संध्या 123
१६
आशेचे खेळ
“संध्ये, मी तुझ्याकडे राहीन, परंतु एका अटीवर.”
“भाईजी, तुम्हीसुध्दां अटी घालूं लागलेत ? तुमचं देणंसुध्दां सशर्त होऊं लागलं ?”
“संध्ये, साधी अट आहे. साधी शर्त आहे.”
“सांगा, कोणती ?”
“मला दोन्ही वेळां स्वयंपाक करूं देणार असशील, तर मी इथं राहीन. तुला आतां विश्रांति पाहिजे. संध्ये, तूं अशक्त झाली
आहेस. तुला कांहीं इंजेक्शन्सहि द्यायला हवींत.”
“इंजेक्शन्स कशाला ?”
“जरा शरीरांत रक्त वाढायला. तूं फिक्कट दिसतेस हो, बाळ.”
“परंतु इंजेक्शन्स घ्यायला पैसे हवेत.”
“बघूं आपण, परंतु मला स्वयंपाक करूं द्यायला तरी पैसे नकोत ना ? “
“कुणाला माहीत ? तुमच्यासारखा आचारी का मोफत स्वयंपाक करील ?”
“मोफत नाहीं करणार; तुमच्याकडे तो जेवत जाईल व त्याच्या मोबदल्यांत स्वयंपाक करीत जाईल.”
इतक्यांत विश्वास बाहेरून आला. तो आतां जरा हिंडूफिरूं लागला होता. त्याच्या चेह-यावरहि जरा तजेला आला होता. विद्यार्थ्यांमध्यें पुन्हा त्याची जा-ये सुरू झाली होती. लवकरच सर्व विद्यार्थ्यांचा हरताळ पडायचा होता. त्यासाठीं तो हालचाली करायला गेला होता. पत्रकें छापून घेण्यासाठीं गेला होता.
“विश्वास, हे भाईजी काय म्हणतात, ऐकलंस का ?”
“ते जाऊं म्हणत असतील, होय ना ? भाईजी, आमच्यावर प्रेम आहे म्हणतां, परंतु चार दिवसहि तुम्ही आमच्याकडे राहात नाहीं. आलेत नाहीं तों तुमची जायची तयारी ! “
“या वेळीं नाहीं का राहिलों ?”
“मी आजारी होतों म्हणून राहिलेत. परंतु आतां मी बरा झालों आहें. राहा चार दिवस. विद्यार्थ्यांचा हरताळ आठवडयानं आहे. तुम्ही त्या दिवशींच्या सभेला अध्यक्ष व्हा.”
“मी होणार नाहीं.”
“तुम्हांला झालं पाहिजे. आम्हीं तसं ठरवूनहि टाकलं आहे. तुम्ही का आमची फजिती करणार ? असं काय भाईजी ?”
“विश्वास, या नसत्या भानगडी माझ्या पाठीमागं तुम्ही काय म्हणून लावतां ? का ही लादालादी ?”
“पुन्हां नाहीं तुम्हांला विचारल्याशिवाय आम्ही कांहीं करणार. परंतु या वेळीं तरी तुम्ही आमची अब्रू संभाळा.”
“विश्वास, तुमचा मी गुलाम आहें.”