Get it on Google Play
Download on the App Store

रामायण बालकांड - भाग ११

बालकांडाच्या अखेरच्या भागांत राम व त्याचे बंधु यांच्या विवाहाची तपशीलवार हकीगत सांगितली आहे. जनकाच्या निमंत्रणाप्रमाणे दशरथ सर्व कुटुंबियांसमवेत मिथिलेला आला. वसिष्ठ व जनकाचा पुरोहित यांनी एकमेकांच्या कुळांचा इतिहास व महिमा एकमेकांस सांगितला. जनकाने आपली दुसरी कन्या लक्ष्मणाला दिली व भावाच्या दोन कन्या भरत शत्रुघ्नांना दिल्या. राम व त्याचे बंधु यावेळी सोळा वर्षांचे होते. सीता रामाला अनुरूप वयाची असे धरले तर ती १२-१३ वर्षांची व इतर बहिणी बहुधा त्याहून लहान म्हणजे बालिकाच होत्या. सीतेच्या प्राप्तीसाठी मागणी करणार्‍या व नाकारल्यामुळे युद्धाला उभे राहिलेल्या सुधन्वा नावाच्या राजाची कथा येथे येते. त्याचा पराभव करून व त्याला मारून त्याचे राज्य जनकाने आपल्या भावाला दिले. किती वर्षांपूर्वीची ही घटना ते सांगितलेले नाही. फार पूर्वीची असणे शक्यच नाही कारण सीतेचे वय यावेळी १२-१३च होते.
चारही भावांचे विवाह पार पडले. दशरथाबरोबर कैकयराजाचा पुत्र युधाजित, भरताचा मामा, उपस्थित होता. भरताला आजोबांच्या भेटीला नेण्यासाठी तो अयोध्येला आलेला होता. तो विवाहासाठी मिथिलेला आला. कौसल्या-सुमित्रा यांच्या कुळांपैकी कोणी आल्याचा उल्लेख नाही. कौसल्या नावावरून कोसल देशाची राजकन्या असावी. तिला माहेराहून संपत्ति, गावे, मिळालेली होतीं असा पुढे उल्लेख मिळतो. सुमित्र गरीब, नगण्य घराण्यातील असावी. जनकाने हुंडा म्हणून अमाप धन, गायी, वस्त्रे, हत्ती, घोडे, रथ व सैनिकही दिले. दासदासी, रत्नेहि दिली. सीतेबरोबर १०० मैत्रिणीहि दिल्या! देवयानीबरोबर आलेली तिची मैत्रिण शर्मिष्ठा अखेर ययातीकडे पोचली, तसे रामाचे बाबतीत झाले नाही! विवाहसमारंभ आटपल्यावर विश्वामित्र आपल्या वाटेने गेले व दशरथही पुत्र, सुना, सैनिक, सेवकांसह अयोध्येला निघाले. मात्र वाटेत त्याना परशुराम आडवे आले.
त्यानी पूर्वी केलेला क्षत्रिय संहार आठवून दशरथ भयभीत झाला. परशुरामाने शिवधनुष्य तुटणे ही अद्भुत व अचिंत्य अशी घटना आहे असे म्हणून स्वत:चे धनुष्य रामासमोर धरले व म्हटले की ’हे सज्ज करून दाखव व तसे करू शकलास तर माझ्याशी द्वंद्वयुद्ध कर’. दशरथाने गयावया करून ’तुम्ही इंद्राजवळ प्रतिज्ञा करून शस्त्रांचा परित्याग केलेला आहे’ याचे स्मरण दिले. परशुरामाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले! त्याने रामाला पुन्हा म्हटले की विश्व्कर्म्याने बनवलेल्या दोन खास धनुष्यांपैकी एक शिवाने त्रिपुरासुराशी युद्ध करताना वापरले व हे दुसरे विष्णूपाशी होते. पूर्वी एकेकाळी शिव व विष्णू ही धनुष्ये घेऊन युद्धाला सज्ज झाले होते. देवांनी त्यांना शांत केले. शिवावे धनुष्य शिथिल अवस्थेत जनकाच्या पूर्वजांकडे ठेव म्हणून दिले गेले व विष्णूचे हे धनुष्य भृगुवंशीय ऋचीक, नंतर माझा पिता जमदग्नि व नंतर माझ्याकडे आले. शिवधनुष्य तुटल्याचे ऐकून मी हे त्याच्या तोडीचे विष्णु धनुष्य घेऊन आलो आहे तर तू हे सज्ज करून दाखव व मग माझ्याशी द्वंद्व युद्ध कर.’ रामाने धनुष्य सज्ज केले, बाण लावला व म्हटले की ’मी हा बाण तुमच्यावर सोडत नाही पण या वैष्णव बाणाने तुमचे सर्व तपोबल किंवा तुमची द्रुतसंचारशक्ति यांतील एक काहीतरी नष्ट होईल’ परशुराम म्हणाला कीं ’मी सर्व पृथ्वी कश्यपाला दान केली व त्याने रात्री कोठेहि निवास करण्याची मला बंदी केली आहे त्यामुळे मला रात्रीपूर्वी महेंद्रपर्वतावर पोंचण्यासाठी द्रुतसंचार शक्तीची गरज आहे तेव्हां ती राहूं दे.’ रामाने त्याचे सर्व तपोबल नष्ट केले. राम हाच आपल्यानंतरचा विष्णूचा अवतार आहे हे जाणून परशुराम तपश्चर्येला निघून गेला. महेंद्रपर्वत कश्यपाला पृथ्वी दान केल्यावर परशुरामाने निर्माण केलेल्या ( वसतीखाली आणलेल्या) नवीन प्रदेशामध्ये होता काय? परशुराम यानंतर रामकथेत कोठेहि नाही, तो थेट महाभारतात पुन्हा अवतरतो. भीष्म व कर्ण हे त्याचे शिष्य त्या कथेत महत्वाचे आहेत. रामायणातील या प्रसंगामध्ये परशुरामाला एवढा कमीपणा देण्याचे काय कारण? राममाहात्म्य वाढवणे एवढेच. असे दिसते की क्षत्रियांमध्ये बलवान व्यक्ति पुन्हा जन्माला आल्या आहेत व झाला एवढा क्षत्रियसंहार पुरे हे परशुरामाला मान्य करावे लागले एवढाच मथितार्थ खरा.
विष्णुधनुष्य नंतर वरुणाला देऊन राम व दशरथ अयोध्येला गेले. लगेचच भरत व बरोबर शत्रुघ्नहि युधाजिताबरोबर कैकयदेशाला गेले. त्यांच्या पत्नी त्यांचेबरोबर गेल्याचा उल्लेख नाही. त्या अल्पवयीन असाव्या. भरत-शत्रुघ्न दीर्घकाळ कैकयदेशाला राहिले असे दिसते कारण रामाला राज्य देण्याचा बेत पुढे आला तोवरही ते परत आलेले नव्हते. मध्यंतरी किती काळ गेला? त्याचा उल्लेख रामायणात तेथे स्पष्ट नाही. त्याबद्दल पुढे विस्ताराने लिहीन. बालकांडावरचे लेखन येथे संपले.