Get it on Google Play
Download on the App Store

महाभारतातील उल्लेख व निष्कर्ष

श्री. ओक यानी डॉ. वर्तक यानी सुचवलेले वर्ष अ अ अ अ व तारीख १६ ऑक्टोबर (ज्युलियन) हीच स्वतःची म्हणून स्वीकारली आहेत. आता त्यानी अभ्यासलेले महाभारतातील उल्लेख व निष्कर्ष मी तपासणार आहे.

१.  उल्लेख ६ व तपास १०
‘युद्धारंभ दिनी गुरु आणि शनि विशाखा नक्षत्रापाशीं’
श्री. ओक म्हणतात, ’एक वर्ष आधी गुरु ‘मूळ’ मध्ये व शनि ‘हस्त’ मध्ये होते. म्हणजे ते विशाखाचे अनु. पुढे व मागे ३ नक्षत्रे होते. युद्धारंभ दिनी गुरु ‘उत्तराषाढा’ पर्यंत आणखी पुढे सरकला होता व शनि ‘चित्रा-उत्तरा फा.’ मध्ये म्हणजे ‘हस्ता’तच होता! दोन्ही ग्रहांमधील अंतर वाढून ८ नक्षत्रे झाले होते! तरीहि श्री. ओक म्हणतात ‘दोन्ही ग्रह विशाखाजवळ होते’ हे कसे मान्य करणार?
डॉ. वर्तक यानी या उल्लेखाला त्यांच्या पुस्तकात फार महत्व दिले होते. अलिकडच्या काळातील काही वर्षे त्यानी अशी निवडली कीं तेव्हा गुरु-शनि विशाखापाशी होते व मग इतर एका उल्लेखाच्या आधारे १२० वर्षांच्या टप्प्याने मागे मागे जात त्यानी युद्धवर्षाचा शोध घेतला. त्यांचेपाशी संगणक-सुविधा असती व श्री. ओक यानी वर्णिलेली ग्रह-स्थिति त्याना दिसली असती तर त्यानी अ अ अ अ हे वर्ष जुळते असा दावा केला नसता!
हा उल्लेख खरा ठरण्यासाठी युद्धवर्ष असे हवे कीं शनि वर्षभर ‘स्वाती-विशाखा’ दरम्यान असेल व तारीख अशी हवी कीं तेव्हां गुरुहि विशाखाजवळ असेल. संगणकाच्या वापराने, ‘अरुंधतीच्या कालखंडा’तच पण  जेव्हा अरुंधती जास्तीत जास्त पुढे होती त्या कालावधीतील असे एखादे वर्ष सापडू शकेल? श्री. ओक जाणे!

२. उल्लेख १० तपास ११
शनिचा उत्तरा फाल्गुनी वर हल्ला.
श्री. ओक याना शनि उ. फाल्गुनीपाशी युद्धवर्षाचे २ वर्षे आधी दिसला, पण तेव्हाच तो ‘चित्रा’ कडे सरकत होता म्हणजे ‘हस्ता’तून पुढे सरकत होता. युद्धकाळी तो हस्ताच्या शेवटाकडे पोचला होता मग तो उ. फाल्गुनीला पीडा कशी देणार? तेव्हा उल्लेखाची पडताळणी मान्य करता येत नाही!

३. उल्लेख ११, १३ व १४.
हे उल्लेख मंगळाची ‘मघा’ ते ‘श्रवण’ वाटचाल वर्णितात. तपास १३ मध्ये ही सर्व वाटचाल जुळते असा श्री. ओक यांचा दावा आहे. उल्लेखांमध्ये एकदा ‘सव्य-अपसव्य’ व दोनदा ‘वक्र’ असे दोन प्रकार वर्णिले आहेत. ‘सव्य-अपसव्य’ म्हणजे नेहेमींची मागे येऊन पुन्हा पुढे जाणे ही क्रिया. पण वक्र म्हणजेहि तीच काय हा वादविषय आहे. कारण येवढ्या छोट्या प्रवासात तीन वेळा मागे-पुढे वळणे शक्य नाही. श्री. ओक यानी ‘वक्र’ म्हणजे सूर्य-चंद्र-तार्‍यांचा भ्रमणपथ ओलांडणे असा पर्यायी अर्थ सुचवला आहे. याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. श्री. ओक यानी काही काळापूर्वी मंगळाच्या मघा ते श्रवण या वाटचालीचे (अर्थात युद्धवर्षीं) व्हिडिओ प्रसिद्ध केले. ते छानच होते. पण अनेक प्रश्न उरतातच!
   अ) मंगळ एकलिप्टिक ओलांडतो तो ‘रोहिणी’पाशीं! मघापाशीं नव्हे! ५ नक्षत्रे आधीं! मग ‘मघासु अंगारको वक्रः’ कसें म्हणायचे?
   आ) पुढे मंगळ पुन्हा वक्र जातो तो ‘अनुराधा’ पाशी, उल्लेखाप्रमाणे ‘ज्येष्ठायाम्’ नव्हे!
   इ) मंगळाचे एक्लिप्टिक ओलांडणे नुसत्या दृष्टीने दिसेल काय? फार कठीण. व्हिडिओ मधल्यासारखी आकाशात एक्लिप्टिकची पिवळी रेषा थोडीच आहे?
खरी नवलाची गोष्ट ही कीं व्हिडिओ स्वतःच प्रसिद्ध केल्यानंतरहि, (ज्यात मंगळ मघापाशी काहीच करत नाही, सरळ सरकत राहातो,), श्री. ओक दावा करतातच कीं मंगळ ‘मघा’पाशी ‘वक्र’ झाला! अर्थातच पडताळणी मान्य करता येत नाही!

