Get it on Google Play
Download on the App Store

अर्जुन-सुभद्रा यांचे प्रेम

’सौभद्र’ हे मराठीतील एक गाजलेले व सदा लोकप्रिय नाटक आहे. अजूनहि कधीतरी त्याचे प्रयोग होतात. नाटकाची अन त्यातील पदांची मोहिनी अजून कायम आहे. मात्र या नाटकामुळे एक मोठा गैरसमज निर्माण झाला आहे ज्याला महाभारतात काही आधार नाही!
नाटकातील कथानकाप्रमाणे अर्जुन-सुभद्रा यांचे बालवयापासून परस्पर प्रेम होते, अर्जुन तीर्थयात्रेला गेलेला असताना बलराम सुभद्रा दुर्योधनाला द्यायचे ठरवतो, सुभद्रा हवालदिल होते, अर्जुनाचा ठावठिकाणा नसल्यामुळे कृष्णालाहि काय करावे सुचत नाही. पण मग अर्जुन तीर्थयात्रेनिमित्तने भटकत द्वारकेच्या जवळ आल्याचे कृष्णाला कळते व मग अनेक गमतीचे बेत रचून अखेर कृष्ण सुभद्र-अर्जुनाचा विवाह घडवून आणतो! नाटकाची रचना सुरेखच आहे यात शंकाच नाही! मात्र महाभारतात असे काही नाही!
महाभारताप्रमाणे अर्जुन सुभद्रा यांचे बालवयापासून काही ’रहस्य’ नव्हते. कधी गाठभेट झाल्याचेहि उल्लेख नाहीत. पांडव कृष्ण-बलराम यांची प्रथम प्रत्यक्ष भेट द्रौपदीच्य़ा स्वयंवर-मंडपात झालेली वर्णिली आहे. पांच पांडवांचे द्रौपदीशी विवाह झाले, मग त्यानी खांडवप्रस्थ वसवून तेथे राज्य करण्यास सुरवात केली. अर्जुनाने युधिष्ठिर-द्रौपदी याचा एकांतभंग केला म्हणून पांडवांनी स्वत:च केलेल्या नियमाप्रमाणे त्याला तीर्थयात्रेला जावे लागले. (माझ्या मते, ‘स्वयंवराचा पण मी जिंकला, मात्र द्रौपदी पाचांची पत्नी झाली आतां युधिष्ठिर, भीम यांच्या नंतर ज्येष्ठता क्रमाने ती माझ्या वाट्याला येणार कधी?’ असा वैताग येऊन त्याने रस्ता सुधारला व आपली सोय पाहिली!) त्याने ब्रह्मचर्य पाळावे अशीहि अट खरे तर होती पण त्याने ते मुळीच पाळले नाही! उलुपी, चित्रांगदा अशी एकेक ‘प्रकरणे’ करीत तो काही काळाने द्वारकेला आला. यादव समुदायात सुखाने काही काळ काढत असताना कृष्णासमवेत असताना एकदा सुभद्रा त्याचे नजरेस पडली. त्याने कृष्णाला विचारले ‘कोण रे ही?’ कृष्णाने म्हटले ‘अरे ही माझी सावत्र बहिण सुभद्रा’
अर्जुनाचे मन सुभद्रेवर गेलेले ओळखून कृष्णाने विचारले की ‘ही तुला आवडली आहे काय?’ अर्जुनाने कबूल केल्यावर कृष्णाने सल्ला दिला की ‘हिचा आतां विवाह करावयाचा आहे पण स्वयंवर योजले तर तेव्हा ही कोणाला वरील याचा काय भरवसा? तू हिला संधी पाहून पळवून ने. क्षत्रियाना मुलगी पळवून नेऊन केलेला ‘राक्षस विवाह’ शास्त्रसंमत आहे.’
मग योग्य संधी पाहून अर्जुनाने सुभद्रेला रथात घालून पळवून नेले! सर्व यादव वीर रागाने खवळून जाऊन युद्धाला तयार होऊ लागले पण कृष्ण ‘थंड’ बसलेला पाहून बलरामाने म्हटले कीं ‘अरे त्या कृष्णाचे काय मत ते तरी विचारा.’ तेव्हा कृष्णाने सल्ला दिला ‘युद्धाला उभे राहण्यापूर्वी जरा विचार करा. गाठ अर्जुनाशी आहे, कोणा सोम्यागोम्याशी नव्हे. निभाव लागला नाहीं म्हणजे अब्रू जाईल. अर्जुनापेक्षा चांगला पती सुभद्रेला मिळेल काय? तेव्हा झाले आहे ते चांगलेच आहे. दोघाना बोलावून आणून सन्मानाने त्यांचा विवाह करून द्यावा आणि यादव-पांडवांचे सख्य साधावे.’ हे सर्वांना पटले व तसेच झाले. या सर्व कथेत दुर्योधनाचे नाव कुठेच आलेले नाहीं.
तेव्हा सौभद्र नाटक छानच आहे. पण महाभारताबद्दल तो एक मोठाच गैरसमज!