Get it on Google Play
Download on the App Store

रामायण बालकांड - भाग ८

यानंतर धनुर्भंग, राम-सीता विवाह व परशुरामाशी विवाद हा बालकांडाचा अखेरचा भाग पाहण्यापूर्वी विश्वामित्रकथा पाहूं. अहल्येच्या भेटीनंतर राम-लक्ष्मण व विश्वामित्र जनकराजाच्या मिथिलानगरीचे बाहेर उतरले होते. जनकाचा एक यज्ञ चालू होता व त्यानिमित्त ब्राह्मण, ऋषि व शिष्य यांची गर्दी उसळली होती. राजा जनक व पुरोहित शतानंद यांनी विश्वामित्राची भेट घेतली व आदरसत्कार केला. यज्ञाचे उरलेले बारा दिवस येथेच रहा असा आग्रह केला. मग राम-लक्ष्मणांची चौकशी केली. विश्वामित्राने त्यांची माहिती व महती सांगून त्यांना तुझे महान धनुष्य पहावयाचे आहे असे म्हटले. शतानंदाने मातापित्यांची चौकशी केली व मग रामलक्ष्मणांना विश्वामित्रांची सर्व कथा सांगितली. महाभारतांतहि विशामित्राची कथा आहेच. मात्र दोन्ही कथांत थोडाफार फरक आहे.
विश्वामित्राने वसिष्ठांच्या कामधेनूची मागणी केल्यामुळे त्या दोघांचा संघर्ष झाला. विश्वामित्राने कामधेनूचे जबरदस्तीने हरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हां वसिष्ठांच्या सांगण्यावरून तिने स्वत:च सैन्य निर्माण करून स्वत:चे संरक्षण केले. विश्वामित्राच्या सर्व सैन्याचा संहार झाला. त्याचे शंभर पुत्र वसिष्ठाच्या क्रोधाला बळी पडले. उरलेल्या एका पुत्राला राज्य देऊन (विश्वामित्र मूळचा क्षत्रिय राजा) विश्वामित्र तपश्चर्येला गेला. अस्त्रे मिळवून त्याने पुन्हा वसिष्ठावर चाल केली. पण एका ब्रह्मदंडाच्या बळावर वसिष्ठाने त्याचा पुन्हा पराभव केला. तेव्हां ब्राह्मबळापुढे क्षात्रबळाचा निभाव लागत नाही म्हणून क्षत्रियबळाचा धि:क्कार करून विश्वामित्र ब्रह्मर्षिपद मिळवण्याच्या प्रयत्नाला लागला. त्याच्या तप:चर्येला पहिला अडथळा आला तो त्रिशंकूने सदेह स्वर्गाला जाण्यासाठी त्यांची मदत मागितली याचा. वसिष्ठपुत्रांनी त्रिशंकूला मदत नाकारल्यामुळे ईर्षेला बळी पडून विश्वामित्राने आपले तपोबल त्रिशंकूसाठी पणाला लावले. इंद्राने त्रिशंकूला सदेह स्वर्गात प्रवेश नाकारला व स्वर्गातून ढकलून दिल्यामुळे खाली डोके-वर पाय अशा अवस्थेत तो पृथ्वीवर पडू लागला. त्याला आकाशातच लटकत ठेवून त्याच्यासाठी विश्वामित्राने प्रतिसृष्टि निर्माण केली. (प्रतिसृष्टि हे काय प्रकरण आहे याबद्दल पुढील भागात विस्ताराने लिहिणार आहे.) या सर्व खटाटोपात पुण्यक्षय झाल्यामुळे विश्वामित्र पुष्करतीर्थामध्ये पुन्हा तपश्चर्येला बसले. त्या काळी मेनका ही अप्सरा पुष्करतीर्थात स्नानाला आली. ती स्वत:हूनच आली होती. तिला इंद्राने विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी पाठवले होते असे रामायण म्हणत नाही! मात्र तिच्या मोहात विश्वामित्र पडला हे खरे. एकूण दहा वर्षांचा काळ त्यांनी एकत्र घालवला. हा क्षणिक मोह नक्कीच नव्हता!. रामायणात येथे शकुंतलेचा मात्र अजिबात उल्लेख नाही! दहा वर्षांनी विश्वामित्र भानावर आले. त्यांनी मेनकेला मधुर शब्दात निरोप दिला व पुन्हा तपाला आरंभ केला. यावेळी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने येऊन कौतुक केले पण ब्रह्मर्षिपद मान्य केले नाही. कारण विश्वामित्र अजूनहि जितेंद्रिय झालेले नव्हते. पुन्हा घोर तपश्चर्या चालू राहिली. यावेळी तपोभंगासाठी इंद्राने रंभेला पाठवले. तिच्या दर्शनाने काम व क्रोध दोन्हीहि जागृत झाल्यामुळे निराश होऊन विश्वामित्राने तिला शाप दिला व पुन्हा खडतर तप चालू केले. यावेळी मात्र त्यांनी सर्व विकारांवर विजय मिळवला व आपले ब्रह्मर्षिपद खुद्द वसिष्ठांकडूनच मान्य करवून घेतले. त्यांचे वैर संपून मैत्री झाली. खडतर प्रयत्नानी स्वत:च्या मनोवृत्तींवर विजय मिळवतां येतो हे त्यानी दाखवून दिले. रामायणातील विश्वामित्रकथा ही अशी आहे. महाभारतापेक्षां ही जास्त विस्तृत आहे व रंजकही आहे.