संध्या 154
“अरे, हरणीचे वडील व हे नेहमीं म्हणायचे, कीं विश्वास व हरणी या दोघांचा जोडा सुरेख शोभतो. हरणीचे वडील असते, तर तुलाच ते ती देते. हरणीचे वडील व हे प्रिय मित्र होते. यांना आनंदच होईल. मित्राची इच्छा पूर्ण झाली असं यांना वाटेल. शिवाय अशी शिकलेली सून अनायासानं विनाखर्चानं मिळालेली कुणाला आवडणार नाहीं ? तुम्ही इथं नाहीं राहिलांत, तरी चारचौघात तोंड भरून यांना सांगतां तर येईल. विचरा त्यांना.”
आणि विश्वासनें वडिलांजवळ गोष्ट काढली; आणि काय आश्चर्य ! वडील खरोखरच एकदम तयार झाले. लग्नाचे मुहूर्त आतां नव्हते. परंतु ते म्हणाले, “पवित्र व मंगल गोष्टीला काळवेळ पाहायला नको. “अकालो नास्ति धर्मस्य । जीविते चंचले सति ॥” विश्वास, मी सारी व्यवस्था करतों. तुम्हीं दोघं तयार राहा म्हणजे झालं.”
संध्येचा ताप राहिला होता. परंतु तिला आमांश झाला. तिची प्रकृति सुधारेना. मनानेंहि तिनें हाय घेतली होती. परंतु दवाखान्यांतून घरीं आणल्यानें आणखीच प्रकृति बिघडली असती. कल्याण दवाखान्यांत सकाळ-संध्याकाळ जात असे. तिच्याशीं प्रेमानें बोलत बसे. विश्वासचें लग्न लौकरच होईल असें तिला त्यानें सांगितले. संध्येला आनंद झाला. तिच्या तोंडावर होईल असें तिला त्यानें सांगितले. संध्येला आनंद झाला. तिच्या तोंडावर थोडा रंग आला. किती तरी दिवसांनीं अशी थोडी रंगच्छटा तेथें फुलली होती.
“कल्याण, हरणीला आपण काय द्यायचं ?” संध्येनें विचारलें.
“काय द्यायचं, संध्ये ?”
“कल्याण, माझ्या ट्रंकेत एक रेशमी रुमाल आहे. तो मला आणून दे. मी त्याच्यावर पडल्या पडल्या हरणीचं नांव घालीन व तिला देईन.”
“विश्वासंहि नांव घाल. “हरणी व विश्वास” असें त्यांत गुंफ; आणि “संध्या व कल्याण यांचेकडून” असंहि लिहि. म्हणजे आपली दोघांची त्या दोघांना भेट असं होईल.”
“खरंच. छान होईल. आण हो. माझी सुई वगैरे सारं आण. त्या गांठोडयांत असेल. कल्याण, त्या गांठोडयांत चिमण्या होत्या, काय काय तरी होतं. अरेरे !”
“मीं पाहिलं हो सारं, संध्ये.”
“केव्हां ?”
“सामान भरायच्या वेळीं. संध्ये, उगी. नको, डोळयांत पाणी आणूं.”
“कल्याण, मधूनमधून हें पाणी कांहीं दिवस येईलच. एकदम येतात डोळे भरून. किती मीं आशा खेळवल्या होत्या मनांत. हें काय, तूंहि का रडत आहेस ? नको रडूं. तुम्हां पुरुषांना रडणं शोभत नाहीं. ही बघ मी हंसतें. तूंहि हंस. रडत नको हो जाऊं.”
संध्येचा हात हातांत घेऊन कल्याण बसला होता. ती त्याच्याकडे बघत होती.
“कल्याण, भाईजी नाहीं मुळींच आले ते ?”
“त्यांना तुझ्याकडे यायला धीर नाहीं होत. ते सारखी तुझी आठवण करतात. संध्ये, ते लौकरच जाणार आहेत. तुझ्यामुळं इतके दिवस ते राहिले; नाहीं तर आजपर्यंत कधींहि इतके राहिले नाहींत. त्यांचं वर्तमानपत्रहि सरकारनं बंद करून टाकलं. त्यामुळंहि ते मोकळे होते. परंतु मोकळे असले, तरी एके ठिकाणीं राहणं त्यांना जमत नाहीं. ते नेहमीं हिंडत असतात. शेतक-यांतून फिरत असतात. आतां नाहीं ते आणखी राहणार.”
“हरणीच्या लग्नापर्यंत तरी राहतील ना ?”
“राहतील.”
“जायच्या आधीं मला म्हणावं भेटून जा.”
“तिला भेटल्याशिवाय नाहीं ते जाणार. त्यांचा आम्हांला इतके दिवस किती उपयोग झाला ! नि:शंकपणं व निश्चिंतपणं आम्ही इकडे तिकडे जात होतों. वाटे, जणूं घरांत कोणी वडील माणूस काळजी घ्यायला आहे--”
“कल्याण, तूं गेला होतास ना त्या कामासाठीं, तर भाईजी माझ्यावर किती रागावले ! म्हणाले, तूं कसं त्याला जाऊं दिलंस ? तूं रडतीस तर तो जाता ना.”