*कलिंगडाच्या साली 2
ते झाडूवाले कलिंगडाच्या सालींची घाण गोळा करीत होते. स्वस्तिक सिनेमाजवळची ती जागा रात्रभर फोडी भराभर खाऊन खाली फेंकलेल्या. आणि त्या साली नीट कोण खातो ? सारीच घाई. पटापट वरचा लाल भाग खाऊन कुरतडून खाली फेकलेल्या होत्या. गोळा केलेल्या त्या फोडींजवळ, त्या कचर्याजवळ तीं पहा दोनचार मुलें धांवत आलीं. काय पाहिजे त्यांना ? त्या सालींकडे पहात आहेत. त्यांचा का कांही खेळ आहे ? परंतु ती पहा एक फोड एका मुलानें उचलली. तें अर्धवट उरलेले लाल लाल तो भराभर खाऊ लागला. आणि तीं सारीं मुलें घाबरलीं. ज्या फोडीला थोडेअधिक लाल शिल्लक असेल तिच्यासाठी झोंबाझोंबी, मारामारी. त्या साली लवकर कचर्याच्या मोटारींत फेंकल्या जातील म्हणून मुलांना घाई. एकीकडे खात असतां दुसर्या फोडीवर त्यांचे डोळे आशेनें वळलेले असत. त्या फोडी भराभर खाण्यासाठीं त्यांचे दांत शिवशिवलेले जणूं असत.
मी तें दृश्य पाहात होतों. त्या मुलांना ताजी फोड कोण देणार ? आणि एक दिवस कोणी देईल. रोज कोण देणार ? सकाळ केव्हां होते आणि फार गर्दी ठायींठायीं दिसूं लागण्यापूर्वी त्या फोडी, जाऊन केव्हां खातों असें त्या मुलांना होतं असेल. काय ही दशा ! परंतु देशभर अशीं दृश्यें ठायींठायी दिसत असतील. आंब्यांच्या साली-कोयी रस्त्यावर टाकलेल्या चुंफतांना मी त्यांना पाहिले आहे. उकिरड्यावर टाकलेले अन्नाचे तुकडे गोळा करून ते खातांना किती तरी जणांना मीं पाहिलें आहे. हीं मुलें का त्याला अपवाद होतीं !
माझे पाय पुढें जात ना. घाणींतल्या त्या सालीं ! मी का त्या मुलांना स्वच्छतेवर प्रवचन देऊं ?- ‘असें खाऊं नये. घाणींतील त्या सालीं आजूबाजूला थुंकलेलें. झाडूनें गोळा केलेल्या नका खाऊं.’ असें का त्यांना सांगूं ? मी त्यांना स्वच्छता शिकवूं जाणें म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याप्रमाणें झालें असतें.
उन्हाळ्याचे दिवस ! दिवसभर तीं मुलें कलिंगडांच्या फोडींकडे आशाळभूत नजरेनें बघत असतील. हजारों लोक खाताहेत. आणि आपणांला ? तीं गरीब मुलें होती. कुठें होते त्यांचें आईबाप, कुठलीं तीं राहाणारीं ? ना त्यांना शिक्षण, ना संस्कार. कधीं कुठें मजुरी करतात, आणा अर्धाआणा मिळवितात. अधिक मागतील तर थप्पड खातात. मी त्यांच्याकडे बघत होतो. अंगावर चिंध्या. केस वाढलेले. कुठला साबण, कुठून तेल ? कुठें स्नान, कुठें भोजन ?
एका मुंबईत अशी हजारों मुलें आहेत म्हणतात जीं कुठें तरी राहातात, कुठें तरी पडतात. मानवतेची ही विटंबना कशी थांबायची ?
मी माझ्या मित्राकडे जाणें विसरलों. मी विचारमग्न होतों. तसाच चौपाटीकडे वळलों नि समुद्राच्या किनारीं जाऊन बसलों. समुद्र उचंबळत होता. माझें लक्ष त्याच्याकडे होतें. माझ्या मनांतहि शत विचार उसळले होते. एकाएकी लोकमान्यांच्या पुतळ्याकडे लक्ष गेलें. स्वराज्यासाठीं तो महापुरुष झगडला. कुठें आहे तें स्वराज्य ? सर्वांचे संसार सुखी करणारें स्वराज्य ? ज्या स्वराज्यांत अशा मुलाबाळांसाठीं बाळगृहें असतील, जेथें त्यांची जीवनें फुलविली जातील, जेथे त्यांचा स्वाभिमान जागा होईल, अशी स्थिती कधीं येईल ? असें स्वराज्य आणणें म्हणजे समाजवाद आणणें. समाजवादाची सर्वांच्या विकासाची दृष्टि आल्याशिवाय समाजाचा कायापालट व्हायचा नाहीं ! मी लोकमान्यांच्या पुतळ्याला प्रणाम केला. तें स्वराज्य लौकर येवो, असें मनांत म्हणून निघून गेलों.