*कलिंगडाच्या साली 5
परंतु एका झोंपडींत कुजबूज सुरूं आहे. त्यांना का बरें झोंप येत नाहीं? काय चाललें आहे बोलणें?
“त्या पठाणाला मी भिते. मालकाकडे चल. तुला पंचवीस रुपये देतों म्हणाला. मला भय वाटते. तो धनजीशेट. त्याचे डोळे. सापाचे जणुं डोळे. फोडून टाकावे ते डोळे असें मनांत येतें. तुम्हीं गांवोगांव आग पेटवायला जाल, मी कुठें राहूं ?”
“शुक्री, तूं उगीच भितेस. आलीच वेळ तर खुपस विळा नि काढ त्याची आंतडी बाहेर. सापाला भीत नाहींस, वाघाला भीत नाहींस, धनजीशेटला भितेस ?”
“तुम्हींसुद्धां भितां. आम्हीं तर बायका.”
“अग, उद्या तो मजुरी देईल. संपाची वेळ येणार नाहीं. नको घाबरूं. तुझें लुगडें फाटलें ; नवीन घेईन. आधी तुला लुगडें, मग मला कपडे.”
तुमचे हे केस जरा कापून घ्या. भुतासारखे दिसतां. का घालूं तुमच्या केसांची वेणी ? का विळ्यानें मीच टाकूं कापून ?”
“शुक्री, थोबाडींत मारीन.”
“त्या धनजीशेटच्या मारा, मग माझ्या मारलीत तर मी आनंदानें सहन करीन. तुम्हीं बायकांना माराल नि त्या धनजीशेटच्या लाथा खाल. तो पठाण दंडुका दाखवतो. तुम्हीं गप्प बसतां.”
“उद्यां नाहीं गप्प बसणार.”
“बघेन सकाळीं. झोंपा आतां.”
सर्वत्र शांतता होती. कुत्रीं भुंकत होतीं. धनजीशेट विचार करीत होता. त्याला झोप येईना. लालानें आदिवासींची बोलणीं त्याला सांगितलीं होतीं. धनजीशेटनें लालाला उठविलें. तो म्हणाला,
“लाला, मोठ्या पहाटें जा आणि पोलिसांची पार्टी घेऊन ये. यांच्यांतील म्होरक्यांना तुरुंगच दाखवायला हवा.”