येणार नाही. रत्नजडित खंजिराचे कोडे मला सोडविलेच पाहिजे. आणि होमवर्क म्हणजे काहीएक डोके लावायचे काम नाहीये रे. फक्त एका वहीतून दुसर्‍या वहीत उतरवून काढायचे आहे. तेवढे कर ना." अल्फा विनवणी करीत म्हणाला. पण त्याचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही.


"मुळीच नाही! " मी ओरडलो. (अभ्यासाच्या बाबतीत मी कुठेही तडजोड करायला कधीच तयार व्हायचो नाही!) " तुझ्याकडे आठवडाभर होताच ना! मग तेव्हा करायचा होतास! अभ्यास हा आपल्यासाठीच असतो अल्फा. तो आपणच करायला हवा. तुझा हा आडमार्ग आणि अभ्यास या दोन्हीही गोष्टी तुला मॅनेज करता आल्याच पाहिजेत."


"बास! " अल्फाने हात टेकले, " हे ऐकण्यापेक्षा माझे चारएक मार्क्स गेलेले बरे!! तू फारच बोअर माणूस आहेस बाबा! असो. तो होमवर्क जाऊदे पाण्यात. आता झटपट हालचाली करण्याची वेळ आलेली आहे, खंजिरासाठी. मी निघतो आता. "


" बरं बरं. " मी तुटकपणे म्हणालो, " कधी येणार? "


" सांगता येत नाही. सायंकाळपर्यंत काही हातात येईल, अशी अपेक्षा आहे.. " असे म्हणत अल्फा रुमबाहेर पडला.


*


            संध्याकाळ झाली. साडेपाच वाजता मी आमच्या रुममध्ये परतलो, तेव्हा तिला कुलूपच होते. याचाच अर्थ, अल्फा अजुनही मोहिमेवरच होता. मी तोंड वगैरे धुवून फ्रेश झालो. अल्फाची कामात किती प्रगती झाली असेल, याचाच विचार मी करीत होतो. पण काही अंदाज येईना. मग मी थोडा वेळ फेसबुक उघडले. पण तेही बोअर वाटू लागले. वारंवार माझ्या डोळ्यांसमोर कालचेच दृश्य येत होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पहारेकरी.. माझ्या अंगावर पुन्हा शहारे आले. कोणाचा हात असेल यामागे? अल्फाची बुद्धी या क्षणी त्याच गोष्टीचा पाठलाग करीत होती.


अखेर सात वाजले आणि अल्फा रूमवर परतला- हात हलवित आणि चेहऱ्यावर या चिंतेचे सावट घेऊन. त्याने आपला मळकटलेला पेहराव बदलला आणि खुर्चीवर त्याने स्वतःला झोकून दिले.


"काही मिळाले?? "मी उत्सुकतेने विचारले.


" शून्य!! " खुर्चीच्या पाठीवर डोके ठेवून अल्फाने आपले पाय लांब केले आणि डोळे मिटून घेतले,            " वाळलेलं गवतसुद्धा हाती आलं नाही. "


मला हेच उत्तर अपेक्षित होते. कारण अल्फाचा पडलेला चेहराच बोलत होता.


" मग इतका वेळ होतास तरी कुठे? "


" फिरतच होतो की.. इकडून तिकडे.. काल बनविलेल्या लिस्टमधील सर्वांची माहिती काढण्यासाठी. " अल्फा उत्तरला, " एकही जण आपल्या तर्कसंगतीत बसत नाही. गुन्हा घडला, त्यावेळी सर्वजण घरीच होते. मी सर्वांच्या शेजाऱ्या - पाजाऱ्यांकडून, किंवा घराच्या रखवालदारांकडून ही माहिती मिळविली. फक्त डॉक्टर शिंगारेंचा याला अपवाद आहे. पण तेही रात्री दवाखान्यात होते, एक महत्त्वाचे अॉपरेशन करीत होते. मी नर्सेसना विचारून खात्री करून घेतली आहे. थोडक्यात, पुराव्यानिशी असं सिद्ध होतंय, की चेअरमनचे निकटवर्तीय असणारे कोणीही काल रात्री म्युझियमकडे फिरकलेसुद्धा नाही. "


" मग स्वतः श्री सावंत? किंवा तो पहारेकरी माळी? त्यानेच असा बनाव रचला नसेल ना? " मी विचारले.


