Get it on Google Play
Download on the App Store

भाग ५

कर्ण आता युद्धात सामील झाला पण द्रोणाला दुर्योधनाने डावलले नाही. द्रोणालाच सेनापति केले. कर्णानेहि तसाच सल्ला दिला होता. पांडवांचे मुख्य समर्थक अजूनहि पांचालच होते. त्याना तोंड देण्याचे काम द्रोणालाच करायचे होते.
सेनापति म्हणून नियुक्त झाल्यावर द्रोणाने दुर्योधनाला त्याची काय इच्छा आहे असे विचारले. दुर्योधनालाहि बहुधा आता युद्ध संपले तर हवे असावे, कारण त्याने द्रोणाला म्हटले कीं त्यानी युधिष्ठिराला पकडावे. द्रोनाने आश्च्र्य व आनंद व्य्क्त केला कीं दुर्योधनाला युधिष्ठिराचा मृत्यु नको होता! दुर्योधनाने खुलासा केला कीं युधिष्ठिराला मारले तर भीमार्जुन कोपून सर्वनाश करतील. त्यापेक्षा युधिष्ठिराला पकदले तर त्याला पुन्हा द्यूत खेळायला लावून पांडवाना कायमचे वनात पाठवतां येईल. द्रोणाने युधिष्ठिराला पकडण्याचे कबूल केले मात्र अर्जुन उपस्थित असेल तर ते शक्य होणार नाही! ‘अर्जुनाला इतरत्र अडवून ठेवलेत तर मी तुझा हेतु साध्य करीन’ असे त्याने दुर्योधनाला म्हटले.
या बेतामध्ये  जर द्रोण यशस्वी झाला असता तर काय झाले असते असा विचार करतां येईल! युधिष्ठिराला पकडले तर पांडवांचे काय होणार हे स्पष्ट होते. पांडवाना मारणे हे काही सोपे नव्हतेच तेव्हां त्यापेक्षा ते कायमचे राज्यवंचित होणे कदाचित द्रोणाला उचित वाटले असेल!
परिणामी ११ व्या दिवसापासून युद्धहेतु बदलला! युधिष्ठिराला पकडणे आणि त्यासाठी अर्जुनाला इतरत्र अडकवणे हा मुख्य बेत ठरला. हे पांडवांनाहि कळलेच होते. पहिले दोन दिवस त्रिगर्त राजा सुशर्मा आणि त्याच्या बंधूनी अर्जुनाला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी ते पूर्ण साध्य झाले नाही. अर्जुनाने अडचणीच्या वेळी युधिष्ठिराला वाचवलेच. दुर्योधनाला राग आला पण द्रोणाने पुन्हा स्पष्ट सांगितले कीं अर्जुन उपस्थित असताना मी युधिष्ठिराला पकडू शकत नाही! त्याला दूर ठेवा! १३ व्या दिवशी पुन्हा त्रिगर्तानी अर्जुनाला अडवण्याचा निर्वाणीचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. १३व्या दिवसाचे युद्ध अनपेक्षितपणे निर्णायक ठरले.