संध्या 172
काँग्रेसशीं वाटाघाटी करतां याव्यात म्हणून सरकारने सारे सत्याग्रही सोडले. मौलाना अबुल कलम आझाद, जवाहरलाल वगैरे सारे बाहेर आले. जपान आला तर मी हातांत तरवार घेऊन लढेन असें आझाद म्हणाले. वातावरण आशेचें वाटलें; आणि इंग्लंडमधून क्रिप्स वाटाघाटीसाठीं येणार असे कळलें. क्रिप्स हा समाजवादी. रशियाचे कौतुक करणारा. जवाहरलालचा मित्र. आशा वाढल्या. आणि क्रिप्स आले. दिल्लीला बोलणीं सुरू झालीं. परंतु सारे ओंफस.
युध्दानंतर स्वातंत्र्य देऊं, असें सांगण्यांत आलें. परंतु आज काडीचेहि स्वातंत्र्य द्यायला ब्रिटिश सरकार तयार नव्हतें. क्रिप्स कदाचित् तडजोड करता. परंतु ब्रिटिश नोकरशाहीनें मोडता घातला. विरोधी भुतें उभीं करण्यांत आलीं. जिनांचा बाऊ करण्यांत आला. क्रिप्सचें इंग्लंडमध्यें महत्त्व वाढलें होतें. हिंदी प्रश्नहि तो सोडवता, तर चर्चिल हतप्रभ होऊन क्रिप्स पहिला मुत्सद्दी झाला असता. परंतु क्रिप्सचा बोजवारा उडवण्यांत आला आणि हिंदी स्वातंत्र्याचाहि.
कांहीं मिळालें तर नाहींच. परंतु हिंदुस्थानचे असे भाग पाडा, तसे भाग पाडा, वगैरे सुचवून आमच्यांत अधिकच दुफळी या साम्राज्य सरकारनें माजवली. महात्माजींना सात्त्वि संताप आला. राष्ट्र जगणार कीं मरणार असा प्रसंग आला असतांहि जी सत्ता फोडा व झोडा याच मार्गाचा अवलंब करते, त्या सत्तेची महात्माजींना चीड आली. ही सत्ता जाईल तेव्हांच ऐक्य होईल असे ते म्हणाले. हिंदु-मुस्लिम ऐक्याचा खरा मार्ग म्हणजे ब्रिटिश सत्ता येथून जाणें.
आणि महात्माजी तेजस्वी असा “चले जाव” मंत्र शिकवूं लागले. काँग्रेस का प्रचंड लढा करणार ? कम्युनिस्टांना लढा नको होता. काँग्रेसला हे कम्युनिस्ट विरोध करतील असा जेव्हां सरकारला विश्वास आला, तेव्हां कम्युनिस्टांची त्यांनीं सुटका केली. सुटका होताच “काँग्रेस मुस्लिम एकजुटीनें राष्ट्रीय सरकार” ही त्यांची घोषणा सर्वत्र दुमदुमूं लागली.
महात्माजींचा सूर चढूं लागला. सध्यांचें जिणें म्हणजे केवळ मरणें आहे असे ते म्हणाले. असल्या जीवनाला काडी लावून देणें बरें. स्वातंत्र्याशिवाय अत:पर जगणें म्हणजे पाप आहे, अशी उत्कट वाणी ते बोलूं लागले. जवाहरलाल म्हणाले, “महात्माजींच्या डोळयांत मला अपार उत्कटता दिसली. त्यांची तगमग दिसली.” महात्माजी म्हणाले, “माझी झोंप नाहींशी झाली.” घोषणा देशभर दुमदुमूं लागली.
आणि शेवटीं मुंबईस आठ ऑगस्टला तो स्वातंत्र्याचा ठराव झाला. महात्माजी सरकारबरोबर वाटाघाटी करणार होते. परंतु सरकारनें महात्माजी व काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सर्व सभासद यांना अटक करून नेलें. देशभर भराभर सर्वत्र धरपकडी झाल्या; आणि जनतेनें कधीं केली नव्हती अशी चळवळ केली. प्रक्षुब्ध झालेल्या हिंदी जनतेनें अहिंसक बंड केलें. प्राणांची हिंसा जनतेनें केली नाहीं. खाजगी मालमत्ता लुटली नाहीं. कोठेंहि जातीय दंगे झाले नाहींत. प्राणांची हिंसा करावयाची नाही, हें सार्वभौम बंधन स्वत:ला घालून घेऊन जनता सरकारशीं लढत राहिली. “करेंगे या मरेंगे” हाच जनतेचा निर्धार होता.
देशांत अशी अभूतपूर्व चळवळ चालली असतां भाईजी कोठें होते ? कल्याण व विश्वास, संध्या नि हरणी यांची मुक्तता झाली होती. परंतु भाईजी तुरुंगांतच होते. सत्याग्रह करण्यापूर्वीच त्यांना अटक झालेली असल्यामुळें सत्याग्रही सुटले, तेव्हां त्यांची मुक्तता झाली नाहीं. ते एकटेच त्या वेळीं तुरुंगांत होते; आणि ऑगस्टचा ठराव होण्यापूर्वीं एके दिवशीं कल्याण नि विश्वास तुरुंगांत त्यांना भेटायला गेले. बराच वेळ भेट चालली. चर्चा झाली.
“भाईजी, तुमच्या सुटकेची खटपट आम्हीं चालविली आहे.” विश्वास म्हणाला.
“सुटका होणार नाहीं. मी कांहीं कम्युनिस्ट नाहीं.” ते म्हणाले.