Get it on Google Play
Download on the App Store

अभिमन्युवध -भाग ५

कौरवपक्षाचे अनेक महावीर अभिमन्यूवर चालून आले. कर्णासह सर्वांना अभिमन्यूने अनेकवार चकमकींत हरवून पळवून लावले. शल्याला हरवल्यावर त्याचे सैन्य पळून जाऊ लागले तेव्हां त्याच्या भावाने ते सावरून धरले. मात्र अभिमन्यूने त्याच्यावर हल्ला चढवून त्यालाच मारले. अभिमन्यूचा पराक्रम पाहून द्रोण त्याचे कौतुक करू लागला तेव्हा दुर्योधनाला राग येऊन तो द्रोणाला म्हणाला कीं ’त्याचे कौतुक कसले करता? तो कोणालाच आवरत नाहीं. त्याच्या वधाचा उपाय सांगा.’ तेव्हा द्रोणाने म्हटले कीं ’त्याच्या हातातले धनुष्य चालू आहे तोंवर आपल्या कोणाही वीराला तो दाद देणार नाही. एकजुटीने हल्ला करूनहि तुमचा निभाव लागत नाही. तेव्हा प्रयत्नपूर्वक त्याचे धनुष्य तोडा!’ अभिमन्युपुढे कोणीच उभा राहूं शकत नव्हता. कर्णालाहि त्याने पुन्हापुन्हा पळवून लावले. त्याच्या भावाला अभिमन्यूने मारले. एक उल्लेख आहे कीं ’एक जयद्रथ सोडला तर इतर कोणाचेच काही चालत नव्हते’ मात्र प्रत्यक्षात जयद्रथ व अभिमन्यूचे युद्ध झालेले अजिबात वर्णिलेले नाही!
अभिमन्यु चक्रव्यूहात एकटाच शिरला अशी समजूत आहे. एके ठिकाणी मात्र असाही उल्लेख संजयाच्या वर्णनात आहे कीं ’युधिष्ठिर, भीम, शिखंडी, सात्यकी, धृष्टद्युम्न व इतर अनेक अभिमन्यूच्या मार्गाने गेले व त्याच्या भोवती संरक्षक कडे करून त्यानी कौरवांचा पाठलाग केला, मात्र मग त्या सर्वांना जयद्रथाने अडवले'एके ठिकाणी असाहि उल्लेख आहे कीं ’अभिमन्यूच्या सारथ्याने व्यूहात पडलेल्या भगदाडातून कौशल्याने त्याचा रथ बाहेर काढला व पांडवानी त्याचा जयजयकार केला.’ मात्र हे क्षणिक उल्लेख सोडले तर अभिमन्यु एकटाच चक्रव्यूहात शिरला आणि त्याने उघडून दिलेल्या वाटेने इतर पांडववीर व्यूहात शिरण्याचा प्रयत्न करीत असताना एकट्या जयद्रथाने त्यान यशस्वीपणाने अडवून धरले असेच महाभारत म्हणते. त्याला वर मिळाला होता कीं ’युद्धात कोणत्यातरी एका दिवशी अर्जुन सोडून इतर सर्व पांडवाना तूं अजिंक्य ठरशील.’ हा वर त्याने जेव्हा पांडव वनात असताना द्रौपदीला एकटी असताना पळवण्याचा प्रयत्न केला होता व मग पांडव परत आल्यावर भीमार्जुनानी तिला सोडवून मग त्याची भयानक अप्रतिष्टा केली होती तेव्हा चिडून जाऊन तप:चर्या करून मिळवला होता असे महाभारत म्हणते. यात गोम अशी आहे कीं या वरामध्ये सात्यकी किंवा धृष्टद्युम्न किंवा पांडवाकडील इतर रथी-महारथी यांचा समावेश कुठे होता? मग त्यांचेहि जयद्रथापुढे कां चालले नाही? महाभारत याचा खुलासा करत नाही! अर्थ इतकाच घ्यावयाचा कीं Every dog has his day या उक्तीप्रमाणे हा जयद्रथाचा दिवस होता! त्यामुळे अभिमन्यूच्या मदतीला कोणीहि व्यूहात शिरू शकले नाही.