रामायण बालकांड - भाग ९
या कथेमध्ये विश्वामित्राने त्रिशंकूसाठी प्रतिसृष्टि निर्माण केली असे म्हटले आहे. बर्याच विचारांती हे एक रूपक आहे असे माझे मत बनले आहे. त्याचा मला सुचलेला खुलासा खालीलप्रमाणे आहे. आकाशात उत्तरध्रुव व तेथून आकाशीय विषुववृत्तापर्यंतच्या आकाशाच्या भागामध्ये अनेक तारकापुंज आहेत. आकाशीय विषुववृत्ताच्या (Celestial Equator) जवळच्या लहानशा पट्ट्यातून सूर्य, चंद्र व इतर बहुतेक ग्रह फिरतात. त्यांच्या भ्रमणमार्गाच्या या पट्ट्यात जे सत्तावीस तारकापुंज येतात त्याना नक्षत्रे म्हणतात. ही सर्व भारतात आपणाला दिसतात. भारतात येण्यापूर्वी आर्यलोक आणखी उत्तरेला उत्तरध्रुवाजवळच्या भागात राहात असावेत असे लोकमान्य टिळकांचे प्रतिपादन होते. भारतात आल्यावरही विश्वामित्राच्या काळापर्यंत त्यांचे वसतिस्थान अद्याप मुख्यत्वे उत्तरभारतातच होते. हा भूभाग पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या (terrestrial equator) बराच उत्तरेला २५ ते ३० अक्षांशांदरम्यान आहे. उत्तरध्रुवावरून आकाशाचा फक्त अर्धा भाग, आकाशाच्या उत्तर गोलार्धाचा, आकाशीय विषुववृत्ताच्या उत्तरेचा, दिसतो. उरलेला आकाशाचा भाग त्या भागातून आर्याना कधीच दिसत नव्हता. उत्तरभारतात आल्यावरही विश्वामित्राच्या काळापर्यंत हा दक्षिण ध्रुवापासून २५-३० अंशांपर्यंतचा आकाशाचा भाग आर्य ऋषिमुनीना दिसत नव्हता. या न दिसणार्या आकाशाच्या भागातहि अनेक तारकापुंज प्रत्यक्षात आहेतच. प्रत्यक्ष दक्षिण ध्रुवापाशी एखादा तारा नाही. मात्र जवळच सदर्न क्रॉस नावाचा तारा आहे. दक्षिण गोलार्धात समुद्रावर सफर करणार्या जहाजांना त्याचा वेध घेऊन दक्षिण दिशा ठरवतां येते. विश्वामित्राने या अद्याप सर्रास न दिसलेल्या आकाशाच्या भागामध्येहि ध्रुव, इतर तारकापुंज, कदाचित दुसरे सप्तर्षि, वा नवीन नक्षत्रे असली पाहिजेत हे तर्काने जाणले असावे वा दक्षिण दिशेला प्रवास करत असताना भारताच्या दक्षिण टोकापाशी पोचून ( हा भाग विषुववृत्तापासऊन फक्त १० अंशांवर आहे.) हे पूर्वी न दिसलेले तारकापुंज प्रत्यक्ष पाहिले असावेत व त्यांना नवीन नक्षत्रे म्हटले असावे. यालाच ’त्याने प्रतिसृष्टि निर्माण केली’ असे म्हटले गेले असावे. रामायणात, प्रतिसृष्टि निर्माण केली याचे वर्णन ’दक्षिणमार्गासाठी नवीन सप्तर्षींची सृष्टि केली व नवीन नक्षत्रेहि निर्माण केली’ असेच केले आहे. रामायणात, सर्ग ६०-श्लोक २४ ते ३२ मध्ये ऋशिमुनींनी व देवांनी विश्वामित्राने निर्माण केलेली प्रतिसृष्टि मान्य केली व ’तुम्ही निर्माण केलेली सर्व नक्षत्रे वैश्वानरपथातून बाहेर प्रकाशित होतील व त्यांत त्रिशंकूहि प्रकाशमान होईल’ असा त्यांना वर दिला असे म्हटले आहे. याचा अर्थ विश्वामित्राचे संशोधन व/वा तर्क ऋषिमुनीनी मान्य केला असा केला पाहिजे. मूळची सत्तावीस नक्षत्रे सूर्याच्या भ्रमणमार्गावर म्हणजे वैश्वानरपथावर आहेत व नवीन नक्षत्रे त्याचे बाहेर, आणखी दक्षिणेला, आहेत हे बरोबर जुळते. रामायणातच असलेल्या या सर्व वर्णनावरून प्रतिसृष्टि निर्माण केली म्हणजे काय याबद्दलचा हा खुलासा मला सुचला आहे. आकाशाच्या या दक्षिणध्रुवाजवळपासच्या भागात एखाद्या तारकापुंजात ’खालीं डोके-वर पाय’ अशा अवस्थेत लोंबकाळणार्या माणसासारखा दिसणारा एखादा तारकासमूह आहे काय? असल्यास तोच त्रिशकु! हा तर्क तपासून पाहणे मात्र माझ्या कुवतीबाहेरचे आहे. जो तर्क वा खुलासा वाचलेल्या मजकुरांतून सुचला तो आपणापुढे ठेवला आहे!