Get it on Google Play
Download on the App Store

अभिमन्युवध - भाग ३

तिसर्‍या दिवशी पुन्हा त्रिगर्तानीच अर्जुनाला आव्हान दिले व अर्जुन पुन्हा एकदा त्यांच्याशी लढायला गेला असे महाभारत म्हणते. दुसर्‍या दिवशीच्या त्रिगर्त-अर्जुन युद्धाचे दीर्घ आणि रसभरित वर्णन करणार्‍या व्यासानी या दिवशीचे अर्जुन-त्रिगर्त युद्ध कसे झाले, कोणी काय पराक्रम केला, अर्जुनाने कोणाकोणाला मारले याबद्दल अवाक्षरहि लिहिलेले नाही. सर्व दिवसाच्या युद्धाचे वर्णन फक्त दोन श्लोकांत ’उरकले’ आहे. हे अतिशय संशयास्पद आहे! शिवाय यादिवशी युधिष्ठिराच्या रक्षणाची कोणतीहि व्यवस्था अर्जुनाने केली नव्हती! आदल्या दिवशी ती जबाबदारी सत्यजितावर सोपवली त्याचे काय झाले हे कृष्णार्जुनाना ठाऊक नव्हते काय? या सर्वांमुळे मला असा दाट संशय आहे कीं त्या तिसर्‍या दिवशी अर्जुन थकव्यामुळे वा जखमांमुळे युद्धाला बाहेर पडलाच नसावा! मात्र या तर्काला महाभारत ग्रंथात कोणताही आधार मला देता येत नाही. या दिवशी अर्जुन युद्धात असणार नाही हे बहुधा कौरवपक्षाला खात्रीपूर्वक माहीत नसावे कारण तसे असते तर द्रोणाने युधिष्ठिराला पकडण्याच्या दृष्टीने ’आक्रमक’ व्यूहरचना केली असती. प्रत्यक्षात त्याने दुर्योधनाला आश्वासन दिले कीं ‘आज मी पांडवपक्षाच्या एकातरी प्रमुख वीराचा वध घडवून आणीन!’ आणि त्याने कौरव सैन्याचा चक्रव्यूह रचला. या व्यूहाचे ’भेदण्यास अत्यंत अवघड’ असे व्यासानी वर्णन केले आहे. हे वर्णन बचावात्मक व्यूहाला जास्त योग्य वाटते आक्रमक व्यूहाला नव्हे! त्यामुळे असे वाटते कीं अर्जुन आज कदाचित युद्धामध्ये नसेल याची कौरवाना काही कल्पना असती तर द्रोणाने सर्व बळ एकवटून युधिष्ठिराला पकडण्याचा प्रयत्न केला असता. बचावात्मक व्यूह रचला नसता. प्रत्यक्ष युद्धाला तोंड लागल्यावर काय झाले ते पुढील लेखात पाहूं