Get it on Google Play
Download on the App Store

भाग ७

याआधीच्या प्रत्येक दिवशी सूर्यास्ताबरोबर वा त्यानंतर थोड्या वेळाने युद्ध थांबत असे. या दिवशी मात्र जयद्रथवधानंतर युद्ध चालूच राहिले ते सर्व रात्रभर चालले. मध्यरात्री घटोत्कच मारला गेला. द्रोण युधिष्ठिराला पकडू शकला नव्हता आणि पांचालांचा जोर वाढतच होता. द्रोणाचा युद्धहेतु आता बदलला. आता पांचालांचा विनाश त्याला करायचा होता. त्याने सर्व कौशल्य व मोठी अस्त्रे वापरण्यास सुरवात केली. पहाटे थोडाकाळ थांबलेले युद्ध सूर्योदयानंतर पुन्हा चालू होऊन दिवस अखेरपर्यंत चालले. द्रोणाने चालवलेला संहार पाहून कृष्णाला काळजी वाटू लागली. तो पांडवाना म्हणाला कीं याला आवरला नाही तर दिवस अखेर तुमचे सर्व समर्थक मारले जातील! मग कृष्ण आणि भीम यानी एक कुटिल बेत ठरवला. भीमाने एक अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला व द्रोणाजवळ जाऊन वरचेवर ‘अश्वत्थामा मेला’ असे त्याला सांगूं लागला. द्रोण विश्वास ठेवणार नाही आणि अखेरीस युधिष्ठिरालाच विचारील हे ठाऊक असल्यामुले भीम-कृष्ण यानी त्याला पढवले होते. नाइलाजाने, जेव्हा द्रोणाने विचारले ‘अश्वत्थामा मेला काय?’ तेव्हा युधिष्ठिराने ‘हो मेला, पण हत्ती’ असे उत्तर दिले. शेवटचे शब्द मान वळवून उच्चारले. खोटे बोलणे टाळले. हेतु साध्य झाला. द्रोण विमनस्क झाला. भीमाने पुन्हा त्याच्याजवळ जाऊन ‘तूं आमचा गुरु नव्हे तर वैरी आहेस, पुत्र मेला, आता कशासाठी लढतो आहेस?’ अशी निर्भर्त्सना केली. द्रोणाने द्रुपदाला व इतर अनेक पांचाल वीराना मारलेच होते. आता तो धनुष्य टाकून देऊन रथात बसला. धृष्टद्युम्नाने वेळ न दवडतां, अर्जुन, सात्यकी यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून सरळ द्रोणाचा शिरच्छेद केला.
सात्यकी आणि अर्जुन विरुद्ध भीम धृष्टद्युम्न असा वादविवाद चालू राहिला पण अखेरीला द्रोणवध झालाच होता. युद्ध बंद झाले. अर्जुनाला द्रोणाशी अंतिम सामना करावा लागला नाही.
द्रोणाला माहीत होते कीं अश्वत्थामा चिरंजीव आहे मग त्याने विश्वास कां ठेवला? कदाचित त्याला आता युद्ध नकोसे झाले असेल. आपल्याला गुरु मानणार्या पांडवानाहि आता आपला मृत्यु कसेहि करून हवा आहे हे दिसून आले होते. तेव्हा आता पुरे झाले असे त्याने बहुधा ठरवले.
धनुर्वेदाला वाहिलेले एक आयुष्य अखेर संपले.