" नाही. "अल्फा म्हणाला, " मी त्यांचीही चौकशी केली. सावंतदेखील गुन्हा घडला, त्या वेळी घरीच होते आणि माळीचा घटना घडल्यानंतर जेव्हा फोन आला, तेव्हाच ते घटनास्थळी आले. आणि माळीबद्दल विचारशील, तर त्यालाही मी खुपच खोदून खोदून विचारले. पण त्याच्या बोलण्यात कुठे फरक आढळला नाही. याचाच अर्थ तो खरे बोलत असला पाहिजे. आणि शिवाय मी त्याचे रेकॉर्ड्स चेक केले. वीस वर्षे तो इथे काम करतोय आणि तो अतिशय प्रामाणिक आहे, असे मला आढळून आले. "


" पण हे कसे शक्य आहे? चेअरमनची केबिन चांगल्या प्रकारे माहीत असणारे एवढेच जण आहेत ना? मग यांच्यातील एक तरी जण गुन्हेगार असायलाच हवा. " मी म्हणालो.


" तोच तर यक्षप्रश्न आहे! " अल्फा त्रासिकपणे म्हणाला, " यावरून केवळ इतकाच अर्थ निघतो, की आपला तपास चुकीच्या दिशेने चालू आहे. प्रत्येक गुन्ह्य़ाची पाळेमुळे खोदून काढताना एक गोष्ट फार महत्त्वाची असते- ती म्हणजे 'गृहीतक'!! आपण काहीतरी गृहीत धरून चालल्याशिवाय गुन्हेगाराला शोधू शकत नाही. हे गृहीतक आपण केलेल्या निरीक्षणांवरती आणि आपल्या कल्पनाशक्तीवरती अवलंबून असते. या दोहोंचा एकदा का बरोबर मेळ बसला, की गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यास वेळ लागत नाही आपल्या बाबतीत हेच गृहीतक कुठेतरी चुकतंय. मग त्याला कारणीभूत असणारी चूक आपल्या निरीक्षणात आहे, की आपल्या कल्पनेत आहे, कोणास ठाऊक? पण काहीतरी चुकतंय, हे नक्की! माझे निरीक्षण चुकीचे असू शकत नाही हेही नक्की. मग आपण विचार करण्यात कुठेतरी चुकतोय, असाच याचा अर्थ होतो. "


" पण नक्की कुठे? " मी विचारले.


" त्याचाच शोध मी आज रात्री बसल्या बसल्या घेणार आहे. " अल्फा म्हणाला, " आजचा संपूर्ण दिवस वाया गेला, याचंच दुःख आहे. "


" आज दिवसभर तू फक्त माहिती काढणे इतकेच करीत होतास, की आणखी काही? "


" तेवढेच नाही काही फक्त.. म्युझियमकडे गेलो होतो ना. मला थोडा संग्रहालयाच्या आवाराचा शोध घ्यायचा होता. गुन्हेगार गाडीने आला असणार, हे तर नक्की. मग त्याच्या बंद पडणाऱ्या गाडीचे निशाण कुठे मिळतायत का, ते पाहिले. पण सकाळ होईपर्यंत तेथे इतक्या गाड्या येऊन गेल्या होत्या, की मला त्यांमधून काहीही हाती लागले नाही. असो. आता तपासाची नवी दिशा शोधायला हवी. आता आवरून थोड्या वेळात आपण जेवायला बाहेर पडूया. थोडा वेळ हा विषय माझ्या डोक्यातून बाहेर पडू दे. "


असे म्हणून अल्फाने कानाला हेडफोन लावले आणि डोळे मिटून तो शांतपणे पडून राहिला.


" अरे अल्फा, तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. " मी एकदम आठवून म्हणालो. अल्फाने हेडफोन काढून माझ्याकडे पाहिले.


" मी तुझा होमवर्क पूर्ण केला आहे!"


अल्फाने स्मित केले आणि पुन्हा तो संगीत ऐकण्यात हरवून गेला.