*कलिंगडाच्या साली 9
“अहो, दंड एक रुपया कीं हजार हा प्रश्न नाहीं. पुष्कळ वेळां श्रीमंतांना एक पै दंड केल्याची उदाहरणे आहेत. त्या पैनेंहीं त्यांची प्रतिष्ठा जाते. त्यांच्या कृत्यावर कांही पांघरून घालीत नाहीं आपण, काय धनजीशेट?” अधिकार्यांनी एटींत विचारलें.
“मी तो बिलकुल निरपराधी. पाप नाहीं केला. सो रुपये द्या म्हणतां देते. परंतु ती शुक्रीच चावट. जंगलांत मला म्हणायची, नवरा ठोकतो, ताडी पितो. तुम्ही सांभाळा. मी पीडा नको म्हटलें. तरी आली. तिला नेऊन सोडून दिलें. या लोकांना खरेंखोटें काहीं नाहीं. रानटी जात. !” धनजीशेट म्हणाले.
“जपून बोला.” बुधा म्हणाला.
“काय जपून बोला ?” धनजीशेट उसळून म्हणाला.
“रानटी आम्हीं नाहीं; तुम्ही आहांत. गरीबांच्या रक्तावर जगणारेंस, बायामाणसांची अब्रू घेणारे. तुम्हांला न्यायनीत नाहीं, दिल्या शब्दाची किंमत नाहीं, केलेल्या वायद्याची, कराराची कदर नाहीं. तुम्हीं रानटी. बंगल्यात राहाणारे, ब्रँडी पिणारे तुम्ही रानटी. आम्ही नाही रानटी. आम्ही देवाला भिऊन वागतो.” बुध्या बोलला.
“जाऊं द्या. झालें गेलें विसरा. मग मजुरीचा नवा दर ठरला ना? धनजीशेट, तुम्ही शंभर रुपये शुक्री किंवा मंगळ्या यांच्याकडे पाठवा. मंगळ्या वगैरे सारे सोडून देण्यांत येतील. संप थांबवा. शान्ति राखा.” अधिकारी म्हणाले.
आदिवासी गेले. बडी मंडळी बसली होती. खादीचा कार्यक्रम होता. चहा, फळफळावळ, बिस्किटें, चिवडा, सारें होते.
“न्याय शेवटीं वर्गदूषितच असतो,” आदिवासी सेवक म्हणाले.
“तुम्हीसुद्धा वर्गयुद्धाची भाषां बोलू लागलांत ? आश्चर्य.” अधिकारी म्हणाले.
“धनजीशेटनीं स्त्रीवर अत्याचार केला. तुम्ही त्यांना शंभर रुपये दंड करतां. गरिबांच्या बायकांची तुमच्या न्यायदेवतेसमोर हीच का किंमत? सर्वत्र हाच प्रकार. अमेरिकेंत एखाद्या नीग्रोनें गोर्या स्त्रीला हात लावला तर त्याला जिवंत जाळतात. परंतु नीग्रो स्त्रियांवर गोर्यांनीं अत्याचार केलें तर ? त्यांना होईल का फाशीची शिक्षा? निदान तुरुंगात ५।१० वर्षें तरी पाठवतील का? ज्यांच्या हातांत पैसा, त्याच्यासाठी न्याय असतो. कायद्यासमोर सारें समान, हें झूट आहे. श्रीमंत पुन्हा वकीलबॅरिस्टर देईल. वाटेल ते सिद्ध करील. गरिबाला कायद्याचा सल्ला द्यायलाही कोणी नसतें. हें सारें फोल आहे.” ते सेवक म्हणाले.