४. उल्लेख ११ तपास १४ .-
गुरूची वक्र वाटचाल. व्यास म्हणतात ‘श्रवणे च बृहस्पतिः’ गुरु ६ एप्रिल पासून पुढील वर्षाच्या १६ जानेवारी पर्यंत, म्हणजे युद्धानंतर ६ महिने लोटल्यावर, ५ वेळां एक्लिप्टिक ओलांडून गेलेला श्री. ओक याना आढळला! युद्धकाळी ‘श्रवणा’त असलेला गुरु अर्थातच तोंवर काही नक्षत्रे पुढे गेलेला होता. म्हणजे श्री. ओक यांच्या व्याख्येप्रमाणे वक्र खरा पण ‘श्रवणा’त नव्हे! तेव्हा ‘श्रवणे च बृहस्पतिः’ स्थानाप्रमाणे वा कलाप्रमाणेहि सिद्ध होत नाही. इतर संशोधक मानतात त्याप्रमाणे, ‘गुरु श्रवणात आहे’ एवढेच व्यासाना म्हणायचे असावे. ‘श्रवणे च बृहस्पतिः वक्रः’ नव्हे!

५. उल्लेख १८ तपास १५.
‘सुक्रः प्रोष्ठपदे ....सहितः प्रत्युदीक्षते’ व्यासांचे वचन वर्तमानकाळात आहे. म्हणजे शुक्राचा उत्तराभाद्रपदापर्यंत प्रवास युद्धारंभी पूर्ण झाला आहे. श्री. ओक याना युद्धारंभदिनी शुक्र श्रवण व धनिष्ठा यांचे मध्ये दिसला व नंतरचा उत्तराभाद्रपदापर्यंतचा प्रवास अर्थातच पुढील बराच काळ चालू राहिलेला त्यानीच वर्णिला आहे. त्यानी दिलेल्या तालिका ८ प्रमाणे शुक्र उत्तराभाद्रपदापाशी पोचायला पुढील वर्षाची मार्च अखेर झाली म्हणजे युद्धारंभदिन, १६ ऑक्टोबर, नंतर पूर्ण ५ १/२ महिने लोटल्यानंतर! मग व्यास त्याबद्दल युद्धारंभा आधीच (घटना घडलेली असल्याप्रमाणे)कसे बोलले? हा भलामोठा फरक श्री ओक यानी सरळ दुर्लक्षिला आहे!
श्री ओक याना शुक्र नेपच्यून भोवती फिरताना दिसला. व्यासाना अर्थातच नेपच्यून दिसणे शक्य नव्हते त्यामुळे त्यानी तसे काही म्हटलेले नाही! व्यासानी ‘...सहितः प्रत्युदीक्षते’ म्हटले आहे त्याचा अर्थ उत्तराभाद्रपदा नक्षत्रासहित असा असावा.
तेव्हा शुक्रभ्रमणाचे वर्णन सिद्ध होते हा शॄ. ओक यांचा दावा मान्य करता येत नाही.

6. व्यासानी उल्लेखिलेले श्वेत, तीव्र आणि तीक्ष्ण म्हणजे युरेनस, नेपच्यून व प्लुटो असें श्री. ओक म्हणतात! हे तीन ग्रह महाभारतकाळी ज्ञात होते हा श्री. ओक यांचा भरमसाठ दावा मान्य करतां येत नाही. नुस्त्या डोळ्यानी ते मुळीच दिसत नाहीत तेव्हां महाभारतकाळी भारतांत मोठ्या दुर्बिणी होत्या याचा कांही वेगळा पुरावा श्री. ओक यानी प्रथम द्यावा.