Get it on Google Play
Download on the App Store

अभिमन्युवध - भाग ६

जयद्रथाला मिळालेल्या वराची हकीगत पांडव पक्षाच्या वीराना व्यूहात शिरण्यात आलेल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी रचली असावी असा संशय येतो! जयद्रथाला स्वप्नात शंकराने वर दिला असें म्हटले आहे त्यामुळे असें वाटते. काही असो, अभिमन्यु चक्रव्यूहात एकटा अडकला. त्याने दिवसभर कोरवांच्या पक्षाच्या एकाही महावीराला दाद दिली नाही. अनेकजण मिळून चालून आले तरीहि त्याने त्याना पळवले. त्याने कोणाकोणाला मारले याची मोठी यादी होईल. अखेर द्रोणाचा सल्ला मानून कर्णाने पुन्हा अभिमन्यूवर चाल केली आणि अखेर त्याचे धनुष्य तोडले. महाभारतातील युद्धवर्णनात अनेक वीरांचीं धनुष्ये अनेकवार तोडली गेल्याचे उल्लेख येतात. त्याला अपवाद फक्त अर्जुनाचा! त्याचे गांडीव धनुष्य मात्र कधीहि तोडले गेल्याचा उल्लेख मिळत नाही. कर्णाजवळ गांडीवधनुष्याच्या तोडीचे धनुष्य होते असे म्हटलेले आहे मात्र त्याचे धनुष्य जयद्रथवधाचे दिवशी भीमाने मोजून सतरा वेळां तोडले असे वर्णन आहे. सात्यकी, अभिमन्यु आणि इतर अनेकांनीहि ते तोडले. धनुष्य तोडणे याचा अर्थ प्रत्यंचा तोडणे असाहि कदाचित असेल!
अभिमन्यूचे धनुष्य तुटले, सारथी मेला, घोडे मेले. मग हाताशी मिळेल त्या आयुधाने त्याने युद्ध चालूच ठेवले. अखेर सर्व संपल्यावर दु:शासनाचा पुत्र व अभिमन्यु यांचे गदायुद्ध झाले, दोघे मूर्छित पडले मात्र दु:शासनपुत्र आधी शुद्धीवर आला व त्याने गदेच्या प्रहाराने अभिमन्यूची अखेर केली. दिवस संपत आलेला होता. त्यामुळे युद्ध संपवून दोन्ही सैन्ये माघारीं फिरलीं.